– अमोल परांजपे
युक्रेनच्या खेरसन प्रांतामधील नोवा खाकोव्हा हे अवाढव्य धरण फुटल्यामुळे हाहाकार माजला आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली असून नागरिकांना घरांच्या छपरांवर किंवा झाडांवर रात्र काढावी लागली. तब्बल ४२ हजार नागरिकांना अचानक आलेल्या पुराचा फटका बसतो आहे. विशेष म्हणजे रशिया आणि युक्रेन या दोघांचेही नियंत्रण असलेला परिसर पुराच्या वेढ्यात सापडला आहे. गेल्या १६ महिन्यांपासून युद्धात अडकलेल्या या दोन देशांनी आता धरणफुटीसाठी परस्परांवर आरोप करायला सुरुवात केली आहे. मात्र पुरामध्ये दोन्ही बाजूंचे नुकसानच होत असल्यामुळे कुणा एकाचा दावा खरा मानला जाऊ शकत नाही.
नोवा खाकोव्हा धरणाचे वैशिष्ट्य काय?
खाकोव्हा जलविद्युत प्रकल्प हा युक्रेनच्या खेरसन प्रांतामधील नोवा खाकोव्हा या शहरात आहे. रशियाच्या उत्तरेला उगम पावणाऱ्या आणि दक्षिणेकडे सागरात मिळणाऱ्या निप्रो महानदीवरील सहा मोठ्या धरणांपैकी हे एक आहे. सोव्हिएट काळामध्ये बांधलेले हे धरण इतके अवाढव्य आहे की काही भागांमध्ये एका किनाऱ्यावरून समोरचा किनारा दिसू शकत नाही. त्यामुळेच स्थानिक लोक या धरणाचा उल्लेख ‘खाकोव्हा सागर’ असा करतात. या धरणाची क्षमता सुमारे १८ अब्ज घनमीटर (भारतातील सर्वात मोठ्या भाक्रा नांगल धरणाच्या जवळजवळ दुप्पट) असून जगातल्या मोठ्या धरणांपैकी एक आहे. दक्षिण युक्रेनच्या बहुतांश भागाला शेती तसेच पिण्याच्या पाण्यासाठी याच धरणातून पुरवठा होतो. युक्रेन हा धान्य, सूर्यफूल तेलासह अन्य अन्नपदार्थांचा मोठा निर्यातदार आहे. यातील बहुतांश शेती या धरणाच्या पाण्यावर होते.
धरणफुटीचा घटनाक्रम काय?
धरण फुटण्याची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झाली नसली तरी उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांवरून गेल्या चार-पाच दिवसांपासून भिंत कमकुवत होत असल्याचे समोर आले आहे. १ जून आणि २ जूनच्या छायाचित्रांमध्ये धरणाच्या भिंतीवर असलेल्या रस्त्याचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले असून त्या भागातून काही प्रमाणात पाण्याचा प्रवाहदेखील दिसत आहे. मात्र मंगळवारी, म्हणजे ६ जूनला त्या जागी भिंत अस्तित्वातच नसून पाण्याचा मोठा लोंढा वाहत असल्याचे दिसते. हे पाणी निप्रो नदीच्या प्रवाहामध्ये जात असून त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरण फुटल्यामुळे अचानक पाण्याची पातळी वाढली असून काही गावे मदत पोहोचण्यापूर्वीच पाण्याखाली गेली. धरणातून पाण्याचा प्रवाह थांबविण्याची काहीही व्यवस्था नसल्याने आता खेरसन प्रांतामधील धरणापासून ८० किलोमीटरपर्यंतच्या भागात पुराचा इशारा देण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचे नियंत्रण असलेल्या भागांमध्ये पुराची भीती असल्याने दोन्हीकडील प्रशासनांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी बस आणि रेल्वेची व्यवस्था केली आहे. संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी ही घटना अत्यंत चिंताजनक आणि हजारो नागरिकांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम करणारी असल्याचे म्हटले आहे.
युक्रेन आणि रशियाचे परस्परांवर कोणते आरोप?
युद्धाच्या सुरुवातीच्या काळात रशियाने या धरणावर ताबा मिळविल्यानंतर त्यावर अनेकदा तोफगोळ्यांचा मारा झाला. त्यावेळीही दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप झाले. आता धरण फुटल्यानंतर युक्रेनने अर्थातच रशियाकडे बोट दाखविले आहे. रशियन सैन्य गेल्या काही महिन्यांपासून धरणाच्या परिसरात खोदकाम करीत होते आणि तेथे स्फोटकेही आणली गेल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष वालोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. या दाव्यामध्ये तथ्य असावे, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. प्रतिहल्ला करून रशियावर बळकावलेला खेरसनमधील भाग पुन्हा जिंकण्याची सिद्धता युक्रेनच्या फौजांनी केली आहे. निप्रो नदी पार करण्यासाठी खाकोव्हा धरणाच्या भिंतीवरील रस्त्याचा वापर युक्रेन सैन्य करू शकेल, अशी भीती रशियाला आहे. त्यामुळे हा रस्ता निकामी करण्याची योजना रशियाने अमलात आणली असावी आणि आडाखे चुकल्यामुळे रस्त्याऐवजी संपूर्ण भिंतच कोसळली असावी, असा अंदाज आहे. दुसरीकडे रशियाने मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कार्यालय असलेल्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी हा युक्रेनने मुद्दाम घडवून आणलेला घातपात असल्याचा आरोप केला. २०१४ सालापासून आपल्या ताब्यात असलेल्या क्रिमिया प्रांताचे पाणी तोडण्यासाठी हा कट अमलात आणल्याचे रशियाचे म्हणणे आहे. या दोन्ही दाव्यांची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही.
हेही वाचा : युक्रेनमधील धरणाची भिंत फुटल्याने अणुऊर्जा प्रकल्पाला धोका? जाणून घ्या नेमके काय घडले?
धरण फुटल्याचे अन्य परिणाम कोणते?
युद्ध सुरू झाल्यापासून सातत्याने चिंतेची बाब ठरलेला युरोपातील सर्वात मोठ्या झापोरिझ्झिया अणू ऊर्जा प्रकल्पातील अणू इंधन थंड करण्यासाठी सातत्याने पाण्याची आवश्यकता भासते. धरणाफुटीमुळे प्रकल्पाला पाणीटंचाई भेडसावण्याची भीती आहे. मात्र सध्या तरी शीतकरण प्रक्रियेसाठी प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असून चिंतेचे कारण नाही, असे संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे युक्रेनच्या कृषीव्यवस्थेवर परिणाम होऊन निर्यात घटण्याच्या भीतीने मंगळवारी धान्य तसेच सूर्यफूल तेलाचे दर कडाडले. शिवाय खाकोव्हा जलविद्युत प्रकल्प पूर्णत: नष्ट झाला असून त्याची पुन्हा उभारणी होऊ शकत नसल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे युद्धग्रस्त युक्रेनला विजेची आणखी टंचाई भेडसावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
amol.paranjpe@expressindia.com