– दत्ता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोनाकाळात हळदीला वाढलेली मागणी आता कमी झाली आहे. काढणी करून बाजारात आलेल्या हळदीला अपेक्षित दर नाही. निर्यातही फारशी वेगाने होत नाही. राज्यात अक्षय्य तृतीयेपासून हळदीची लागवड सुरू झाली आहे; पण यंदा हळदीची लागवड क्षेत्रात मोठ्या घटीची शक्यता आहे. त्यामागच्या कारणांचा आणि सद्य:स्थितीचा वेध.

हळदीची सद्य:स्थिती काय?

करोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हळदीच्या मागणीत झालेली मोठी वाढ आता कमी झाली आहे. मागणी घटल्यामुळे दरातही मोठी घसरण झाली आहे. राज्यात हळद काढणी हंगाम फेब्रुवारीपासून सुरू होतो. एप्रिलअखेर हळद काढणी पूर्ण होते. ही हळद बाजारात आली आहे. मात्र, हळदीला जेमतेम सात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतो आहे. मागील दोन वर्षांत हाच दर दहा हजार रुपयांवर गेला होता. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी हळद लागवडीकडे पाठ फिरवत आहे.

कमीत कमी किती दर अपेक्षित?

दरात सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत झालेली घसरण हळद उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे. साधारणपणे एका एकरात हळद उत्पादन घेण्यासाठी एक लाख २० हजार ते एक लाख ४० हजारांपर्यंत खर्च येतो. एक एकरात सुमारे ३५ क्विंटल वाळलेल्या हळदीचे उत्पादन निघते. या हळदीला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तरच हळद लागवड करणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. मात्र, सध्या मिळणारा दर अत्यंत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

नव्या हळद हंगामाची स्थिती काय?

राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर पट्ट्यात अक्षय्य तृतीयेपासून हळद लागवड सुरू झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत हळद लागवड सुरू राहील; पण काढणी झालेल्या हळदीला अपेक्षित दर मिळत नसल्याचा परिणाम लागवडीवर झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या हंगामात हळदीच्या बियाण्यांच्या मागणीत सुमारे पन्नास टक्के घट झाली असल्याचे चित्र आहे. परिणामी बियाण्यांचे दरही प्रतिक्विंटल १२०० ते १३०० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे या हंगामात देशात हळदीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सांगलीच्या हळद बियाणे बाजाराचे चित्र काय?

सांगलीचा हळद बाजार जसा प्रसिद्ध आहे, तसाच हळद बियाण्यांचा बाजारही प्रसिद्ध आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकच्या सीमाभागातून शेतकरी बियाणे खरेदीसाठी सांगलीत येतात. त्यामुळे बाजार समितीत दर वर्षी सुमारे ७०० (एका गाडीत १६ टन बियाणे) गाड्या हळद बियाण्यांची उलाढाल होते. प्रत्येक हंगामात किमान ४०० ते ५०० गाड्या हळद बियाणे विक्री होते. गेल्या वर्षी हळदीच्या बियाण्यांचा दर प्रतिक्विंटल ४००० ते ४२०० रुपये होता. हंगामात ४०० ते ५०० गाड्या म्हणजे ६४०० ते ८००० टन बियाण्यांची विक्री झाली होती. यंदा मात्र, हळदी बियाण्यांची विक्री अत्यंत संथ गतीने होत आहे. सध्या हळद बियाण्यांचा दर २७०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. सध्या पाच ते सहा गाडी म्हणजे ८० ते ९६ टन इतकीच बियाणे विक्री झाली आहे. यंदाच्या हंगामात पन्नास टक्क्यांपेक्षाही बियाण्यांची विक्री होईल, असा अंदाज बियाणे विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

हळद लागवडीत किती घट होईल?

शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाइतकाही मोबदला मिळत नसल्यामुळे राज्यात आणि देशातही हळदीच्या लागवड क्षेत्रात सरासरी वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. देशात हळदीचे क्षेत्र सुमारे तीन लाख हेक्टर आहे. त्यांपैकी राज्यात हळदीची लागवड सुमारे एक लाख हेक्टरच्या घरात असते. सांगलीच्या हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांनी यंदा हळद लागवडीत वीस टक्क्यांपर्यंत घटीचा अंदाज व्यक्त केला आहे, तर बाजारातील जाणकार हळदीच्या लागवडीत पन्नास टक्क्यांपर्यंत घटीचा अंदाज व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा : विश्लेषण : महाराष्‍ट्रात रासायनिक खतांचा वापर का वाढला?

हळद उत्पादनात भारत कुठे?

भारत हा जगातील सर्वांत मोठा हळद लागवड करणारा, हळद उत्पादन करणारा आणि निर्यातदार देश आहे. चीन, म्यानमार, नायजेरिया आणि बांगलादेशामध्येही हळदीची लागवड केली जाते. जगातील हळदीखालील क्षेत्राचा विचार केल्यास मुख्य क्षेत्र भारत असून, जगातील एकूण लागवडीपैकी ८२ टक्के लागवड एकट्या भारतात होते. त्याखालोखाल चीनमध्ये आठ टक्के, म्यानमारमध्ये चार टक्के, नायजेरियात तीन टक्के आणि बांगलादेशात तीन टक्के इतके हळदीचे क्षेत्र आहे. आयुर्वेदात हळदीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन चिकित्सा पद्धतीत हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. पारंपरिक उपचार पद्धतीसह करोना साथीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आयुर्वेदिक औषध म्हणून हळदीचा वापर जगभरात वाढला होता. आरोग्यासह हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. हळद भारतीयांच्या जीवनशैलीतील महत्त्वाचा घटक आहे.

dattatray.jadhav@expressindia.com