– संदीप कदम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय महिला क्रिकेट संघाला ‘आयसीसी’च्या जागतिक विजेतेपदाने पुन्हा हुलकावणी दिली. गुरुवारी महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय महिलांचे विश्वविजयी होण्याचे स्वप्न आणखी काही काळ लांबले. भारताच्या या पराभवाची कारणे कोणती होती, आघाडीच्या संघांविरुद्ध भारताची कामगिरी का ढेपाळते, येणाऱ्या काळात भारताने काय सुधारणा करणे गरजेचे आहे, याचा घेतलेला आढावा.

उपांत्य फेरीत भारताच्या पराभवाची प्रमुख कारणे कोणती?

आतापर्यंत झालेल्या महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताने चार वेळा उपांत्य फेरीत धडक मारली होती, पण जेतेपदापर्यंत त्यांना पोहोचता आले नाही. गेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताने अंतिम फेरी गाठली. तेथेही ऑस्ट्रेलियाकडूनच भारताला पराभव पत्करावा लागला. यंदाच्या उपांत्य सामन्यात भारताला ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा सर्वाधिक फटका बसला. भारतीय क्षेत्ररक्षकांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अनेकदा जीवदान दिले. शफाली वर्माने बेथ मूनी आणि रिचा घोषने मेग लॅनिंगचे झेल सोडले. मूनीने ५४ धावांची खेळी केली, तर लॅनिंग ४९ धावांवर नाबाद राहिली. याशिवाय भारताने आपल्या कमकुवत क्षेत्ररक्षणामुळे अनेक धावा दिल्या. तसेच डावातील अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाने १८ धावा केल्या. यानंतर फलंदाजीस आलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नसली, तरीही जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत काैरने भारताचे आव्हान ठेवले. मात्र, ११व्या षटकात चौकार मारण्याच्या प्रयत्नात जेमिमाने यष्टिरक्षकाला झेल दिला. यानंतर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हरमनप्रीतची बॅट खेळपट्टीवर अडकली आणि तिला धावचीत व्हावे लागले. त्यामुळे भारताच्या हातून सामना निसटला.

भारतीय फलंदाज का अपयशी ठरत आहेत?

भारताची तारांकित सलामीवीर स्मृती मानधनाने उपांत्य सामन्यात निराशा केली. ती अवघ्या दोन धावा करून माघारी परतली. आयर्लंडविरुद्ध तिने ८७ धावांची आक्रमक खेळी केली. त्यापूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे तिचा अंतिम ११मध्ये समावेश नव्हता. मग वेस्ट इंडिजविरुद्ध तिने १० धावा केल्या. तर इंग्लंडविरुद्ध तिने ५२ धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीतला उपांत्य सामना वगळता फारशी छाप पाडता आली नाही. भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवून देणाऱ्या शफाली वर्माकडून या स्पर्धेत अपेक्षा होत्या. मात्र, चांगल्या सुरुवातीचे रूपांतर तिला मोठ्या खेळीत करता आले नाही. रिचा घोषने भारताच्या विजयांत निर्णायक भूमिका पार पाडली. मात्र, तळाच्या फलंदाजांकडून तिला अपेक्षित साथ मिळाली नाही. अष्टपैलू दीप्ती शर्माने फलंदाजीत निराशा केली.

गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी का करता आली नाही?

भारताला या विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीत इंग्लंड आणि उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. भारताकडून या स्पर्धेत रेणुका सिंह ठाकूरने सात गडी मिळवले. त्यानंतर दीप्तीला सहा बळी मिळवण्यात यश आले. याशिवाय इतर कोणत्याही गोलंदाजांला चमक दाखवता आली नाही. याशिवाय राजेश्वरी गायकवाड आणि राधा यादव यांना मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही. रेणुका चांगली गोलंदाजी करत असताना दुसरीकडून तिला साथ मिळाली नाही. शिखा पांडे आणि पूजा वस्त्रकार यांनी निराशा केली. पूजा जायबंदी असतानाही स्पर्धेत खेळली. मात्र, तिला योगदान देता आले नाही.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघांविरुद्ध कामगिरी उंचावण्यात भारताला अपयश का?

२०१७मध्ये झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत धडक मारली आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये चांगला बदल पाहायला मिळाला. भारताने दोन वेळा ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेची बाद फेरी गाठली. मात्र, तिथे या दोनपैकी एका संघाविरुद्ध भारताची गाठ पडणे निश्चित असते. मात्र, हे दोन्ही संघ भारतापेक्षा सरस आहेत. दोन्ही संघांनी क्रिकेटच्या एकदिवसीय व ट्वेन्टी-२० प्रारूपात जेतेपदे मिळवली आहेत. दोन्ही संघांचे यश त्यांचे आक्रमक फलंदाज, अप्रतिम गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यामध्ये दडलेले आहे.

हेही वाचा : महिला क्रिकेटपटूंसाठी ‘सामना शुल्क’ समानतेपासून सुरुवात झाली, अजून पल्ला मोठा आहे…

भारताला त्यांच्या स्तरापर्यंत पोहोचायचे झाल्यास या सर्व विभागांतील कामगिरी उंचवावी लागेल. या संघांकडे निर्णायक सामन्यात खेळण्याच्या अनुभवासोबत चांगले ‘विजयवीर’ आहेत. भारताला असे ‘विजयवीर’ घडवावे लागतील. आगामी काळात भारतात महिला प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन होणार आहे. त्यामुळे भारताच्या महिला क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्यास मिळणार आहे. एकत्र खेळल्याने त्यांना कामगिरी उंचावण्यात मदत मिळेल. भारतीय महिला संघाची जबाबदारी फलंदाजी प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर यांच्याकडे होती. त्यामुळे भारताला लवकरच पूर्णवेळ प्रशिक्षक मिळेल अशी अपेक्षा आहे. रमेश पोवार यांची प्रशिक्षकपदावरून गच्छंती झाल्यानंतर भारताकडे पूर्णवेळ प्रशिक्षक नाही. ‘बीसीसीआय’ आगामी काळात यावर तोडगा काढेल अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis of indian women cricket team defeat against australia pbs
Show comments