– संदीप नलावडे

इंग्लंडमध्ये ॲशेस क्रिकेट मालिकेतील सामन्यांत गोंधळ घातल्यानंतर ‘जस्ट स्टॉप ऑइल’ या पर्यावरणवादी गटाच्या आंदोलकांनी आता विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील खेळात व्यत्यय आणला आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात आंदोलनकर्त्यांनी टेनिस कोर्टवर केशरी रंगाची भुकटी फेकली. त्यामुळे खेळ काही काळ थांबवावा लागला. ब्रिटिश सरकारच्या नव्या तेल परवान्याला विरोध करण्यासाठी हा पर्यावरणवादी गट क्रीडा स्पर्धांसह विविध माध्यमांतून आंदोलन करत आहेत. ‘जस्ट स्टॉप ऑइल’ आणि त्यांच्या आंदोलनाविषयी…

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

‘जस्ट स्टॉप ऑइल’ म्हणजे काय?

‘जस्ट स्टॉप ऑइल’ हा पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणारा इंग्लंडमधील एक गट आहे. हा गट हवामान बदल रोखण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी यासाठी मोहीम राबवत आहेत. मात्र त्यांची आंदोलने आक्रमक होत असल्याने त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. इंग्लंड सरकारच्या जीवाश्म इंधनाचा शोध, विकास आणि त्याच्या उत्पादनासाठी विविध कंपन्यांना नवीन तेल परवाना देण्याच्या धोरणाला या गटाचा प्रामुख्याने विरोध केला आहे. या पर्यावरणवादी गटाची स्थापना फेब्रुवारी २०२२ मध्ये करण्यात आली. त्याच महिन्यात या संस्थेतील काही तरुणांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून जीवाश्म इंधनाचा शोध घेणे सरकारने थांबवावे, अशी विनंती केली. त्यानंतर दोन महिन्यांनी एप्रिल २०२२ मध्ये इंग्लंडच्या खनिज तेल केंद्रांवर आंदोलने केली. या गटामध्ये बहुतेक विद्यार्थी, तरुण, नोकरदार वर्ग यांचा समावेश आहे. आमच्या लढ्याला ६० टक्के ब्रिटिश नागरिकांचा पाठिंबा असल्याचा दावा या गटाने केला आहे. या गटाने गेल्या काही महिन्यांपासून क्रीडा स्पर्धांना लक्ष्य केले आहे.

या पर्यावरण गटाचे म्हणणे काय आहे?

ब्रिटिश सरकारने तेल आणि इतर जीवाश्म इंधनांच्या शाेधासाठी नवीन परवाने देण्यास सुरुवात केली आहे. सरकारने त्यांचा हा निर्णय मागे घ्यावा, अशी या गटाची मागणी आहे. ‘सर्वांना शाश्वत वातावरण आणि परवडणारी ऊर्जा हवी आहे. जोपर्यंत सरकार इंधनासंदर्भतील नवीन परवाने थांबवत नाहीत, तोपर्यंत पर्यावरण वाचविण्यासाठी आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे,’ अशी स्पष्ट व परखड भूमिका ‘जस्ट स्टॉप ऑइल’ने घेतली आहे. २०२५पर्यंत १००हून अधिक नवीन तेल आणि वायू प्रकल्पांना परवाना देण्याची सरकारची योजना आहे. मात्र ही योजना राबवताना सरकार पर्यावरणाचा विचार करत नाही, त्यामुळे आम्हाला विद्रोहाचे पाऊल उचलावे लागले, असे या समूहाचे मत आहे. सरकारने जीवाश्म इंधन उत्पादन बंद करण्याचा उपाय शोधून काढला तर आमचा निषेध संपविण्याचा आम्ही वचनबद्ध आहोत, असे या गटाचे म्हणणे आहे.

‘जस्ट स्टॉप ऑइल’ या गटाने यापूर्वी कोणकोणती आंदोलने केली?

