– हृषिकेश देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विद्यार्थ्यांचे यश हे खरेतर कोणत्याही शाळेसाठी महत्त्वाचे असते. परंतु मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील गंगा जमुना उच्च माध्यमिक शाळा आता अशाच कारणासाठी अडचणीत आली आहे. गेल्या महिन्यात राज्यात इयत्ता दहावीचा निकाल लागला. शाळेच्या परिसरातील फलकावरील गुणवंतांच्या छायाचित्रात १८ विद्यार्थ्यांपैकी चार बिगरमुस्लीम विद्यार्थिनींना हिजाबमध्ये दाखवण्यात आल्याने वाद सुरू झाला. या प्रकरणी सात जून रोजी शाळा व्यवस्थापन समितीच्या ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक या वर्षाअखेरीस असल्याने यावरून ध्रुवीकरणाधारित राजकारण सुरू झाले. या साऱ्यात पालक तसेच विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.
प्रशासनाची भूमिका काय?
दमोहनजीक फुटेरा प्रभाग परिसरात कामगार वस्तीमध्ये गंगा जमुना ही अल्पसंख्याकांकडून चालवली जाणारी एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा. आता अस्तित्वासाठी या शाळेचा संघर्ष सुरू आहे. या शाळेवर धर्मांतराचे तसेच इक्बाल यांची ‘लब पे आती है दुवा’ ही कविता म्हणण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. दमोह जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देत पालकांशी चर्चा केली. त्यावर त्यांनी अहवाल सादर केला. त्याआधारे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांनी धर्मांतराच्या आरोपांबाबत शाळेचा काही दोष नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरू केले. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांवर शाईफेक करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या निलंबनाचीही मागणी करण्यात आली. प्रशासनाने निर्दोषत्व बहाल केल्यानंतरही राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले. तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्रपूर येथे लाडली बहना कार्यक्रमात बोलताना याचा उल्लेख केला. मध्य प्रदेशात अशा गोष्टींना थारा नाही असा इशारा चौहान यांनी दिला. ही वक्तव्ये पाहता निवडणुकीच्या तोंडावर या घटनेला राजकीय वळण लागले हे स्पष्ट होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांनीही या साऱ्या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली.
राजकारण पेटले…
मध्य प्रदेशात २१ टक्के आदिवासी आहेत. शाळेतील या घटनेत धर्मांतराचा आरोप केल्याने राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याशी हे निगडित असल्याने राज्यभर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेसने या मुद्द्यावर सुरुवातीला प्रतिक्रिया दिली नाही. शाळेची बाजू घेतल्यास हिंदू मते जाण्याचा धोका पक्षाला वाटला. यात अधिक भाष्य केल्यास भाजपच्या सापळ्यात अडकू अशी धास्ती काँग्रेसला होती. उच्चस्तरीय समिती याची चौकशी करत आहे. ती आधी पूर्ण होऊ दे, असे मत दमोहचे काँग्रेस आमदार अजय टंडन यांनी व्यक्त केले. भोपाळ येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी पूर्ण चौकशी केल्याशिवाय शाळेवर बुलडोझर चालवणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले.
शाळेवर कारवाई
नियम पालनात कुचराई केल्याच्या आरोपाखाली शाळेवर निलंबनाची कारवाई शिक्षण खात्याने केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या शाळेमध्ये एकूण १२०८ विद्यार्थी आहेत. शाळा परिसरातील काही बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालविल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता आहे. आता दुसरीकडे जायचे झाल्यास या विद्यार्थ्यांना कुठे प्रवेश मिळणार, असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. गेल्या १२ वर्षांमध्ये शाळेबद्दल कोणतीही तक्रार नव्हती असे काही पालकांनी नमूद केले. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.
हेही वाचा : मुस्लीम मुलीशी लग्न करा आणि रोख ११ हजार रुपये बक्षिस मिळवा; हिंदू धर्म सेनेची हिंदू मुलांना ऑफर
राजकीय कंगोरे
चौकशी होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. शाळा प्रशासनाची चूक असेल तर कठोर कारवाई व्हायला हवी. मात्र निव्वळ वातावरणनिर्मिती करून शाळा बंद पडली तर, विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याचा धोका आहे. कारण या परिसरातील ही एकमेव इंग्रजी शाळा आहे. राज्यात वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक आहे. त्यातील लाभाची गणिते डोळ्यापुढे ठेवून या घटनेकडे पाहिले जाऊ नये, अशी बहुतांची इच्छा आहे.