– हृषिकेश देशपांडे
एखादी निवडणूक जिंकल्यावर सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकताना सत्ताविरोधी लाटेला तोंड द्यावे लागते असा अनुभव आहे. मात्र आपल्याकडे सलग पाच विधानसभा निवडणुका जिंकणारे मुख्यमंत्री म्हणून पश्चिम बंगालचे ज्योती बसू तसेच सिक्कीमचे पवन चामलिंग आणि ओडिशाचे नवीन पटनायक यांचा विक्रम आहे. आता २०२४ मध्ये नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल सलग सहाव्यांदा निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. जर त्यांनी विजय मिळवला तर ७६ वर्षीय नवीनबाबू विक्रम प्रस्थापित करतील. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
वादापासून दूर
राष्ट्रीय राजकारणाची महत्त्वाकांक्षा नाही, केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी उगीच संघर्ष करण्याचा नवीन पटनायक यांचा स्वभाव नाही. आपण भले, आपले राज्य भले ही वृत्ती. याखेरीज वादग्रस्त वक्तव्ये नाहीत. गरज पडेल तेथे राज्यसभेत किंवा लोकसभेत केंद्राला अप्रत्यक्ष सहकार्याची भूमिका. त्यातून केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून राज्याला अपेक्षित मदत मिळवण्यातही ते यशस्वी झाले. अविवाहित असलेल्या पटनाईक यांच्यापुढे घराणेशाहीचाही मुद्दा नाही. कल्याणकारी योजनांच्या आधारे गेल्या पाच निवडणुका बिजू जनता दलाला सहज जिंकत आल्या. राज्यात एके काळी सत्ता गाजवलेल्या काँग्रेसचा आता फारसा प्रभाव नाही. बिजू जनता दलाशी भाजपचीच थोडीफार टक्कर आहे, मात्र त्यांच्याकडे नवीन पटनाईक यांच्या लोकप्रियतेच्या जवळपास जाईल असे नेतृत्व नाही. त्यामुळे लोकसभेला भाजपने काही जागा जिंकल्या तरी विधानसभेला बिजू जनता दलाला कौल मिळतो असे चित्र आहे.
नव्या योजनेचे स्वरूप
‘आमा गाव, आमा बिकाश’ थोडक्यात आमचे गाव आमचा विकास ही राज्य सरकारची पूर्वीची योजना परिणामकारक ठरली होती. यातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाला विजय मिळवता आला. कारण त्यापूर्वी २०१७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने कडवे आव्हान उभे केले होते. भाजपवर मात करण्यासाठी ही योजना निर्णायक ठरली होती. यातून जनतेची सरकारबाबतची नाराजी कमी करण्यात यश मिळाले होते. आता हीच योजना आमचे ओडिशा नबीन ओडिशा या स्वरूपात आणली आहे. यासाठी चार हजार कोटींची तरतूद. यात धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी निधी तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास तसेच तंत्रज्ञान विस्तारावर भर देण्यात येणार आहे. जनतेकडून प्रस्ताव आल्यावर ८ हजार पंचायतींना विविध प्रकल्प हाती घेण्यासाठी ५० लाखांचे अनुदान मिळेल. तसेच यातून पंचायत वैयक्तिक प्रकल्पासाठी १० लाख रुपये देऊ शकेल. त्यात खेळांची मैदाने विकसित करणे, इंटरनेट सुविधा, विज्ञान पार्क, ग्रामीण उद्योजकांसाठी कौशल्य विकास केंद्र, प्रशिक्षण सुविधा असे काही प्रकल्प घेता येतील. त्यातही महिलांवर भर आहे. शैक्षणिक सुविधा वाढवणे तसेच बँकिंग सेवा सर्वांपर्यंत पोहोचवणे तसेच ग्रामीण स्तरापर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हे उद्दिष्ट या योजनेत ठेवण्यात आले आहे.
विरोधकांची टीका
विरोधकांनी यावर टीका केली आहे. पूर्वीच्या योजनेतील अनेक कामे अजून पूर्ण झालेली नाहीत. तरीही ही योजना आणली जात आहे, अशी टीका भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष समीर मोहांती यांनी केली आहे. सत्तारूढ बिजू जनता दलाशी जवळीक असणाऱ्या कंत्राटदारांचे भले करणारा हा प्रकल्प आहे असा आरोप काँग्रेस नेते बिजय पटनाईक यांनी केला आहे. सततच्या यशामुळे सत्ताधाऱ्यांकडून जनतेच्या अपेक्षा वाढत जातात. काही वेळा सत्तारूढ पक्ष संघटनेत शैथिल्य येते. त्यातून अनेक वेळा सरकार आणि जनता यांच्यात संपर्क राहात नाही. त्यामुळे बिजू जनता दलाने जनतेची संभाव्य नाराजी टाळण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. विधानसभा निवडणुकीला वर्षभरापेक्षाही कमी कालावधी उरला आहे.
हेही वाचा : भाजपाचे ‘मिशन ओडिशा’ सुरू; BJD चे मैत्रीपूर्ण संबंध बाजूला सारत २०२४ ची निवडणूक जिंकण्याचे लक्ष्य
वेगळा कौल
राज्यात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लोकसभेबरोबच झाली. विधानसभेच्या एकूण १४७ पैकी ११२ जागा बिजू जनता दलाला मिळाल्या. तर भाजपला २३ व काँग्रेसला ९ जागा जिंकता आल्या होत्या. त्याच वेळी लोकसभेच्या २१ पैकी १२ जागा बिजू जनता दलाला तर भाजपला ८ व काँग्रेसला १ जागा मिळाली. लोकसभेतील जागांचा विचार करता भाजपने विधानसभेत बिजू जनता दलाला कडवी लढत देणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना व नवीनबाबूंचे नेतृत्व याला राज्यातील जनतेने पसंती दिली. लोकसभेला मतदारांनी वेगळा विचार केला. मात्र राज्यात आजही नवीन पटनायक यांना पर्याय नसल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दशकांत नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवत त्यांचे जीवनमान उंचावण्यात सरकारला यश आले आहे. क्रीडा क्षेत्रात विशेषतः हॉकी स्पर्धांच्या संयोजनात देशामध्ये ओडिशा एक सक्षम राज्य म्हणून पुढे आले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन तेथे होत आहे. एकूणच सलग सहाव्यांदा विधानसभेत बाजी मारण्यासाठी नवीन पटनायक मैदानात उतरले आहेत.