– ज्ञानेश भुरे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देशांतंर्गत क्रिकेट स्पर्धांतील बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, असे असले तरी प्रतिष्ठेची रणजी स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला विजेतेपदासाठी मिळणारी रक्कम ‘आयपीएल’मध्ये तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संघापेक्षाही कमी आहे. ‘बीसीसीआय’ने रणजीसह अन्य देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ केली, पण ती पुरेशी आहे का, तसेच या वाढीमागचे नेमके कारण काय आणि देशातील क्रिकेट वाढीस किती फायदा होणार याचा घेतलेला आढावा.
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेत किती वाढ करण्यात आली?
‘बीसीसीआय’ ठरावीक अंतराने आपल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या बक्षिसाच्या रमकेत वाढ करत असते. त्यामुळे बक्षिसाच्या रकमेतील वाढ ही आता क्रिकेट चाहत्यांसाठी बातमी राहिलेली नाही. पण, या वेळी ‘बीसीसीआय’ने जवळपास दुपटीने या रकमेत वाढ केली. महिला क्रिकेटला सर्वाधिक वाढ मिळाली असून, ती तब्बल आठपट आहे. पुरुष विभागात आजपर्यंत प्रतिष्ठेच्या इराणी करंडक स्पर्धेतील उपविजेत्या संघास कुठल्याही प्रकारचे रोख बक्षीस मिळत नव्हते. नव्या निर्णयानुसार उपविजेता संघही २५ लाख रुपयांचा धनी होणार आहे. रणजी विजेता संघ पाच कोटी रुपये कमावणार आहे.
बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यामागचे नेमके काय कारण?
नव्याने बक्षिसाच्या रकमेत वाढ करताना ‘बीसीसीआय’ने देशांतर्गत क्रिकेटचे गोडवे गायले आहेत. भारतीय क्रिकेटचा पाठीचा कणा म्हणून देशांतंर्गत क्रिकेटकडे बघितले जाते. त्यामुळे आम्हाला देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुंतवणूक वाढवायची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही भूमिका नक्कीच स्वागतार्ह आहे. साहजिक देशांतर्गत क्रिकेटला पुन्हा चांगले दिवस मिळतील यात शंकाच नाही. मात्र, बक्षिसाच्या रकमेत इतकी वाढ करण्यामागे तज्ज्ञांच्या मते दुसरे कारण म्हणजे ‘बीसीसीआय’कडे मोठ्या प्रमाणावर महसूल जमा झाला आहे. प्रसारण हक्क, जाहिरात हक्क, प्रायोजकत्व अशा विविध आघाड्यांवर हे उत्पन्न दिवसेंदिवस वाढणार आहे. या वाढीव उत्पन्नावर ‘बीसीसीआय’ला मोठ्या प्रमाणावर कर भरावा लागतो. हा कर आणखी वाढू नये म्हणून ‘बीसीसीआय’ने बक्षिसाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला असावा.
पदाधिकारी झाले, बक्षिसाची रक्कमही वाढली, पुढे काय ?
‘बीसीसीआय’कडे उत्पन्न येण्याच्या जशा विविध वाटा आहेत, तसा ते उत्पन्न खर्च करण्याचेही अधिक मार्ग आहेत. पदाधिकाऱ्यांच्या भत्त्यात त्यांनी वाढ केली. मग देशांतंर्गत स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ केली. आता लवकरच खेळाडूंच्या सामन्यांच्या फीमध्येदेखील वाढ जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या निवृत्तिवेतनातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वेळेस निवृत्तिवेतनात दुपटीने वाढ करण्यात आली होती. या वेळी ही वाढ आकर्षक असेल आणि याबाबतचे निकषही बदलू शकतात.
हेही वाचा : BCCIने ब्रॉडकास्टरचे कोट्यावधी रुपये माफ केले; नेमका हा निर्णय का घेण्यात आला? जाणून घ्या
‘आयपीएल’मधून खेळाडूंना मिळणारा पैसा आणि ही वाढ यांच्यात तुलना कशी होईल ?
‘आयपीएल’ आणि देशांतंर्गत स्पर्धा यांच्यात तुलना करणे योग्य ठरणार नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वांत मानाची स्पर्धा असलेल्या रणजी करंडकाचा विजेता संघ आणि ‘आयपीएल’मधील विजेता संघ यांना मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत फार मोठी तफावत दिसून येते. रणजी विजेता संघ आता पाच कोटी रुपये मिळवणार आहे, तर ‘आयपीएल’ विजेत्या संघाला यंदा २० कोटीचे बक्षीस मिळेल. ‘आयपीएल’मधील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघही प्रत्येकी ६.५ कोटी रुपये मिळवतात. ‘आयपीएल’ ही ‘बीसीसीआय’ची देशांतंर्गत स्पर्धा असली, तरी आता या स्पर्धेचे स्वरूप नुसतेच व्यापक नाही, तर वैश्विक झाले आहे. ‘आयपीएल’मुळेच ‘बीसीसीआय’च्या तिजोरीत सातत्याने वाढ होत आहे. ‘आयपीएल’ ही पूर्णपणे व्यावसायिक स्पर्धा आहे. यात परदेशी खेळाडूही खेळत आहेत. पण, देशांतर्गंत स्पर्धेचे स्वरुप हे पारंपरिक क्रिकेटचे आहे. त्यामुळेच या क्रिकेटमधील गुंतवणूकही देशापुरती मर्यादित राहील.