– दिशा काते
दरवर्षीप्रमाणे सध्याही मुंबईच्या किनाऱ्यांवर जेली फिश आणि स्टिंग रेच्या वावराची चर्चा सुरू झाली आहे. २०१३ साली अनंतचतुर्दशीच्या दिवशी या माशांच्या दंशामुळे काहीजण जखमी झाले आणि तेव्हापासून या दोन्ही जलचरांच्या वावराची चर्चा मुंबईत दरसाल होते. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या समुद्रकिनारी जेलिफिश आढळून आले आहेत. त्यांचा नागरिकांना दंश झाला. हे जेलिफिश आणि स्टिंग रे अचानक कुठून येतात, त्यांचा दंश किती धोकादायक, काय काळजी घ्यावी असे मुद्दे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
जेलिफिश आणि स्टिंग रे कसे असतात?
‘जेलिफिश’ असे म्हटले जात असले तरी तो मत्स्यकुलीन समुद्रीजीव नाही. जेलिफिश हे साधारण हवा भरलेल्या निळ्या पिशवीसारखे दिसतात. त्याच्यावर बारीक तंतूंची झालर असते. जेलिफिशच्या जगभरात पन्नासहून अधिक प्रजाती आढळतात. समुद्राला भरती आल्यावर वजनाने हलके असलेले जेलिफिश समुद्रकिनाऱ्याजवळ येतात. मुंबईकरांना धडकी भरवणारा दुसरा जीव म्हणजे स्टिंग रे. त्याला मराठीत पाखट म्हटले जाते. हा सागरीजीव माशासारखा दिसत नसला तरी तो मात्र मत्स्यवर्गातीलच आहे. स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यात हे मासे अनेकदा सापडतात. पाखटाच्या जगभरात आढळणाऱ्या अनेक प्रजातींपैकी जवळपास ४५ प्रजातींचे अस्तित्व धोकादायक स्तरावर आहे.
मुंबईच्या किनारी जेलिफिश आणि स्टिंग रे अचानक का अवतरतात?
मुंबईत अचानक जेलिफिश किंवा स्टिंग रे येत नाहीत. साधारण मे महिन्यापासून मुंबईच्या किनाऱ्यांवर जेलिफिश दिसू लागतात. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जेलिफिशचा वावर अधिक प्रमाणात दिसून येतो. सहसा ते ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये हे जीव मोठ्या प्रमाणावर आढळतात. मुंबई किनारपट्टीला वेगवान पाण्याचा प्रवाह नाही. त्यामुळे जेलिफिश सारख्या जलचरांसाठी येथे मुबलक प्रमाणात ‘प्लवंग’सदृश्य खाद्य तयार होत असते. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत प्लवंगाची निर्मिती अधिक होत असल्यामुळे जेलिफिशचाही वावर वाढतो. पावसाळा ओसरू लागला की समुद्राच्या तापमानात वाढ होऊ लागते. त्याचबरोबर माशांचे थवेही स्थलांतरित होऊ लागतात. या कालावधीत स्टिंग रे प्रजननासाठी किनारी भागात येतात.
या सागरीजीवांचा धोका किती?
जेलीफिशचा दंश वेदनादायक असला तरी आपत्कालीन नसतो. वेदना, लाल खुणा, खाज सुटणे, बधीरपणा किंवा ठराविक दंशाने मुंग्या येतात. परंतु काही प्रकारच्या जेलीफिशचे दंश जसे की बॉक्स जेलीफिश (ज्याला सी व्हॅपदेखील म्हणतात) खूप धोकादायक असतात आणि ते प्राणघातकही असू शकतात. मात्र सध्या मुंबईच्या किनाऱ्यांवर आढळणारा ब्लू बॉटल जेलीफिश हा खूप विषारी नसतो. स्टिंग रेच्या शेपटीवरील काटा लागल्यास ते वेदनादायी असते. त्याच्या काट्यात विषाचा अंश असतो. वाळूत लपून राहिलेल्या स्टिंग-रेवर पाय पडल्यास ते दंश करण्याची शक्यता असते. मात्र, त्याचे विषही जीवघेणे नाही. दंश झालेला भाग सुजणे, पुरळ येणे, मुंग्या येणे, जळजळ होणे अशी लक्षणे दिसतात.
काय काळजी घ्यावी?
नागरिकांनी समुद्र किनारी तसेच पाण्यामध्ये जाताना शक्यतो ‘गमबुट’ वापरावे. लहान मुलांना पाण्यात जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. माशांनी दंश केल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत. समुद्र किनाऱ्याच्या परिसरात लावण्यात आलेल्या फलकांवरील सूचनांचे व उद्घोषकाद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
हेही वाचा : सावधान..गिरगाव समुद्रकिनाऱ्यावर विषारी जेलीफीश!
दंश झाल्यास काय उपचार करावे?
जेलीफिश किंवा स्टिंग रेचा दंश झालेल्या जागी खाज सुटते. मात्र तेथे चोळू किंवा खाजवू नये. जेलीफिशचा दंश झाल्यास स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे. जखम चिघळणार नाही याची काळजी घ्यावी. जखम ताबडतोब स्वच्छ पाण्याने धुवावी. जखम झालेल्या जागी बर्फ लावावा. नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे.