– डॉ. नितीन करमळकर, भूशास्त्र संशोधक
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मौजे चौक – मानिवली गावाच्या हद्दीतील इरशाळवाडीत दरड कोसळली आणि क्षणार्धात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. पावसाळा सुरू झाला की कोकणात दरड कोसळणे आणि भूस्खलन होण्याच्या दुर्घटना सर्रास घडतात. भूस्खलन होते म्हणजे नेमकं काय? त्यामागची कारणे, हानी कमी करण्यासाठीच्या उपाययोजना कोणत्या कराव्यात?
पावसाळ्यात कोकणात भूस्खलन आणि दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक का आहे?
भूस्खलन ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी लगतच्या डोंगररांगांमध्ये भूस्खलन होण्याचे प्रमाण जास्त आहे. या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात खूप पाऊस पडतो. डोंगररांगांमध्ये दगडांची धूप होत असल्यामुळे गाळ तयार होतो. हा गाळ डोंगरउतारावर जमा होत असतो. अतिवृष्टी होते, तेव्हा पाणी मुरल्यामुळे पाण्याचा दाब तयार होतो. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा गाळ अतिरिक्त भार निर्माण करतो. ज्या ठिकाणी हा गाळ बसलेला असतो, तेथे निर्माण होणाऱ्या निसटत्या पृष्ठभागावरून त्याची घसरण्याची प्रक्रिया सुरु होते. आपल्याकडील भूशास्त्र पाहिले तर सर्व अग्निजन्य खडक (बेसाल्ट) आहेत. ते तुलनेने कमी सच्छिद्र असतात. त्यामुळे पाणी खाली न मुरता बऱ्याच वेळेला ते त्यावरून वाहते. या प्रवाहाबरोबर जमा झालेले विविध घटक वाहतात. पाणी वाढल्यामुळे जमा झालेल्या घटकांचे वजनही वाढते. त्यामुळे सरकण्याची प्रक्रिया जलद होते. पश्चिम किनारपट्टीच्या बाजूने जी फॉल्टलाइन आहे, त्याच्या बाजूला तयार होणाऱ्या स्ट्रेचेसमुळे दगडांमध्ये भेगा पडण्याची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात सुरु होते. सरळ असलेल्या मोठ्या भेगा निसटता पृष्ठभाग म्हणून काम करतात आणि पाण्याच्या दबावामुळे दगड खाली घसरतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या माध्यमातून अशा असुरक्षित जागांचे सर्वेक्षण व अभ्यास केला जातो. काही ठिकाणी त्याचे मोजमापही केले जाते. धोकादायक वाटणाऱ्या भागांत मोठ्या सळ्या घातल्या जातात आणि त्याला प्लेट लावून दगड त्याच्या मागील पक्क्या खडकात घुसवले जातात. या प्रक्रियाद्वारे दगड पडणार नाही याची काळजी घेतली जाते. पण हा प्रकार कायमस्वरूपी उपाय नाही. वर्षानुवर्षे धूप होण्याची प्रक्रिया सुरू असते आणि बऱ्याच वेळेला पडझड होताना दिसते. अतिवृष्टीच्या दिवसांत भूस्खलनाची प्रक्रिया अधिक होते.
हानी कमी कशी करता येईल?
भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी असुरक्षित जागी असलेल्या वस्त्यांचे सुरक्षित जागी स्थलांतर करणे गरजेचे आहे. पाटण किंवा कोयनेसारख्या उंचावरील भागांत नैसर्गिकरित्या तयार झालेला जांभा खडक असतो. दगड कुजण्याच्या प्रक्रियेतून जांभा खडकाची निर्मिती होते. काही क्षार वाहून जातात आणि कठीण क्षार तसेच राहतात. खाली दगड, मग माती आणि वरच्या बाजूला जांभ्याच्या खडक असतो. जांभ्याचा खडक हा सच्छिद्र असतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपले की खालची माती वाहून जाते. मग वर असलेला जांभ्याचा दगड अस्थिर होऊन खाली पडतो. या सर्व घटकांचा विचार करून धोकादायक वाटणाऱ्या ठिकाणी असलेली वस्ती स्थलांतरित करणे हाच हानी टाळण्याचा प्रभावी उपाय आहे. झाडांची मूळे जमिनीची धूप कमी करतात, माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडही झाली पाहिजे. याबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. दुर्गम भागांत रहिवाशांना बदल दिसत असले तरी त्यामागील शास्त्रीय कारणे, परिणाम माहिती नसतात. धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना कशी आणि काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे.
