– संजय जाधव
मागील काही वर्षांपासून इंटरनेट सेवेचा विस्तार अतिशय वेगाने होत आहे. यापुढील हा विस्तार आणखी वेगाने होणार आहे. यासाठी लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानासाठी गुगल या जगातील बड्या तंत्रज्ञान कंपनीची पालक कंपनी अल्फाबेटने पुढाकार घेतला आहे. लेझर आधारित तंत्रज्ञानाद्वारे इंटरनेट देशातील दुर्गम भागात पोहोचवण्यासाठी अल्फाबेट आणि मोबाइल सेवा पुरवठादार कंपनी एअरटेल यांच्यात भागीदारी झाली आहे. प्रकाशझोत अथवा लेझर आधारित तंत्रज्ञानाचा वापर इंटरनेट पोहोचवण्यासाठी करण्याच्या या प्रकल्पाचे नाव तारा असे आहे. अल्फाबेटची नावीन्यपूर्ण संशोधन प्रयोगशाळा ‘एक्स’चा हा भाग आहे. यामुळे भारतीय इंटरनेट क्षेत्रात काय बदल होतील, याचा आढावा.
प्रकल्पाची सुरुवात कशी झाली?
अल्फाबेटची नावीन्यपूर्ण संशोधन प्रयोगशाळा ‘एक्स’चा तारा हा भाग आहे. ‘एक्स’कडून आतापर्यंत उलथापालथ घडविणारी संशोधने झाली आहेत. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यात स्वयंचलित मोटार तंत्रज्ञान कंपनी ‘वेमो’, ड्रोन डिलिव्हरी सेवा ‘विंग’, आरोग्य तंत्रज्ञान नवउद्यमी कंपनी ‘व्हेरीली लाइफ सायन्स’ यांचा समावेश आहे. एक्सने २०११ मध्ये दुर्गम भागात इंटरनेट सेवा पुरविण्याचा प्रकल्प अनधिकृतपणे सुरू केला. नंतर २०१३ मध्ये अधिकृतरीत्या ‘लून’ हा प्रकल्प यासाठी सुरू झाला. आकाशात अतिउंचावर लेझर आधारित तंत्रज्ञान बसविलेले फुगे सोडून त्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत इंटरनेट पोहोचविण्याच्या हेतू यामागे होता. मात्र, अत्यंत खर्चिक असल्याने हा प्रकल्प बंद करण्यात आला. नंतर याच तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी ‘एक्स’ने तारा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाचा उद्देश समान असला, तरी त्यामागील तंत्रज्ञानात बदल झाला होता. गुगलकडून अधिकृतरीत्या सप्टेंबर २०२१ मध्ये तारा प्रकल्पाची माहिती जाहीर करण्यात आली.
कशा प्रकारे कार्य करणार?
तारा प्रकल्पामध्ये अतिजलद गतीने आणि अरुंद आणि अदृश्य प्रकाशझोताच्या माध्यमातून प्रकाश रूपातून माहिती पाठविली जाईल. ही कार्यपद्धती फायबर ऑप्टिक केबलप्रमाणे असली तरी यात केबलचा वापर होत नसल्याने ती स्वस्त आहे. दोन टर्मिनलमध्ये या झोतांच्या माध्यमातून जोडणी होईल. या वायरलेस दळणवळण झोताच्या माध्यमातून २० जीबीपीएस वेगाने २० किलोमीटर अंतरापर्यंत डेटा पाठविता येईल. सुरुवातीला २०१७ मध्ये आंध्र प्रदेशात आणि आफ्रिकेत प्रायोगिक पातळीवर हा प्रकल्प राबविण्यात आला.
हेही वाचा : केरळमध्ये मोफत इंटरनेट सेवा देणारी योजना काय आहे? या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत?
तारा प्रकल्प कुठे सुरू?
तारा प्रकल्प व्यापक पातळीवर राबविण्यासाठी अल्फाबेटने एअरटेलसोबत भागीदारी केली आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलिया, केनिया आणि फिजीसह १३ देशांमध्ये सध्या हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अल्फाबेटने या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी स्थानिक मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांशी करार केले आहेत. काँगो नदीभोवती या तंत्रज्ञानाद्वारे इंटरनेटचे जाळे मागील वर्षी निर्माण करण्यात आले. काँगोतील ब्रॅझव्हिले आणि लोकशाही प्रजासत्ताक (डी.आर.) काँगोतील किन्शासा यांना इंटरनेटद्वारे जोडण्यात आले आहे.
भारतात काय बदल घडणार?
तारा प्रकल्पाद्वारे केवळ दुर्गम भागात इंटरनेट पोहोचविणे शक्य होणार नसून, ते अतिशय स्वस्त दरात देता येणार आहे. ग्राहकाला एका गिगाबाईटसाठी एक डॉलर खर्च येईल, असा दावा तारा प्रकल्पाचे प्रमुख महेश कृष्णस्वामी यांनी केला आहे. देशातील दुर्गम भागात अद्याप इंटरनेट पोहोचलेले नाही. त्यामुळे अशा भागात पहिल्यांदाच या प्रकल्पामुळे इंटरनेट पोहोचेल. याचबरोबर खड्डे खोदून त्यातून फायबर ऑप्टिक केबलचे जाळे पसरवून इंटरनेटचे जाळे विस्तारणे बंद होईल. शहरी भागातही स्वस्तात इंटरनेटचे जाळे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पसरवता येईल.
हेही वाचा : विश्लेषण : वैयक्तिक विदा संरक्षण कायदा काय आहे? सत्ताधारी-विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे!
आव्हाने कोणती आहेत?
तारा प्रकल्पासमोर अनेक आव्हानेही आहेत. त्यात प्रामुख्याने खराब हवामानामुळे सिग्नल न मिळणे ही प्रमुख समस्या आहे. लेझर झोतासमोर एखादा अडथळा निर्माण झाल्यासही सिग्नल मिळण्यात अडचणी येऊ शकतात. या अडचणींवर विचार करून त्यावर आधीच मात करण्यात आल्याचा दावा अल्फाबेटकडून केला जात आहे. लेझर झोतावर पाऊस, धुके यांचा परिणाम झाला तरी सेवा खंडित होत नाही. त्याचबरोबर पक्षी अथवा माकड या झोताच्या मध्ये आल्यासही सेवेत खंड पडत नाही, असेही कंपनीचे म्हणणे आहे. यामुळे सद्य:स्थितीतील आव्हानांवर या प्रकल्पाने मात केलेली दिसत आहे. आगामी काळात भारतातील डिजिटल दरी दूर करण्याचे काम हा प्रकल्प करेल, अशी आशा आहे.
sanjay.jadhav@expressindia.com