– अनिकेत साठे

बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याची रशियाची योजना अंतिम टप्प्यात आहे. सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर अशा प्रकारे पहिल्यांदा शस्त्रास्त्रे रशियाबाहेर नेण्यात येत आहेत. युक्रेनला रसद पुरविणाऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांना शह देण्यासाठी रशियाने हे डावपेच आखले. त्याचे पडसाद उमटत आहेत. रशियाच्या कृतीने जगावर नव्याने आण्विक युद्धाचे मळभ दाटण्याची शक्यता आहे.

Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
China is aggressive again after Taiwans war drills What are chances of war
तैवानच्या युद्धसरावाने चीन पुन्हा आक्रमक? युद्धाची शक्यता किती?
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Eknath Shinde Group , Pratap Sarnaik,
स्बळाच्या नाऱ्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टिकेचे बाण
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”

अण्वस्त्रे तैनात कशी केली जात आहेत?

लांबलेल्या युक्रेन युद्धातून रशिया मागे हटणार नाही, हा संदेश अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अण्वस्त्र तैनातीतून दिला आहे. मार्च महिन्यात सरकारी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सामरिक अण्वस्त्र तैनातीची केलेली घोषणा जुलैमध्ये प्रत्यक्षात येत आहे. बेलारूसमध्ये शस्त्रास्त्रे ठेवण्यासाठी विशेष सुविधा उभारण्यात आली. आण्विक अस्त्रे वाहून नेण्यासाठी एसयू-२५ विमाने सक्षम करण्यात आली. त्यांचा पल्ला एक हजार किलोमीटरपर्यंत आहे. अण्वस्त्रे वाहून नेण्याच्या क्षमतेची इस्कंदर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे रशियाने आधीच बेलारूसला दिलेली आहेत. त्यांचा पल्ला ५०० किलोमीटर आहे. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी अण्वस्त्रांची संख्या आणि तैनातीची जागा निश्चित झाल्याचे मान्य करीत ती बेलारूसमध्ये आणण्याचे काम सुरू झाल्याचे म्हटले आहे.

अण्वस्त्रे तैनात कुठे? क्षमता काय?

रशियाची अण्वस्त्रे लिथुआनियन सीमेपासून जवळ असलेल्या लिडा हवाई तळावर असू शकतात, असा अमेरिकन विश्लेषकांचा अंदाज आहे. हे असे ठिकाण आहे जेथून युक्रेनचा बहुतांश भाग, बाल्टिक राष्ट्रे, पोलंड, हंगेरी, झेक प्रजासत्ताक, रोमानिया, जर्मनीचा काही भाग, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलंडसह जवळपास संपूर्ण पूर्व युरोप माऱ्याच्या टप्प्यात येऊ शकतो. अमेरिकेने १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा, बेलारूसमध्ये तैनात होणारी अण्वस्त्रे तीनपट अधिक शक्तिशाली असल्याचे बेलारूसचे अध्यक्ष सांगतात. त्यांच्या दाव्यात तथ्य असल्यास रशियन अण्वस्त्रे ४८ ते ६३ किलो टन क्षमतेची असण्याचे अनुमान काढले जात आहे. अणुशास्त्रज्ञांच्या एका अहवालानुसार रशियाकडे सुमारे १८१६ (लगेच युद्धात वापरता न येणारी) अण्वस्त्रे आहेत.

रशियाच्या हालचालींचे कारण काय?

युक्रेनला रशियाशी दोन हात करणे सुकर व्हावे म्हणून ब्रिटन, अमेरिका विविध प्रकारची शस्त्रसामग्री पुरवत आहे. त्याअंतर्गत ब्रिटनने विशिष्ट स्वरूपातील युरेनिअम युक्रेनला उपलब्ध केले आहे. त्याचा अवजड चिलखती कवच भेदणाऱ्या दारूगोळ्यात वापर होतो. लष्कराची चिलखती वाहने निष्प्रभ करण्यात ती अतिशय प्रभावी मानली जातात. अमेरिकाही तशा प्रकारचे युरेनियम युक्रेनला देण्याच्या तयारीत आहे. ही बाब रशियाला खटकली. पाश्चिमात्य राष्ट्रांच्या आक्रमक धोरणाला चाप लावण्यासाठी रशियाने बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनातीचा निर्णय घेतला. युक्रेनला पाठबळ देत पाश्चिमात्य राष्ट्रांनी आपल्या विरोधात अघोषित युद्धच पुकारल्याची रशियाची भावना आहे. अस्तित्वाच्या लढाईत स्वत:च्या बचावासाठी रशिया कुठलेही उपाय योजण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे यातून सूचित केले जात आहे.

अण्वस्त्रांवर नियंत्रण कुणाचे?

युरोपमध्ये तैनात केलेल्या अण्वस्त्रांवर अमेरिकेचे नियंत्रण आहे. त्याच धर्तीवर बेलारूसमधील अण्वस्त्रांवर रशिया नियंत्रण ठेवणार आहे. अमेरिकेने १९५० पासून नाटो तळांवर आण्विक शस्त्रे तैनात केलेली आहेत. त्यांची सामरिक अण्वस्त्रे बेल्जिअम, नेदरलँड, जर्मनी, इटली व तुर्की येथील तळांवर आहेत. याबद्दल रशियाने वारंवार चिंता व्यक्त केलेली आहे. रशियन अण्वस्त्रांवर संरक्षण मंत्रालयाच्या १२ व्या मुख्य संचालनाचे नियंत्रण आहे. त्यांच्यामार्फत वाहतूक व अन्य कुठलेही निर्णय घेतले जातात. सोव्हिएत युनियनचे पतन झाल्यानंतर बेलारूस, युक्रेन आणि कझाकिस्तानमध्ये तैनात अण्वस्त्रे रशियाला परत करावीत, यासाठी अमेरिका प्रयत्नशील होती. बेलारूसमध्ये पुन्हा अण्वस्त्रे नेऊन पुतिन यांनी शीतयुद्धानंतर अण्वस्त्र नियंत्रणाचा सेतू डळमळीत झाल्याचे अधोरेखित केले आहे.

अमेरिका, नाटोची प्रतिक्रिया काय?

रशियाची ही कृती नाटोने बेजबाबदार ठरवत तिचा निषेध केला. तर अमेरिकेनेही अण्वस्त्रे तैनातीवर आगपाखड केली आहे. १९६२ मधील क्युबा संकटानंतर जगाला प्रथमच अण्वस्त्रांच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जाते. सामरिक अण्वस्त्रांबाबत पवित्रा बदलण्याचा कुठलाही हेतू नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. रशिया अण्वस्त्र वापरण्याच्या तयारीत नसल्याची पुष्टी त्यांनी जोडली.

हेही वाचा : युक्रेनमधील धरणाची भिंत फुटल्याने अणुऊर्जा प्रकल्पाला धोका? जाणून घ्या नेमके काय घडले?

साध्य काय होणार?

युद्ध सुरू करता येते, मात्र नंतर ते थांबविणे अवघड होते, याची अनुभूती सध्या रशिया घेत आहे. सव्वा वर्षाचा काळ लोटूनही रशियाला युक्रेनशी झुंजावे लागत आहे. युक्रेन इतका कडवा प्रतिकार करेल, याचा अंदाज बांधण्यात ते अपयशी ठरले. अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांकडून युक्रेनला मिळणाऱ्या मदतीमुळे युद्ध निर्णायक अवस्थेत नेणे रशियाला शक्य झालेले नाही. युद्ध जितके लांबते, तितके नुकसान वाढते, आर्थिक भार पडतो. जागतिक निर्बंधात अडकलेल्या रशियासमोर तो एक प्रश्न आहे. या युद्धात अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी रशियाने अण्वस्त्रे तैनातीचे पाऊल उचलले. ही चाल यशस्वी न झाल्यास तो वेगळा विचार करणारच नाही, याची शाश्वती देता येणार नाही.

Story img Loader