दत्ता जाधव
राज्याच्या साखर उद्योगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावी, अशी क्रांतिकारी घटना सोमवारी, ६ नोव्हेंबर रोजी घडली आहे. ही गंधक, रसायनमुक्त साखरनिर्मितीची घटना इतकी महत्त्वपूर्ण का आहे?
गंधक, रसायनमुक्त साखरनिर्मिती?
साखर उद्योग हा देशातील शेती आधारित उद्योगातील सर्वात जुना उद्योग. आधुनिक काळात देशात पहिला साखर कारखाना सुरू करण्याचा मान डचांना जातो. त्यांनी १७८९ मध्ये मोतीपूर येथे पहिला साखर कारखाना उभारला. १९५० मध्ये पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी देशात १५८ साखर कारखान्यांनी ११ लाख १६ हजार टन साखर उत्पादन केले होते. त्यांची उत्पादन क्षमता १५ लाख ४० हजार टन होती. तेव्हापासून प्रामुख्याने तांबूस किंवा काळसर साखर पांढरी शुभ्र बनविण्यासाठी गंधक आणि रसायनांचा वापर केला जातो. राज्याच्या साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच साखरनिर्मिती प्रक्रियेत मोठा बदल करण्याचा प्रयोग राज्यात झाला आहे.
हेही वाचा >>> इस्रायलला एक लाख भारतीय मजुरांची गरज; युद्धामुळे इस्रायलवर कोणते परिणाम झाले?
साखरनिर्मितीत कोणत्या रसायनांचा वापर?
उसाच्या रसाच्या शुद्धीकरणासाठी वेगवेगळय़ा देशांत वेगवेगळय़ा प्रक्रियांचा अवलंब केला जातो. भारतात मुख्यत्वेकरून दुहेरी सल्फिटेशन म्हणजे सल्फर डायऑक्साइडच्या मदतीने विरंजनाची प्रक्रिया केली जाते. तांबूस किंवा काळय़ा साखरेची पांढरी साखर तयार करण्यासाठी सर्व कारखाने दुहेरी सल्फिटेशन पद्धतीचा अवलंब करतात. साखरनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान एकाच वेळी चुन्याची निवळी व सल्फर डायऑक्साइड पात्रात सोडून रासायनिक प्रक्रिया केली जाते. रसात असलेले अविद्राव्य घटक, तरंगणारे तंतुमय पदार्थ आणि अतिरिक्त कॅल्शिअम कण खाली बसण्यासाठी पॉलीअॅक्रिलिक अमाइड आणि फॉस्फरिक आम्ल या रसायनांचा वापर केला जातो. आटलेल्या रसात काही रंगीत द्रव्ये व रस आटविण्याच्या प्रक्रियेमुळे आलेला काळपटपणा नाहीसा करण्यासाठी रस सल्फायटरच्या टाकीत सोडला जातो. तिथे सल्फर डायऑक्साइड वायू सोडून विरंजनाची प्रक्रिया केली जाते.
रसायनमुक्त साखरनिर्मिती कशी झाली?
नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड (रांजणी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या कारखान्यात ६ नोव्हेंबर २०२३ रोजी साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच गंधक आणि रसायनमुक्त साखरेचे उत्पादन घेतले गेले. साखर उत्पादनप्रक्रियेत गंधक व कोणत्याही प्रकारच्या घातक रसायनाचा वापर न करता ऑरगॅनिक एन्झाइम्सचा वापर केला जात आहे. उत्पादनप्रक्रियेत आणि यंत्रसामग्रीमध्ये काही बदल करून १०० टक्के गंधक आणि रसायनमुक्त साखरेचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. यंदाच्या हंगामात नॅचरल शुगर कारखान्यांत सुमारे १० लाख क्विंटल साखर उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा >>> Diwali 2023: दिवाळीत फटाके वाजविणे ही खरंच भारतीय प्राचीन परंपरा आहे का?
रसायनमुक्त साखर कुठे, कशी विकणार?
केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे उत्पादित होणारी आरोग्यदायी साखर स्थानिक बाजारातच विकली जाणार आहे. सामान्य साखर आणि गंधक, रसायनमुक्त आरोग्यदायी साखरेच्या उत्पादन खर्चात फारसा फरक पडत नाही. उत्पादन खर्चात किरकोळ वाढ होत असल्यामुळे सामान्य साखरेच्या दरापेक्षा दीड ते दोन रुपये अधिक दराने आरोग्यदायी साखरेची किरकोळ बाजारात विक्री होईल. ही साखर स्थानिक बाजारातच विक्री करण्याचा कारखाना प्रशासनाचा मनोदय आहे. यापूर्वी कर्नाटकात रेणुका शुगर्ससारख्या कारखान्यांनी कमी गंधक किंवा रसायनमुक्त आणि सेंद्रिय साखरनिर्मिती केली आहे. पण, ती साखर सामान्य साखरेच्या दरापेक्षा जास्त दराने विकली जात आहे; शिवाय ती तांबूस रंगाची आहे. त्यामुळे तिच्या वापरावर मर्यादा आहेत. गंधक, रसायनमुक्त साखर फक्त दीड-दोन रुपये जास्त दराने विकली जाणार आहे. शिवाय ती पांढरी शुभ्र साखर आहे.
आरोग्यदायी साखरेचा उपयोग योग्य ठरेल?
साखर हा एक रासायनिक पदार्थ आहे. साखरनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान उसाच्या रसातील आरोग्यदायी घटक नष्ट होतात. अन्नपचनानंतर शरीरात शरीराच्या गरजेइतकी साखर तयार होते. त्यानंतरही अधिकच्या गोडव्यासाठी मध, सेंद्रिय गूळ, देशी खांड, खजूर साखर (खारीक साखर) आदीचा वापर करणे आरोग्यदायी आहे. पण, कोणत्याही परिस्थितीत रासायनयुक्त साखरेचा वापर शरीराला घातकच आहे. रासायनिक पदार्थ असल्यामुळे साखर खाल्ल्यानंतर ती पचायला वेळही लागतो. त्यामुळे पचनक्रियेवर अधिक ताण येतो. शिवाय शरीरात आम्ल तयार होते. पोटात आम्लता वाढते, रक्तातील आम्लताही वाढते. परिणामी हृदयविकार, मधुमेह, वजन वाढणे, त्वचाविकार आणि मूत्रविकार होण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय रक्तदाब वाढणे, हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता वाढते. निद्रानाश, अकाली वार्धक्य, स्मरणशक्ती कमी होणे आदींचाही सामना करावा लागतो. आरोग्यदायी गंधक, रसायनमुक्त साखरेच्या मर्यादित वापरामुळे वरीलपैकी अनेक व्याधींपासून सुटका मिळू शकते. त्यामुळे नॅचरल शुगरची गंधक आणि रसायनमुक्त साखरेची निर्मिती राज्याच्या साखर उद्योगाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे.
dattatray.jadhav@expressindia.com