– संजय जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील किरकोळ महागाईने दीड वर्षांतील नीचांकी पातळी गाठली आहे. एप्रिल महिन्यात हा दर ४.७० टक्क्यांवर घसरला आहे. मार्च महिन्यात हा दर ५.६६ टक्के होता. रिझर्व्ह बँकेचे किरकोळ महागाई दराचे उद्दिष्ट ४ टक्के आहे. त्यात दोन वा सहा टक्क्यांपर्यंत अधिक-उणे होणे गृहीत धरलेले असते. त्यामुळे महागाई दरातील घसरणीमुळे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

महागाईत घट कशामुळे?

सरासरीपेक्षा कमी तापमान असल्यामुळे नाशवंत वस्तूंच्या भावात होणारी हंगामी वाढ मागील महिन्यात कमी नोंदवण्यात आली. यामुळे महागाई दरात घसरण झाली. सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये अन्नधान्याच्या महागाईचा दर कमी होऊन ३.८४ टक्क्यांवर आला. याचवेळी ग्रामीण आणि शहरी महागाईचा दर घसरून अनुक्रमे ४.६८ टक्के आणि ४.५८ टक्क्यांवर आला आहे. याचवेळी भूराजकीय तणावामध्ये एप्रिलमध्ये वाढ झाली. त्यामुळे महागाई दरात मोठी घसरण होऊ शकली नाही. एप्रिलमध्ये प्रामुख्याने इंधनाच्या महागाईत घट नोंदवण्यात आली. याचवेळी खाद्यतेल आणि तृणधान्यांची महागाई कमी झाली असली तरी दूध आणि डाळींची महागाई कायम आहे.

आगामी काळात चित्र काय असेल?

मे आणि जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर ४.७ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा ‘इक्रा’चा अंदाज आहे. हवामानातील बदलांमुळे आगामी काळात महागाई दरात वाढ होण्याची भीतीही आहे. कारण मोसमी पावसावरील ‘एल निनो’च्या प्रभावामुळे कृषी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात अन्नधान्याची महागाई वाढू शकते. मे महिन्यात मात्र महागाई दरातील घट कायम राहण्याचे संकेत आहेत. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांच्या खाली राहण्याचा अंदाज आहे. नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत तो वाढण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांच्या वर जाऊ शकतो. चालू आर्थिक वर्षात हा दर सरासरी ५ टक्के राहील, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.

व्याजदर वाढीवर परिणाम काय?

एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दरात घसरण झाली असली तरी औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील घट चिंताजनक आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक आढावा बैठक जूनमध्ये होत आहे. त्यावेळी महागाई दरातील घसरणीमुळे व्याजदरात वाढ होणार नाही, मात्र कपातीची शक्यताही कमी आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांबाबत ‘जैसे थे’ भूमिका कायम राहण्याचा अंदाज आहे. महागाई दराबाबत सावध भूमिका बँकेकडून कायम राहील. कारण जागतिक पातळीवरील मंदीचे वारे, जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून घेतले जाणारे निर्णय आणि देशांतर्गत विकासाचे चक्र या सर्व बाबींचा विचार रिझर्व्ह बँकेला करावा लागेल.

किरकोळ महागाई दर का महत्त्वाचा?

रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण ठरवताना प्रामुख्याने किरकोळ महागाई दराचा विचार केला जातो. मागील आर्थिक वर्षात महागाईचा आलेख ७.७९ टक्क्यांपर्यंत उंचावला होता. महागाई आटोक्यात आणण्यासाठी, मागील वर्षीच्या मे महिन्यापासून यंदाच्या एप्रिलपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात तब्बल अडीच टक्के वाढ करण्यात आली. आता रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले असले तरी हा तात्पुरता थांबा असल्याचे संकेत दिले आहेत. चालू वर्षात पहिल्यांदाच मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर ६ टक्क्यांच्या खाली आला. तो आता ५ टक्क्यांच्या खाली घसरला आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेकडून आगामी पतधोरणात काहीशी शिथिल भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : विश्लेषण : डिजिटलायझेशनमुळे टाकसाळी संकटात?

रिझर्व्ह बँकेची भूमिका काय?

किरकोळ महागाई दरातील घसरणीबद्दल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी समाधान व्यक्त केले आहे. पतधोरण योग्य मार्गावर असल्याचे हे निदर्शक असल्याचे दास यांनी म्हटले आहे. महागाई दरात घसरण होत असताना दास यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक चित्र मांडले आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६.५ टक्के राहील आणि जागतिक विकासात भारताचे १५ टक्के योगदान राहील, असा दावाही दास यांनी केला आहे. मात्र महागाईत घट झाल्यामुळे पतधोरणात शिथिलता आणण्याबद्दल त्यांनी मौन धारण केले आहे. त्यामुळे ८ जूनला पुढील पतधोरणावेळी रिझर्व्ह बँकेची नेमकी भूमिका स्पष्ट होईल.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis of rbi interest rate inflation repo rate financial policy print exp pbs