– संजय जाधव
केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाने प्रवासी मोटारींसाठी नवी सुरक्षा मानके प्रणाली आणली आहे. भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम (भारत एनसीएपी) असे या प्रणालीचे नाव आहे. ती नुकतीच दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात सादर करण्यात आली. यात मोटारींची अपघात चाचणी घेऊन सुरक्षेच्या दर्जानुसार एक ते पाच स्टार दिले जातील. स्वत:ची स्वतंत्र अशी कार सुरक्षा तपासणी असलेला भारत हा जगातील पाचवा देश बनला आहे. या प्रणालीने तपासणी झालेल्या मोटारींवर भारत एनसीएपी लोगो असलेले स्टिकर लावण्यात येतील.
काय आहे ही नेमकी प्रणाली? कशा पद्धतीने लागू होणार?
भारत एनसीएपी ही प्रणाली १ ऑक्टोबरपासून लागू होत आहे. वाहन उद्योग मानक १९७ नुसार, याबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे. ही प्रणाली चालकाव्यतिरिक्त आठपर्यंत आसनक्षमता असलेल्या मोटारींसाठी लागू होईल. याचबरोबर मोटारींचे वजन ३ हजार ५०० किलोपेक्षा अधिक असू नये, असाही निकष आहे. तसेच, कोणत्याही मोटारीच्या मॉडेलचा बेसिक प्रकारच तपासला जाईल, असाही नियम आहे. ही प्रणाली मोटार उत्पादकांसाठी ऐच्छिक असणार आहे. तरीही केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडून एखाद्या विशिष्ट मोटारीची तपासणी सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून होऊ शकते. सध्या सुमारे ३० मोटारउत्पादक कंपन्यांनी ३० मॉडेलसाठी ही तपासणी करण्याची इच्छा दर्शविली आहे. मात्र, त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
प्रणाली विकसित कशी झाली?
ब्रिटनस्थित ‘टूवर्ड्स झीरो’ या स्वयंसेवी संस्थेच्या ग्लोबल एनसीएपीच्या आधारे भारत एनसीएपीची रचना करण्यात आली आहे. जगभरातील नवीन मोटारींच्या सुरक्षा प्रणालींमध्ये समन्वय साधण्याचे काम ही संस्था करते. त्यात अमेरिकेचाही समावेश असून, तेथील प्रणाली ही जगातील सर्वांत जुनी आहे. ती १९७८ पासून सुरू आहे. याच संस्थेने भारतात २०१४ मध्ये ‘सेफर कार्स फॉर इंडिया’ ही मोहीम राबविली. त्यात भारतीय मोटारींची सुरक्षा तपासणी करण्यात आली. त्यात मारुती सुझुकीची अल्टो ८००, टाटाची नॅनो, फोर्डची फिगो, ह्युंदाईची आय १० आणि फोक्सवॅगनची पोलो या मोटारींचा समावेश होता. या सर्व मोटारींना शून्य मानांकन मिळाले होते. त्यानंतर संस्थेने अनेक वेळा तपासणी करून अहवाल जाहीर केले आहेत. आता त्यातून भारत एनसीएपी सुरू करण्यात येत आहे.
मानांकन कशावर ठरणार?
मोटारींना एक ते पाच स्टार मानांकन दिले जाणार आहे. यासाठी प्रमुख तीन निकष असून, त्यात प्रौढ प्रवाशांची सुरक्षा, लहान मुलांची सुरक्षा आणि मोटारीतील सुरक्षेसाठी साहाय्य करणारी यंत्रणा यांचा समावेश आहे. यातील पहिले दोन निकष हे तीन वेगवेगळ्या चाचण्यांमधून तपासले जातील. यात मोटार ६४ किलोमीटर प्रतितास वेगाने एका अडथळ्यावर धडकवली जाईल. दोन मोटारींमध्ये धडक झाल्यानंतर होणारा परिणाम यातून दिसून येईल. याचबरोबर खांबावर ५० किलोमीटर प्रतितास आणि २९ किलोमीटर प्रतितास वेगाने वेगवेगळ्या कोनांमधून मोटार धडकवली जाईल. या चाचण्यांमधून अपघातात मोटार कितपत सुरक्षित आहे, हे तपासण्यात येईल. या आधारावर तिला मानांकन दिले जाईल.
भविष्यात काय करावे लागेल?
भारत एनसीएपी प्रणालीतील मानांकनांना जगभरातील मानकांशी जोडावे लागणार आहे. त्यातून मोटारी अधिकाधिक सुरक्षित बनतील. उदाहरण द्यायचे झाल्यास, अमेरिकेत मोटार उलटण्याचीही चाचणी घेतली जाते. त्यात रस्त्यावर वाहन उलटण्याचा धोकाही तपासला जातो. जपानमध्ये अपघातानंतर मोटारीत बसणारा विजेचा धक्का तपासण्यात येतो. त्याचबरोबर पाठीमागून मोटारीला धक्का बसल्यानंतर मानेला होणारी दुखापत, इमर्जन्सी ब्रेक सिस्टीम, मार्गिका बदलण्यास प्रतिबंध करणारी यंत्रणा, मोटारीच्या पाठीमागील बाजूची दृश्ये दाखविणारी यंत्रणा यांसारख्या निकषांचा त्यात भविष्यात समावेश करता येईल. जगातील वेगवेगळ्या प्रणालींमधील अद्ययावत निकषांचा समावेश करून ही तपासणी आणखी व्यापक करता येईल. यातून भारतीय मोटारींची सुरक्षा वाढण्यास मदत होईल.
हेही वाचा : पुणे बंगळुरू महामार्गावर साताऱ्यात गाडीचा टायर फुटून अपघात, तीन ठार, चार जखमी
रस्ते अपघातांवर परिणाम काय?
देशात दर वर्षी रस्ते अपघातात सुमारे दीड लाख जणांचा जीव जातो. जगातील एकूण वाहनांपैकी केवळ एक टक्का वाहने भारतात आहेत. याच वेळी जगातील एकूण अपघातांपैकी १० टक्के अपघात भारतात घडतात. रस्ते अपघातांमुळे भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाला (जीडीपी) दर वर्षी ५ ते ७ टक्क्यांचा फटका बसतो, असे जागतिक बँकेच्या अहवालातून समोर आले आहे. मोटारींसाठी नवीन सुरक्षा मानके आल्याने त्या अधिकाधिक सुरक्षित बनतील. याचबरोबर नागरिकांमध्येही सुरक्षित मोटारी घेण्याकडे जनजागृती होईल. त्यातून रस्ते अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणारे नागरिक यांचे प्रमाण कमी होईल, असा आशावादही व्यक्त केला जात आहे.
sanjay.jadhav@expressindia.com