दरड कोसळण्याची किंवा भूस्खलनाची पूर्वसूचना मिळते का?
पूर्वसूचना मिळावी म्हणून कोकण रेल्वे मार्गावर गजर यंत्रणा (अलार्म सिस्टीम) लावण्याचे ठरले होते. परंतु या रेल्वे मार्गाच्या लांबी व रुंदीमुळे ते अशक्यप्राय झाले. भूस्खलनाचेही काही प्रकार आहेत. माती हळूहळू वाहत जाते आणि उतारावरची झाडे ही तिरकी व्हायला लागतात, तेव्हा आपल्याला भूस्खलन होण्याचे संकेत मिळतात. यापेक्षाही भयानक प्रकार म्हणजे दगड कोसळणे. वरच्या भेगांमध्ये पाणी मुरल्यामुळे पाण्याचा दाब तयार होतो. हा पाण्याचा दाब दगडाला जोर देतो आणि मग असे दगड खाली येत असताना उतारावरचा साचलेला गाळ घेऊन येतात. व्यवस्थित निरीक्षण केल्यास हे बदल टिपता येतात. नागरिकांना भूस्खलनाचे पूर्वइशारे, संकेत सांगणे आवश्यक आहे. आपल्याकडे गजर यंत्रणा कुठेच बसविण्यात आलेली नाही. दररोजच्या निरीक्षणातून व सर्वेक्षणातून या गोष्टी नोंदवल्या जातात. पडझडीस आलेला भाग काढून टाकला जातो. महामार्गावर रस्त्याच्या कडेला काम चालू असताना डोंगराच्या वरच्या बाजूस स्फोट केले जातात. त्यातून काही दगड खाली पाडले जातात. ते अडवण्यासाठी जाळ्या लावल्या जातात. पण जाळीची घनता व क्षमता दगड थोपवू शकली नाही तर ते खाली घरंगळतात. त्यामुळे लोखंडाच्या जाळ्यांमध्येही दगड लावलेले असतात. वरून येणारे दगड खाली थोपविण्यासाठी अडथळे निर्माण केलेले असतात. दैनंदिन वर्दळीच्या ठिकाणी या उपाययोजना केल्या जातात. दुर्गम भागांत फारशी काळजी घेतली जात नाही, ती क्षेत्रे दुर्लक्षित राहतात. अशा वेळी इरशाळगड, तळीये व माळीणसारखी दुर्घटना घडते. नैसर्गिक प्रक्रियेमध्ये मानवाचा हस्तक्षेप वाढला की ती प्रक्रिया जलद होते. त्या दृष्टीने समतोल राखला पाहिजे, जो लोकांकडून राखला जात नाही.
धोकादायक क्षेत्राचे सर्वेक्षण कसे केले जाते?
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था ही निरनिराळ्या गोष्टी तपासत असते. त्यामध्ये धोकादायक क्षेत्राच्या मॅपिंगचाही समावेश असतो. त्या दृष्टीने भूशास्त्रीय नकाशे किंवा आराखडे तयार केले जातात. काही प्रमाणात ते प्रसिद्धही झाले आहेत. इरशाळगडाची सर्वेक्षणात नोंद झाली नव्हती. कारण अत्यंत दुर्गम भागात इरशाळवाडी ही वस्ती आहे. लोकांना संभाव्य धोक्याबाबत माहिती होती आणि या धोक्यापासून वाचण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. स्थलांतर करायचे झाल्यास ते बऱ्याच वेळेला वनक्षेत्रात होते आणि बऱ्याचदा हे स्थलांतर अतिक्रमण म्हणून पकडले जाते, त्यांना येऊ दिले जात नाही. हा संघर्ष कायम सुरू असतो. या सर्व प्रक्रियेत समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. स्थानिक लोकांना आपण धोकादायक क्षेत्रात राहतो याची अनेकदा माहिती असते.
