– संदीप नलावडे
अथांग समुद्रकिनारा आणि घनदाट झाडींमध्ये दडलेले डोंगर हे केरळचे वैभव. ‘गॉड्स ओन कंट्री’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या या राज्यात पर्यटकांचा ओघ नेहमीच वाढलेला असतो. पर्यटकांच्या सुविधेसाठी आणि स्थानिक दळणवळणासाठी या राज्यात जलवाहतूक वाढीस लागलेली आहे. मात्र सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता जलवाहतूक केली जात असल्याने केरळमध्ये अनेकदा बोट उलटल्याच्या दुर्घटना घडतात. नुकत्याच झालेल्या बोट दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आणि या राज्यातील जलवाहतुकीविषयी…
केरळमधील बोट दुर्घटनेविषयी…
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात बोट बुडाल्याची दुर्घटना घडली. तनूर भागातील ओट्टमपूरमजवळ एक डबल डेकर हाऊसबोट ४० प्रवाशांना घेऊन जात असताना उलटली. या बोटीतील २२ जणांचा मृत्यू झाला आणि सात जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. बोट उलटल्यानंतर अनेक जण बोटीखाली अडकले. अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. रात्रभर बुडालेल्या प्रवाशांचा शाेध घेण्यात आला. त्यानंतर या बोटीचे अवशेष किनाऱ्यावर आणण्यात आले.
बोट बुडाल्याची कारणे काय?
बोट दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी केरळ सरकारने तात्काळ समिती नेमली. या पर्यटन कंपनीने बोट सेवा देताना सुरक्षेचे पालन केले आहे की नाही याचा तपास करण्यात येणार असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी सांगितले. या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते, अशी माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही बोटी अधिक प्रवाशांच्या संख्येमुळे उलटली आहे. या बोटीमध्ये ४० पेक्षा जास्त प्रवासी होते, जे क्षमतेपेक्षा अधिक आहेत. या बोटीची प्रवासी क्षमता केवळ २० होती. ही बोट चालविण्यासाठी योग्य नव्हती, अशी माहिती मल्याळम वृत्तवाहिनी ‘मनोरमा’ने दिली आहे.
पर्यटक बोटींसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य असतानाही ही बोट या प्रमाणपत्राशिवाय कार्यरत होती. ही बोटी पूर्वी मासेमारीसाठी वापरली जात होती. मात्र बोटीच्या मालकाने पर्यटन सेवेच्या उद्देशाने तिचे पर्यटक बोटीमध्ये रूपांतर केले होते, अशी माहिती या वृत्तवाहिनीने दिली. २० प्रवाशांची क्षमता असतानाही दुप्पट प्रवासी भरल्याने ही बोट एका बाजुला झुकत असल्याच्या इशाऱ्याकडे बोट चालविणाऱ्यांनी दुर्लक्ष केले. या बोटीला फक्त दोन बाहेर पडण्याचे दरवाजे आणि काचेच्या खिडक्या होत्या. त्यामुळे दुर्घटना घडली, त्यावेळी प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. केरळमध्ये संध्याकाळी ६ नंतर जहाजे चालविण्यास परवानगी नसतानाही या नियमाचे उल्लंघन करण्यात आले.
केरळमध्ये वारंवार बोट दुर्घटना का घडतात?
केरळमध्ये अंतर्देशीय क्रूझ पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. अनेक बोटी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन प्रवास करतात याकडे प्रशासनाचे लक्ष नसते. केरळ दुर्घटनेतील बोटी मुळात मासेमारी बोट होती. या मासेमारी बोटीचे रूपांतर डबलडेकर बोटमध्ये कसे करण्यात आले, या मासेमारी बोटीला अंतर्देशीय पर्यटन करण्यासाठी मंजुरी कशी मिळाली याबाबत काहीच स्पष्ट झालेले नाही. केरळमध्ये अशा अनेक पर्यटन बोटी नियमांचा भंग करून व्यावसाय करत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार केरळमध्ये ३,२१३ अंतर्देशीय पर्यटन बोटी कार्यरत आहेत. परंतु परवाना न घेता अनेक बोटी कार्यरत असल्याची माहिती स्थानिक देतात. अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या पर्यटन बोटींची संख्या हजाराच्या घरात असल्याची माहिती पुढे आली आहे.
२००९ मध्ये एका बोट दुर्घटनेनंतर माजी न्यायमूर्ती ई. मोईदीन कुंजू यांनी जलवाहतुकीचे नियमन करण्यासाठी जलद गतीने सागरी मंडळ स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आठ वर्षांनी २०१७ मध्ये बंदरे संचालनालय, केरळ राज्य सागरी विकास आयोग लिमिटेड आणि केरळ मेरीटाईम सोसायटी यांचे विलीनीकरण करून केरळ सागरी मंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र सहा वर्षांत या मंडळाचे कार्य कूर्मगतीने सुरू आहे. केरळमधील हाऊसबोटींसह सर्व पर्यटक जहाजांची तंदुरुस्ती, परवाना आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी असलेल्या मेरीटाइम बोर्डाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. परवान्याचे नियतकालिक नूतनीकरण टाळणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणताही विभाग नाही. जलपर्यटनाची प्रचंड क्षमता असलेल्या या राज्यात जलपर्यटन करणाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात नाहीत, त्यामुळे अशा दुर्घटना होत आहेत.
केरळमधील काही बोट दुर्घटना…
केरळमध्ये गेल्या ५० वर्षांत बोट बुडाल्याच्या अनेक लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी १५ ते २० मोठ्या दुर्घटना आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९२४ मध्ये कोल्लमहून कोट्टायमला जाणारी बोट बुडाल्याने २४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मल्याळम साहित्यातील महामेरू महाकवी कुमारन आशान यांचा मृत्यू झाला. १९८० मध्ये कोचीजवळील कन्नमली येथील स्थानिक चर्चच्या यात्रेकरूंना घेऊन जाणारी फेरीबोट बुडाल्याने ३० जणांना जलसमाधी मिळाली. १९८३मध्ये एर्नाकुलम जिल्ह्यातील वल्लारपडम भागात चर्चमधील मेजवानीनंतर परतत असताना बोटीच्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला.
हेही वाचा : विश्लेषण : भाजपच्या केरळ मोहिमेला बळ? नवा मित्र आघाडीत येण्याची चिन्हे!
२००२ मध्ये अलाप्पुळा येथून निघालेली केरळ जलवाहतूक विभागाची बोट कोट्टायम जिल्ह्यात कुमारकोमजवळ उलटल्याने २९ जणांना प्राण गमवावे लागले. २००७ मध्ये एर्नाकुलम जिल्ह्यातील पेरियात नदीत बोट उलटून १४ विद्यार्थ्यांचा आणि तीन शिक्षकांचा मृत्यू झाल्याने शाळेच्या सहलीचे शोकांतिकेत रूपांतर झाले. २००९ मध्ये ‘जलकन्याका’ ही डबलडेकर प्रवासी बोट मुल्लापेरियार जलाशयातील एका खोलगट भागात उलटल्याने ४५ पर्यटकांचा मृत्यू झाला. ७५ क्षमतेच्या या बोटीत ९० हून अधिक प्रवासी होते.