ब्रिटनमधील इंधन साठवणुकीच्या ठिकाणी या गटाच्या आंदोलकांनी आंदोलने केल्यानंतर त्यांनी क्रीडा स्पर्धांना लक्ष्य केले. इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या मैदानात घुसून आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्ल्ड स्नूकर स्पर्धेच्या एका सामन्यात या गटाचा एका सदस्य चक्क स्नूकरच्या टेबलवर चढला आणि त्याने केशरी रंगाची भुकटी सर्वत्र पसरविली. ॲशेस क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात या गटाच्या आंदोलकांनी व्यत्यय आणला. दोन आंदोलकांना निषेध म्हणून लॉर्ड्स मैदानावर केशरी भुकटी पसरावयाची होती. मात्र इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी या आंदोलकांना रोखले. त्यानंतर तीन आंदोलकांना अटक करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या विम्बल्डन स्पर्धेतही या आंदोलकांनी गोंधळ घातला. एक आंदोलनकर्ता पुरुष एकेरी स्पर्धा सुरू असलेल्या कोर्टवर गेला आणि त्याने नेहमीप्रमाणे केशरी भुकटी फेकली. त्यामुळे काही काळ सामना थांबवावा लागला. सिल्व्हरस्टोन येथे झालेल्या फॉर्म्युला वन स्पर्धेतही ट्रॅकवर येऊन आंदोलकांनी निदर्शने केली. या गटाच्या आंदोलकांनी वाहतुकीने गजबजलेल्या काही रस्त्यांवरही आंदोलने करून वाहतूक अडवली आहे. प्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉ यांच्या चित्रावर टोमॅटो सूप फेकून ते विद्रूप करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. एका आंदोलकाने योहान्स व्हर्मीएच्या प्रसिद्ध चित्राला डिंक लावून स्वत:ला चिकटवून घेतले. ब्रिटनमधील डार्टफोर्ड येथील क्वीन एलिझाबेथ पुलावर चढून या आंदोलकांनी आंदोलन केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

या गटाने क्रीडा स्पर्धांना का लक्ष्य केले आहे?

क्रीडा स्पर्धा ही संस्कृती असून जगभरातून असंख्य नागरिक क्रीडा स्पर्धांचा आनंद घेतात. त्यामुळे क्रीडा स्पर्धांमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे ‘जस्ट स्टॉप ऑइल’ या गटाच्या प्रवक्याने सांगितले. क्रीडा स्पर्धेचा आनंद घेणाऱ्यांनी पर्यावरणाच्या गांभीर्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. क्रीडाप्रेमींनी आणि एकूण नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे या गटाचे म्हणणे आहे.

या आंदोलनाला प्रतिसाद कसा आहे?

या गटाच्या आंदोलनाविषयी ब्रिटनमधील नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहे. या गटाच्या आक्रमक आंदोलनाच्या पद्धतीला मान्यताही मिळत आहे, तर त्यावर टीकाही होत आहे. मात्र सार्वजनिक मालमत्तेची माेडतोड आणि रहदारीत अडथळा यांमुळे अनेकांची नाराजी या गटाने ओढून घेतली आहे. इंग्लंडमध्ये महामार्गावर जाणीवपूर्वक अडथळा आणल्याबद्दल ५१ आठवडे तुरुंगवास आणि दंडात्मक शिक्षा आहे. नॅशनल हायवेज आणि ट्रान्सपोर्ट फॉर लंडन यांसह अनेक वाहतूक संस्थांनी आंदोलकांना प्रमुख रस्ते विस्कळीत करण्यापासून रोखण्यासाठी उच्च न्यायालयात आदेशाची मागणी केली आहे. समाजमाध्यमांवरील काही चित्रफितीमध्ये ‘जस्ट स्टॉप ऑइल’च्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवल्याने काही वाहनचालकांनी संताप व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. बिझनेस सेक्रेटरी ग्रँट शॅप्सनी या आंदोलनाला पूर्णपणे अवमानकारक म्हटले आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनात व्यत्यय आणण्याचा कोणताही हक्क या गटाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्याचबरोबर अनेक पर्यावरणप्रेमी व्यक्ती व संस्थांनी ‘जस्ट स्टॉप ऑइल’ला पाठिंबा दिला आहे, मात्र त्यांनी शांततेच्या मार्गांचा अवलंब करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.

हेही वाचा : विश्लेषण : भारतीय पुरुष फुटबॉल संघाची कामगिरी का ठरतेय प्रभावी? प्रशिक्षक स्टिमॅच इतके चर्चेत का?

‘जस्ट स्टॉप ऑइल’ला निधी कोण पुरवतो?

‘जस्ट स्टॉप ऑइल’ या पर्यावरणवादी गटाचा अहवाल सांगतो की त्यांचा सर्व निधी देणग्यांद्वारे आहे. ज्या समूहाने पारंपरिक चलन आणि क्रिप्टोकरन्सी स्वीकारल्या आहेत. त्यांच्या संकेतस्थळानुसार या गटासाठी बहुतेक निधी क्लायमेट इमर्जन्सी फंडाद्वारे येतो. अमेरिका आधारित क्लायमेट इमर्जन्सी फंडाकडून मिळणाऱ्या देणग्या ‘जस्ट स्टॉप ऑइल’चा निधीचा प्राथमकि स्रोत आहे. क्लायमेट इमर्जन्सी फंडला देणगी देणारा आयलीन गेटी हा ‘जस्ट स्टॉप ऑइल’चाही प्रमुख देणगीदार आहे. गेटी तेल कंपनीची स्थापना करणारे तेलसम्राट पॉल गेटी यांचा तो वंशज आहे.