– शिरीष पवार

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १९९० मध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर आपल्याला खोटारडी ठरवून बदनामीही केली, असा आरोप एका मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरोल यांनी केला होता. याप्रकरणी मॅनहटन न्यायालयाने नुकताच निर्णय दिला की, ट्रम्प यांनी कॅरोल यांना पाच दशलक्ष डाॅलरची भरपाई दिली पाहिजे. या निकालामुळे ट्रम्प यांच्यापुढील कायदेशीर आणि राजकीय आव्हानांमध्ये आणखी भर पडली आहे.

ट्रम्प यांच्याविरोधातील सुनावणीत नेमके काय घडले?

ट्रम्प यांचे वकील जो टॅकोपिना यांनी म्हटले आहे की, जिल्हा न्यायाधीश लुईस कॅप्लन यांनी अयोग्य निकाल दिल्याने ते त्याला आव्हान देणार आहेत. त्यासाठी टॅकोपिना यांना सिद्ध करावे लागेल की, कॅप्लन यांनी न्यायिक निवाड्यांमधील सिद्धांतांचा चुकीचा वापर करून ट्रम्प यांच्याबाबत योग्य सुनावणी केलेली नाही. न्या. कॅप्लन यांनी ज्युरींना ॲक्सेस हाॅलिवूड ध्वनिफीत ऐकण्याची परवानगी दिली. यात ट्रम्प हे कथितरित्या महिलांवरील बळजबरीच्या संभोगाबाबत बोलत असल्याचे ऐकू येते. हा आरोप नाकारणारी ट्रम्प यांची ध्वनिचित्रमुद्रित साक्ष पाहण्याची संधीही ज्युरींना देण्यात आली. पण एकंदरच न्या. कॅप्लन यांचा अनुभव आणि उभय बाजूच्या वकिलांची ख्याती लक्षात घेता योग्य सुनावणी न झाल्याबाबतचे ट्रम्प यांचे अपील फारसे टिकू शकणार नाही, असे जाणकार सांगतात. कॅरोल यांचे वकील राॅबर्ट कॅप्लन (ज्यांचा न्यायाधीश कॅप्लन यांच्याशी कोणताही संबंध नाही) एबीसी वाहिनीवर म्हणाले की, ट्रम्प यांचे अपील टिकण्याची अजिबात शक्यता नाही.

ट्रम्प कॅरोल यांना भरपाई देणार का? न दिल्यास काय होऊ शकेल?

फ्लोरिडातील मार ए लागो रिसाॅर्ट व्यतिरिक्त ट्रम्प यांच्याकडे नॅशनल डोराल मिआमी आणि अन्य दहाबारा गोल्फ कोर्सची मालकी आहे. या खटल्यातील भरपाईची रक्कम भरण्यासाठी ट्रम्प कॅम्पेन फंडाचा वापर करू शकत नाहीत. पण ते आपल्या समर्थकांकडून निधी उभारू शकतात. कारण हा संपूर्ण खटलाच विरोधकांचा एक राजकीय कट असल्याचा त्यांचा दावा आहे. याआधी ट्रम्प यांच्या पाठिराख्यांनी ते अध्यक्ष असताना मेक्सिको सीमेवर भिंत उभारण्यासाठी क्राऊड फंडिंगद्वारे २५ दशलक्ष डाॅलरचा निधी उभारला होता. मात्र आपण कॅरोल यांना कधीही भेटलो नाहीत, या दाव्यावर ट्रम्प ठाम आहेत. २०२४ मध्ये आपण पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्यात आडकाठी आणण्यासाठीच हा खटला गुदरण्यात आला, असे ते छातोठोकपणे सांगत आहेत. याआधी अन्य खटल्यांत आपल्यावरील आरोप अमान्य करूनही ट्रम्प यांनी भरपाईवजा रक्कम अदा केली होती. सध्या गाशा गुंडाळलेल्या ट्रम्प विद्यापीठ प्रकरणात २०१८ मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना २५ दशलक्ष डाॅलर दिले होते. बिझनेस सेमिनार्सच्या नावाखाली हजारो डाॅलर उकळण्यात आल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला होता. पण भरपाईवजा रक्कम देण्याच्या करारात ट्रम्प यांनी आपण काही चुकीचे केल्याचे मान्य केले नव्हते. आताच्या प्रकरणात आपले अपील प्रलंबित असेपर्यंत कॅरोल यांना भरपाई देण्यास भाग पाडू नये, असा अर्ज ते न्यायालयात करू शकतात. अंतिमत: ट्रम्प यांनी भरपाईस नकार दिला तर, त्यांची मालमत्ता ताब्यात घेणे किंवा त्यांच्या उत्पन्नाच्या अन्य स्रोतांतून वसुली करणे यासाठी न्यायालयाचा आदेश मिळविणे आदी पर्याय कॅरोल यांच्यापुढे आहेत. पण हा खटला केवळ आर्थिक प्राप्तिसाठी नाही, तर आपली झालेली अपकीर्ती धूऊन काढण्यासाठी आहे, असे त्यांनी सीएनएनला सांगितले आहे.