खणलेल्या खाणींचे पुनर्भरण का महत्वाचे?
रस्ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या खडीसाठी मोठ्या प्रमाणात खाणी खणल्या गेल्या आहेत. पण त्या खाणींचे व्यवस्थित पुनर्भरण केले जात नाही. काढून घेतलेल्या गोष्टी पूर्वपरिस्थितीत आणून ठेवल्या जात नाहीत. कचऱ्यासह अनेक गोष्टी भरून सपाटीकरण करणे किंवा त्या उताराची देखरेख करणे असे उपाय शक्य आहेत. अनेक ठिकाणी ही पद्धत वापरली जाते. सर्व महामार्गांवरच्या खाणी पाहिल्यास त्यात पाणी भरलेले असते. त्या व्यवस्थितरित्या पूर्वस्थितीत आणलेल्या नसतात. मोठया प्रमाणात आघात करून जे काही काढून घेतले आहे, त्यामुळे संपूर्ण नैसर्गिक रचना विचित्र आणि कुरूप दिसायला लागते. आपल्याकडे खाणींच्या पुनर्भरणाची प्रक्रिया ९९ टक्के वेळा अमलात आणली जात नाही. त्यासाठी परवानगी देताना पुनर्भरणाचे बंधन घातले पाहिजे.
मानवनिर्मित घटकांचा परिणाम किती आणि कसा?
अलीकडच्या काळात विकासामुळे माणसाचा हस्तक्षेप वाढला आहे. अनेकदा दगड फोडण्यासाठी स्फोट केले जातात. त्यामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या भेगा अजूनच विस्तृत होतात. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते, तेव्हा जमिनीची धूप वेगाने होते. कोकण रेल्वेचा मार्ग तयार करताना काही ठिकाणी कापणी करण्यात आली होती, अशा सर्व घटकांचा आजूबाजूच्या गोष्टींवर परिणाम होतो. अनेकदा चुकीच्या ठिकाणी रस्त्यांची निर्मिती, वस्तीही भूस्खलनाला उत्तेजन देतात. काही वेळा पाणी साठविण्याची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी केल्या जातात. पाण्याच्या नाल्यांची दिशाही बऱ्याचदा बदलते. त्याचा परिणामही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या सर्व स्रोतांना नैसर्गिकरित्या वाव देणे आणि त्यांची जागा न बदलणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. नैसर्गिक स्रोत तोडला तर पाणी साठण्याची प्रक्रिया वाढेल. हा सगळा पाण्याशी निगडित प्रकार आहे. जितका पाणीसाठा जास्त होईल, तिथे भूस्खलनाची प्रक्रिया मोठया प्रमाणात होऊ शकते.
हेही वाचा : इर्शाळवाडीच्या दुर्घटनेतून बोध घेणे गरजेचे, दरडप्रवण गावे आणि वाड्यांबाबत ठोस निर्णय हवा
भूस्खलन क्षेत्राचे मॅपिंग का गरजेचे?
भूस्खलन होणे ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती विशेषतः हिमालयासारख्या भागामध्येही होते. भूकंपक्षेत्राचे जसे मॅपिंग केले आहे. त्याप्रमाणेच भूस्खलन क्षेत्राचेही मॅपिंग केले पाहिजे. विकास करताना निसर्गाचा विचार केला जात नाही आणि निसर्गाचा समतोल राखला जात नाही. या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. डोंगर पोखरण्यासारख्या गोष्टी करून समतोल बिघडवला जातो. या गोष्टी केल्यास धोका पूर्णपणे टळणार नाही, पण मनुष्यहानी व वित्तहानीचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल.
डॉ. नितीन करमळकर हे भूशास्त्र विषयातील संशोधक आहेत. या विषयातील त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते.