राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेरियमचे क्षार असलेले फटाके वाजविण्यावर बंदीचे आदेश केवळ दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिसरासाठी नसून संपूर्ण देशामध्ये लागू आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. याचा मुंबई आणि महाराष्ट्रातील दिवाळीमधील फटाक्यांच्या विक्री आणि आतषबाजीवरही परिणाम होणार आहे. मात्र, बाजारात आधीच हे फटाके विक्रीसाठी आले असून, त्यांची विक्री थांबवण्याचे आव्हान यंत्रणांसमोर असेल.

बेरियमचे दुष्परिणाम काय आहेत?

बेरियम हा अल्कमृदा धातू असून तो रासायनिकदृष्टय़ा अस्थिर असतो. त्यामुळे तो मूलद्रव्याच्या स्वरूपात सापडत नाही. मात्र त्याची संयुगे आढळतात व ती अतिशय विषारी असतात. बेरियमचे आयन अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास त्याचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे कंप सुटणे, अशक्तपणा, भयगंड, श्वसनात अडसर, अर्धागवात यांसारख्या गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका असतो. तसेच डोळे, पचनसंस्था, हृदयक्रिया, श्वसनसंस्था व त्वचेवरही बेरियम दुष्परिणाम करतो. बेरियममुळे पोट आणि आतडय़ांसंबंधी समस्या (उलटय़ा आणि अतिसार) तसेच चेहऱ्याभोवती सुन्नपणा, स्नायू कमकुवत होणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे आणि श्वास घेण्यास त्रास हे आजार उद्भवतात. बेरियम क्षारामुळे श्वसनाचा त्रास होतो. यामुळे फुप्फुसात समस्या निर्माण होऊ शकतात.

हेही वाचा >>> दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आता कृत्रिम पाऊस? जाणून घ्या सविस्तर…

बेरियमचा वापर आणखी कशासाठी?

बेरियमचा वापर साखर साफ करण्यासाठीदेखील केला जातो. कोणत्याही सल्फेट द्रावणात बेरियम क्षाराचे द्रावण जोडल्यास, बेरियम सल्फेटचा पांढरा अवक्षेप प्राप्त होतो. या गुणधर्मामुळे, बेरियमचे विरघळणारे क्षार, विशेषत: बेरियम क्लोराइड, सल्फ्युरिक अ‍ॅसिड आणि सल्फेट क्षारांच्या चाचणीसाठी वापरले जातात. याशिवाय दारूगोळा उद्योग, ऑटोमोबाइल उद्योग, इलेक्ट्रिकल उद्योग, इलेक्ट्रॉनिक उद्योगातही याचा वापर केला जातो. काच, विटा, रंग आणि फरशा बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तेल आणि वायू विहिरींसाठी द्रवपदार्थ ड्रिलिंगमध्ये बेरियम सर्वाधिक वापरले जाते. हे पेंट आणि ग्लासमेकिंगमध्येदेखील वापरले जाते.

बेरियम फटाक्यांमध्ये कसे काम करते?

बेरियम अत्यंत घातक रसायन असून ते फटाक्यांमध्ये वापरले जाते. २०१८ मध्येच भारतात बेरियम तसेच बेरियम क्षारांवर बंदी घालण्यात आली होती. तरीही फटाक्यांमध्ये या रसायनांचा वापर केला जात आहे. बेरियम आणि त्याची सर्व संयुगे विषारी आहेत. बेरियम नायट्रेट चमकदार हिरव्या प्रकाशाने जळते आणि फटाक्यांमध्ये सिग्नल फ्लायर म्हणून वापरले जाते. याचा उपयोग फटाक्यांमध्ये प्रणोदक(प्रॉपलेंट) प्रदान करण्यासाठी केला जातो. बेरियमचा रंग पांढरा आहे. यामुळे फटाक्यात जोरदार स्फोट होतो आणि हिरवा रंगही निर्माण होतो. बेरियम नायट्रेटला ‘कलर स्पार्कलर’ म्हणतात. फटाके फोडताना तांबे क्षार वापरल्यामुळे निळा रंग येतो आणि लिथियमपासून लाल रंग मिळतो.

फटाक्यातील धातू तपासणारी यंत्रणा आहे?

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण तसेच आता सर्वोच्च न्यायालयानेदेखील बेरियम मिठासह घातक धातू तसेच रसायनांपासून बनवलेले प्रदूषक फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. दिवाळी जवळ आली असून फटाक्यांची विक्रीही सुरू झाली आहे. त्यामुळे बेरियमयुक्त फटाके ओळखायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे बंदी असलेल्या फटाक्यांतील धातू तपासणारी संसाधने सोडा, पण फटाक्यांची चाचणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. ही जबाबदारी नॅशनल एन्वायर्नमेंट इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट आणि पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनचे असल्याचे भोपाळ येथील मंडळाचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> सल्फर डाय ऑक्साइड ते ओझोन, हवा प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक कोणते? जाणून घ्या….

हरित फटाक्यांमध्येही बेरियम?

नेहमीच्या फटाक्यांना पर्याय म्हणून बाजारात हरित फटाके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले, पण आता तेदेखील घातक असल्याचे पर्यावरणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे म्हणणे आहे. सध्या बाजारात मिळणाऱ्या काही फटाक्यांमध्ये बेरियम हा घातक धातू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बंदी असूनही हा घटक फटाक्यांमध्ये वापरला जात असल्याने त्याच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी या स्वयंसेवी संस्थांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे काय?

प्रदूषण व पर्यावरण संरक्षण हे फक्त न्यायालयाचे काम नाही, तर वायू व ध्वनिप्रदूषण कमी करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत लोकांना जागृत करणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांपेक्षाही प्रौढ व्यक्ती फटाके अधिक फोडतात. त्यामुळे लोकांनीच आता याविरोधात समोर यायला हवे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.