ट्रम्प यांना राजकीय किंमत मोजावी लागेल का?

याचा सध्या पुरेसा अंदाज येत नसला तरी, हा परिणाम फार मोठा नसेल, असे राजकीय तज्ज्ञांना वाटते. अश्लिल चित्रपटांतील नटीशी असलेल्या कथित संबंधांबाबत तिने वाच्यता करू नये, यासाठी ट्रम्प यांनी कथितरित्या तिला दिलेल्या पैशांसंदर्भात खोट्या व्यावसायिक नोंदी केल्याचा आरोप आहे. त्यासंबंधीच्या मॅनहटन खटल्यात ट्रम्प यांच्यावर दोषारोपण झाल्यानंतरही संभाव्य रिपब्लिकन प्राथमिक मतदारांचा चांगला कौल ट्रम्प यांना मिळाला होता. यंदा पहिल्या तीन महिन्यांतच ट्रम्प कॅम्पेनने १४.५ दशलक्ष डाॅलर जमविल्याची नोंद आहे. मार्च मध्यात आपणावर गुन्हेगारी स्वरूपाचे दोषारोपण होईल, हे ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर निधी जमा झाला होता. असे असले तरी, मतदारांत लक्षणीय प्रमाण असलेल्या सुशिक्षित शहरी महिलांचे ट्रम्प यांच्याविषयीचे मत प्रतिकूल बनू शकते, असे काही राजकीय व्यूहरचनाकारांना वाटते.

अपील प्रक्रियेत कालापव्यय होईल का?

हे अपील वेगाने निकाली निघू शकते, पण संघीय अपील न्यायालयांत कधी-कधी असे निर्णय होण्यास वर्ष किवा त्याहून अधिक काळ लागतो. त्यातच कॅरोलबाईंचा ट्रम्प यांच्या विरोधातील आणखी एक बदनामीचा दावा, जो त्यांनी २०२० मध्ये दाखल केला होता, अपील प्रक्रियेत रखडला आहे. खरे तर त्यात कायद्याच्या एकाच मुद्दावर निर्णय व्हायचा आहे. त्या दाव्यात कॅरोल यांनी ट्रम्प यांच्यावर केवळ बदनामीचा आरोप केला होता. कारण कालमर्यादेच्या कायद्यामुळे (लिमिटेशन) त्यांना या प्रकरणात लैंगिक अत्याचारांबद्दल दाद मागता आली नव्हती. त्यानंतर २०२० मध्ये त्यांनी आपला दुसरा दावा दाखल केला. कालमर्यादेची आडकाठी आलेली लैंगिक छळाची प्रकरणेही न्यायालयात उपस्थित करण्याची मुभा त्या वेळी न्यूयाॅर्कमध्ये मंजूर केलेल्या कायद्यानुसार देण्यात आली. त्या खटल्यात संघीय (फेडरल) अपील न्यायालयाने न्या. कॅप्लन यांचा त्या वेळचा निर्णय या वर्षारंभी रद्द केला होता. हा दावा परत कॅप्लन यांच्याकडे पाठविला होता. लोकसेवक किंवा सरकारी कर्मचाऱ्याला बदनामीच्या दाव्यापासून संरक्षण देणारा कायदा या प्रकरणात लागू होतो काय, हे तपासून पाहावे, असे त्यांना वरिष्ठ न्यायालयाने सांगितले होते.

हेही वाचा : लैंगिक शोषण प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी, ठोठावला ‘इतक्या’ कोटींचा दंड

ट्रम्प यांच्यापुढे अन्य कायदेशीर पेच कोणते?

याशिवाय ट्रम्प यांच्याविरोधात दोन गुन्हेगारी स्वरुपाच्या प्रकरणांत विधि खात्याच्या विशेष अधिवक्त्याच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. यातील एक प्रकरण हे राष्ट्राध्यक्ष पद सोडल्यानंतरही गोपनीय कागदपत्रे ताब्यात ठेवण्याचे, तसेच दुसरे प्रकरण २०२० मधील निवडणुकीतील पराभव हाणून पाडण्याबाबतचे आहे. त्याच काळात जाॅर्जियातील पराभवानंतरच्या गुन्हेगारी कारवायांबाबतही तेथील कौंटी प्राॅसिक्युटरकडून तपास सुरू आहे. अर्थात ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून आपण राजकारणाचे बळी असल्याचा दावा केला आहे.