– हृषिकेश देशपांडे
मध्य प्रदेश विधानसभेसाठी या वर्षाअखेरीस मतदान अपेक्षित आहे. राज्यात २००३ पासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत (२०१८) काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर त्यांनी सत्ता संपादन केली. मात्र ती अल्पकाळ टिकली. दोन वर्षांतच ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडाने काँग्रेस सरकार कोसळले. शिवराज सिंह चौहान ऊर्फ मामाजी पुन्हा मुख्यमंत्री झाले. आता चौहान पाचव्यांदा मुख्यमंत्री होण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा नाही, कर्नाटकमधील विजयानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना आहे. येथे तिसऱ्या भिडूचा मुद्दाच नाही. भाजपला तोंड देण्यासाठी काँग्रेसने हिंदुत्वाचा आधार घेतल्याचे चित्र आहे. त्याचा प्रत्यय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या जबलपूर दौऱ्यात आला.
महाकौशलवर भर…
२३० सदस्य असलेल्या मध्य प्रदेश विधासभेत राज्याचे सहा विभाग पाडले जातात. त्यात महाकौशल, ग्वाल्हेर, निमाड-माळवा, विंध्य, बुंदेलखंड आणि मध्य भारत यांचा समावेश आहे. त्यातील जबलपूर हा महाकौशलमध्ये येतो. यामध्ये आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. यात ३८ विधानसभेच्या जागा आहेत. गेल्या वेळी यातील काँग्रेसला २४ तर भाजपला १३ जागा जिंकता आल्या होत्या. आदिवासीबहुल १३ पैकी ११ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्यामुळे महाकौशल विभाग काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. जागांचे हे गणित पाहता प्रियंकांच्या दौऱ्यासाठी जबलपूरची निवड करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जबलपूरच्या शहरी भागात भाजपला फटका बसला होता. प्रियंकांच्या दौऱ्यापूर्वी एक-दोन दिवस आधी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही येथूनच दौऱ्याला सुरुवात केली होती. त्यांनी आदिवासी मतदारांना साद घातली.
हिंदुत्वावर भर
प्रियंका असो वा शिवराजसिंह चौहान या दोघांनीही हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. अर्थात भाजपकडून हा मुद्दा अपेक्षितच आहे. प्रियंकांच्या दौऱ्यात पक्ष कार्यकर्त्यांनी जी घोषणाबाजी केली, यावरून राज्यात आता काँग्रेस पक्ष हा भाजपला तोंड देण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा बाहेर काढत आहे. मध्य प्रदेशात सात टक्क्यांच्या आसपास मुस्लिम मतदार आहेत. भाजपविरोधात त्यांच्याकडे अन्य पर्याय नसल्याने यातील बहुतेक मते मिळतीलच असे काँग्रेसने गृहीत धरले आहे. आता हिंदू मते अधिकाधिक मिळवण्यासाठी भाजपशी स्पर्धा करताना काँग्रेसने हिंदुत्वाची प्रतीके प्रियंका यांच्या दौऱ्यात वापरली. नर्मदेच्या काठावर आरती हा त्याचाच एक भाग मानला पाहिजे. राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रियंका या सभास्थानी आल्या. राणी दुर्गावती यांनी मुघलांशी संघर्ष केला होता. एकूणच प्रियंका यांच्या जबलपूर दौऱ्यात हिंदुत्वाचा विचार जोरकसपणे अधोरेखित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता.
कर्नाटकप्रमाणेच आश्वासनांची खैरात
कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही गोष्टींचा मतदारांवर प्रभाव पडला. ही बाब भाजपच्यादेखील काही पराभूत उमेदवारांनी पक्षाच्या चिंतन बैठकीत मान्य केली. आता मध्य प्रदेशात तीच खेळी काँग्रेसने केली आहे. प्रियंका यांनी सभेत या पाच घोषणा केल्या. त्यात राज्यात सत्तेत आल्यास प्रत्येक महिलेला महिन्याला पंधराशे रुपये, पाचशे रुपयांत गॅस सिलिंडर, शंभर युनिट वीज मोफत, दोनशे युनिटला निम्मा दर, जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल असे सभेत स्पष्ट करण्यात आले. या मुद्द्यांच्या आधारे भाजपवर मात करता येईल असा काँग्रेसचा होरा आहे. मात्र कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील राजकीय स्थिती वेगळी आहे हे ध्यानात घेतले पाहिजे.
हेही वाचा : “भाजपाचा नवा नारा, बेटी डराओ-ब्रिजभूषण…,’” काँग्रेसचा हल्लाबोल; अनुराग ठाकूरांना विचारले सवाल!
भाजपचे संघटनात्मक बळ
मध्य प्रदेशात जनसंघापासून भाजपची संघटनात्मक ताकद आहे. कुशाभाऊ ठाकरे, सुंदरलाल पटवा, राजमाता विजयाराजे शिंदे यांनी राज्यात पक्ष रुजवला. आदिवासी भागात संघ परिवारातील वनवासी कल्याण आश्रमाचे काम आहे. याखेरीज राज्यभर जनाधार असलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रशासनावर पकड आहे. मध्य प्रदेशची जर कर्नाटकशी तुलना केली तर तेथील म्हैसूरसारख्या भागात भाजप खूपच कमकुवत आहे. याच भागात कर्नाटक विधानसेच्या २२४ पैकी जवळपास ५५ ते ६० जागा आहेत. त्यामुळे पक्षाची भिस्त उर्वरित भागांवरच होती. मध्य प्रदेशात ती स्थिती नाही. राज्यभर भाजप कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे काँग्रेसला यश मिळवण्यासाठी भाजपच्या उणिवा शोधाव्या लागतील. प्रियंका यांनी जबलपूरच्या सभेत घोटाळ्यांचा उल्लेख केला. राज्यात अनेक वर्षे सत्तेत असल्याने भाजपसाठी जनतेच्या नाराजीचा मुद्दा आहेच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच शिवराजसिंह चौहान यांच्या करिश्म्याने सत्ताविरोधी नाराजीवर मात करता येईल याची पक्षाला आशा आहे. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष कमलनाथ तसेच माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह या अनुभवी जोडीचा कस लागेल. एकूणच मध्य प्रदेश जिंकण्यासाठी भाजपच्या हिंदुत्वाला तोंड देताना काँग्रेसनेही सौम्य हिंदुत्वाचा आधार घेतला आहे.