– संजय जाधव

विमान प्रवासदरम्यान खराब हवेमुळे बसणारे धक्के अनेक वेळा आपण अनुभवतो. परंतु हवामान चांगले असतानाही विमान प्रवासात धक्के बसू लागले आहेत. विमान अचानक उंचीवरून काही मीटर खाली येते आणि प्रवाशांच्या पोटात गोळा येतो. ते खिडकीतून बाहेर पाहतात त्यावेळी ढग, वादळ अथवा खराब हवेचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. प्रवाशांना काय घडत आहे, हे कळत नाही. याला कारणीभूत असतात जोरदार वारे. हे वारे कमी आणि जास्त दाबाच्या केंद्राभोवती फिरत असतात. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे वारे दिसत असतात. तरीही त्या मार्गाने विमाने नेली जातात. यामागील कारण काय?

important research for army fighter mig 29 aircraft
लष्कराच्या लढाऊ ‘मिग २९’ विमानासाठी महत्त्वपूर्ण संशोधन… पुण्यातील ‘एनसीएल’कडून नवी प्रणाली विकसित!
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
police registered two cases over bomb rumors on plane pune
विमानात बाँम्बची अफवा; पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल, अफवा पसरविण्याचे प्रकार वाढीस
nearly 80 flights receive bomb threats
Flight Receives Bomb Threat : २४ तासांत ८० अफवा; नऊ दिवसांत विमान कंपन्यांना ६०० कोटींचे नुकसान
implementation of hawkers policy stalled for ten years
विश्लेषण : मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी दहा वर्षे का रखडली? मुजोर फेरीवाल्यांना ‘राजकीय आशिर्वाद’?
airline industry in chaos after 90 hoax bomb threats in a week
अन्वयार्थ : धोका, अफवा आणि उड्डाण!
airlines hoax call
बॉम्बच्या खोट्या धमक्यांनी विमान कंपन्यांना किती आर्थिक नुकसान होतं?
Shrikrishna and Rukmini Shitole parents of Maitreyee Shitole pilot who performed emergency landing, saving 141 lives new
“तो थरार ऐकून…”, १४१ प्रवाशांचे प्राण वाचवणारी जिगरबाज पायलट मैत्रेयी शितोळेचं आईकडून कौतुक!

नेमके काय घडते?

हवेचा जोरदार प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहात असतो. उपग्रहाद्वारे घेतलेले छायाचित्र पाहिल्यास आपल्याला हवेच्या वक्राकार रेषा दिसतात. हवेचे कमी आणि जास्त दाबाचे केंद्र जिथे तयार होईल त्याभोवती हे वारे फिरते. त्यामुळे त्या ठिकाणी वाऱ्याला निश्चित अशी दिशा नसते. या वाऱ्यातून विमान गेल्यास ते अचानकपणे खाली सरकते. यामुळे प्रवाशांना धक्का बसतो. प्रवाशांना खिडकीतून बाहेरील हवा मात्र, सामान्य दिसत असते. त्यामुळे विमानात तांत्रिक बिघाड झाला की काय, अशी शंका प्रवाशांना येते. प्रत्यक्षात हा प्रकार जोरदार वाऱ्यामुळे घडलेला असतो.

मार्ग का बदलला जात नाही?

उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांत हवेचा जोरदार प्रवाह दिसत असूनही त्या मार्गाने विमान नेण्याचा निर्णय विमान कंपन्या घेतात. विमान कंपन्या वेळ वाचविण्यासाठी आणि अंतर कमी करण्यासाठी या वाऱ्यातून जाण्याचा मार्ग निवडतात. डोळ्याला दिसू न शकणारे हे जोरदार वारे प्रत्यक्षात विमानाच्या पंख्यांना मोठा धक्का देतात. त्यामुळे विमान अचानक खाली घसरते. अलीकडच्या काळात जगभरात अशा जोरदार वाऱ्यांचे प्रमाण ५५ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना बसणारे धक्केही वाढत आहेत. पुढील ३० ते ६० वर्षांत अशा वाऱ्यांचे प्रमाण १०० ते २०० टक्क्यांनी वाढणार आहे.

प्रवाशांना पूर्वसूचना का नाही?

वैमानिकाला ढग आणि पाऊस रडारवर स्पष्टपणे दिसतात. हवा खराब असल्यास प्रवाशांना सीटबेल्ट लावण्याची सूचना वैमानिक करतो. परंतु बाहेरील हवा स्वच्छ असताना वाहणारे जोरदार वारे रडारवर दिसत नाही. दृश्यमानतेला स्पष्ट हवेमुळे कोणताही अडथळा येत नाही. वैमानिकाला जोरदार हवेच्या प्रवाहात गेल्यानंतर त्याची जाणीव होते. तोपर्यंत विमानाला धक्का बसून त्याच्या उड्डाणाची उंची अचानक कमी झालेली असते. त्यामुळे प्रवाशांना याची पूर्वसूचना देत येत नाही. या वाऱ्याची पूर्वसूचना देता येत नसल्याने निर्माण होणारा धोकाही जास्त असतो.

वारे कशामुळे निर्माण होतात?

सूर्याच्या उष्णतेमुळे हे वारे निर्माण होतात. सकाळी सूर्यामुळे जमीन तापण्यास सुरुवात होते. त्यातून जमिनीच्या जवळची हवा तापते. गरम हवेची घनता थंड हवेपेक्षा कमी असल्याने ती उंचावर जाते. थंड हवा खाली आणि गरम हवा वर असे चक्र नियमितपणे सुरू असते. त्यामुळे जोरदार हवेचे प्रवाह सुरू होतात. त्यातून विमान गेल्यास पंख्यांना धक्का बसतो. हा धक्का हवेच्या प्रवाहाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. विमान अचानक खाली आणि वर होत असल्याने बेसावध असलेल्या प्रवाशांना मोठा धक्का बसतो. उत्तर अटलांटिक विभागात अशा वाऱ्यांचे प्रमाण १९७९ ते २०२० या कालावधीत १७ ते ५५ टक्के वाढल्याचे ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या संशोधनातून समोर आले आहे.

हेही वाचा : Money Mantra: विमान उद्योग बाजारपेठेत गुंतवणूक करावी की, नाही?

आगामी काळात काय परिणाम होणार?

सध्या हवेच्या जोरदार प्रवाहामुळे विमानांना बसणारे धक्के कमी आहेत. सरासरी आठ तासांच्या विमान प्रवासात ३० सेकंदांचे धक्के बसत आहेत. पुढील काळात हा कालावधी १० ते १५ मिनिटांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. पुढील काही दशकांत हे प्रमाण दुप्पट ते तिप्पट वाढेल. हे धक्के हवेच्या कमी, मध्यम, जास्त तीव्रतेनुसार बसतात. तापमान बदलामुळे अशा हवेच्या प्रवाहांमध्ये वाढ होत आहे. केवळ प्रवाशांना धक्का बसण्यापुरता त्याचा परिणाम मर्यादित नाही. त्यामुळे विमानाची हानीही होते. त्यामुळे विमानांचा देखभाल आणि दुरुस्ती खर्च वाढला असून, आगामी काळात त्यात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे आगामी काळात विमान प्रवास आणखी ‘धक्कादायक’ ठरणार आहे.

sanjay.jadhav@expressindia.com