– अन्वय सावंत
विराट कोहली आणि गौतम गंभीर ही भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी नावे. २०११च्या एकदिवसीय विश्वचषक विजयात या दोघांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच हे दोघेही दिल्लीचे. एकाच राज्याकडून आणि पुढे जाऊन देशाकडून एकत्रित खेळल्यानंतर खेळाडूंमधील संबंध सलोख्याचे असतात. मात्र, कोहली आणि गंभीर यांच्याबाबतीत असे म्हणता येणार नाही. या दोघांमधील संबंध तणावपूर्ण असून त्यांच्यातील वादाने पुन्हा डोके वर काढले आहे.
कोहली-गंभीरमध्ये चकमक का झाली?
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये सोमवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कोहली बंगळूरु संघाचे प्रतिनिधित्व करत असून गंभीर लखनऊ संघाच्या प्रेरकाची भूमिका बजावत आहे. उभय संघांमधील सामन्यादरम्यान लखनऊचे फलंदाज बाद झाल्यानंतर कोहली आक्रमक पद्धतीने जल्लोष करताना दिसला. तसेच सामन्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू हस्तांदोलन करत असताना कोहली आणि लखनऊचा गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मग बंगळूरुच्या ग्लेन मॅक्सवेलने मध्यस्थी करत हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोहली लखनऊचा सलामीवीर काएल मेयर्सशी संवाद साधत होता. त्यावेळी गंभीरने मेयर्सला दूर केले. त्याने ही कृती का केली असे विचारण्यासाठी कोहलीने गंभीरला आपल्याजवळ बोलावले. गंभीर रागाने कोहलीजवळ गेला. लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि अन्य खेळाडूंनी गंभीरला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही. गंभीर आणि कोहली यांच्यात वाद झाला.
नक्की काय घडले?
मेयर्स आणि कोहली यांच्यात सामन्यानंतर संवाद सुरू होता. त्यानंतर गंभीरने मेयर्सला कोहलीपासून दूर केले. इथूनच वादाला सुरुवात झाल्याचे मैदानावर उपस्थित व्यक्तीचे म्हणणे आहे. सामन्यादरम्यान तू मला शिवीगाळ का करत होतास, असे मेयर्सने कोहलीला विचारले. यावर तू सतत माझ्याकडे रागाने का पाहत होतास, असा प्रश्न कोहलीने उपस्थित केला. त्यापूर्वी सामना सुरू असताना नवीन-उल-हकला कोहली शिवीगाळ करत होता आणि याची तक्रार अमित मिश्राने पंचांकडे केली होती. कोहली आणि मेयर्स यांच्यातील संवादाचे वादात रूपांतर होऊ नये यासाठी गंभीरने मध्यस्थी केली. त्याने मेयर्सला दूर नेले. मात्र, ही बाब कोहलीला आवडली नाही. मग दोघांमध्ये मोठा वाद झाला. ‘तू काय बोलत आहेस?’ असे गंभीरने विचारले. यावर कोहली म्हणाला की, ‘मी तुला काही बोललोच नाही, तर तू का रागावत आहेस?’ यावर गंभीरने उत्तर दिले की, ‘तू माझ्या संघातील खेळाडूला बोललास म्हणजे तू माझ्या कुटुंबाला शिवी दिली आहेस.’ त्यानंतर अन्य खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांना दूर केले. त्यापूर्वी ‘आता तू मला शिकवणार का,’ असे गंभीरने कोहलीला म्हटले,’’ असे या व्यक्तीकडून सांगण्यात आले.
सामन्यादरम्यान काय झाले?
आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊचा नवीन-उल-हक फलंदाजीला येताच कोहलीने त्याला डिवचले (स्लेज केले). लखनऊच्या डावातील १७वे षटक मोहम्मद सिराजने टाकले. यातील अखेरच्या चेंडूवर सिराजने नवीनला ‘बाउन्सर’ टाकला. तो चेंडू ‘नो-बॉल’ ठरवण्यात आला. मात्र, त्यानंतर मिळालेल्या ‘फ्री-हिट’वर फटका मारण्यात नवीन चुकला. सिराजने मग नवीनकडे रागाने पाहिले आणि चेंडू ‘स्टम्प’वर मारला. नवीनने मग सिराजला काही सुनावले. यानंतर कोहलीने मध्ये येत नवीनला डिवचले. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होण्याची शक्यता लक्षात घेत दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणाऱ्या अमित मिश्राने मध्यस्थी केली. मग बंगळूरुने सामना जिंकल्यानंतर कोहलीने लखनऊच्या चाहत्यांना तोंड बंद ठेवण्याची (तोंडावर बोट ठेवत) खूण केली. अशीच खूण गंभीरने उभय संघांदरम्यान बंगळूरु येथे झालेल्या सामन्यानंतर केली होती. सामना संपल्यावर दोन्ही संघांतील सदस्य हस्तांदोलन करत असताना नवीन आणि कोहली यांच्यात पुन्हा वाद उद्भवला. मग कोहली आणि मेयर्स एकमेकांशी संवाद साधत असताना गंभीरने मेयर्सला दूर नेले. या पार्श्वभूमीवर कोहली आणि गंभीर वाद झाला.
दोघांना काय दंड ठोठावण्यात आला?
कोहली आणि गंभीर यांनी ‘आयपीएल’च्या आचारसंहितेतील कलम २.२१चे उल्लंघन केले. त्यामुळे कोहली (१.७० कोटी) आणि गंभीर (२५ लाख) या दोघांकडून सामन्याचे संपूर्ण मानधन दंडाच्या स्वरूपात आकारले जाणार आहे. तसेच नवीन-उल-हकला (१.७९ लाख) सामन्याच्या मानधनातील ५० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोहली आणि गंभीर यांच्यात यापूर्वी कधी वाद झाला?
कोहली आणि गंभीर यांच्यात २०१३च्या ‘आयपीएल’मध्येही मैदानातच वाद झाला होता. त्यावेळी कोहली बंगळूरुकडूनच खेळत होता, तर गंभीर कोलकाता नाइट रायडर्सचे कर्णधारपद भूषवत होता. कोहली बाद झाल्यानंतर गंभीरने आक्रमक पद्धतीने जल्लोष केला व त्याला उद्देशून काहीतरी म्हटले. ते ऐकून कोहलीला राग आला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती.
हेही वाचा : कोणत्या नियमानुसार कोहली-गंभीरला ठोठावला दंड? कशी निश्चित केली जाते शिक्षा, जाणून घ्या
‘आयपीएल’मध्ये अन्य खेळाडूंत वाद झाल्याची उदाहरणे आहेत का?
कोहली आणि गंभीर यांच्याप्रमाणेच हरभजन सिंग आणि श्रीशांत यांच्यातील वादाचीही खूप चर्चा झाली होती. २००८च्या हंगामातील एका सामन्यात श्रीशांतचा समावेश असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने हरभजन सिंगचा समावेश असलेल्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. त्यानंतर श्रीशांतने हरभजनला चिडवले होते. याचा हरभजनला राग आला आणि त्याने श्रीशांतच्या कानशिलात लगावली. याची चित्रफीत ‘आयपीएल’ने प्रसिद्ध केली नाही, पण श्रीशांत रडत मैदानाबाहेर जात असल्याचे त्या सामन्यानंतर दिसले होते. तसेच २०११मध्ये मुंबई इंडियन्सचा मुनाफ पटेल आणि हैदराबाद डेक्कन चाजर्सचा अमित मिश्रा यांच्यात वाद झाला होता. मुनाफच्या गोलंदाजीवर मिश्राने षटकार व चौकार मारला. त्यानंतर मुनाफने मिश्राला डिवचले. तसेच दोघांनी एकमेकांना धक्काही मारला. अखेर पंचांनी मध्यस्थी करत दोघांना दूर केले. २०१६च्या हंगामात मुंबईकडून खेळणाऱ्या हरभजन आणि अंबाती रायडू या सहकाऱ्यांमध्येच शाब्दिक चकमक झाली होती. तसेच २०१४च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा मिचेल स्टार्क यांच्यातही खेळपट्टीवरच वाद झाला होता. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा हृतिक शौकिन आणि कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा या दोनही मुळच्या दिल्लीकर खेळाडूंमध्ये चकमक झाली होती.