– अन्वय सावंत
भारताचा सलामीवीर के. एल. राहुल आणि त्याच्या भारतीय कसोटी संघातील स्थानाबाबत गेल्या काही काळात बरीच चर्चा सुरू आहे. राहुलला गेल्या १० कसोटी डावांमध्ये एकदाही २५ धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत मिळून त्याने केवळ ३८ धावा केल्या. त्यामुळे राहुलला वगळून लयीत असलेल्या शुभमन गिलला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्याची काही माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांकडून मागणी केली जात आहे. यामध्ये भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादचाही समावेश आहे. मात्र, त्याच वेळी भारतीय संघ व्यवस्थापनासह आकाश चोप्रासारखे काही माजी खेळाडू राहुलची पाठराखण करत आहेत. मात्र, आता हा मतमतांतराचा वाद टोकाला पोहोचला असून आकाश चोप्रा आणि वेंकटेश प्रसाद यांच्यातील शाब्दिक सामन्यातून तेच समोर येत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीनंतर राहुलबाबत प्रसाद काय म्हणाले?
प्रसाद हे गेल्या काही वर्षांपासून ‘ट्विटर’च्या माध्यमातून क्रिकेट आणि क्रिकेटपटूंविषयी आपले मत निःसंकोच मांडत असतात. भारताने नागपूर येथे झालेला पहिला कसोटी सामना तीन दिवसांतच डावाने जिंकला. मात्र, यात राहुलचे केवळ २० धावांचे योगदान होते. त्यामुळे सामन्यानंतर प्रसाद यांनी राहुलबाबत नाराजी व्यक्त केली. ‘‘मला केएल राहुलमधील प्रतिभा आणि क्षमता याचा आदर आहे. मात्र, त्याची कामगिरी अतिशय साधारण आहे. ४६ सामने आणि आठ वर्षांहूनही अधिक काळ कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर ३४ची सरासरी नक्कीच समाधानकारक नाही. त्याच्याइतकी संधी मिळालेल्या अन्य खेळाडूंची नावे आठवत नाही,’’ असे प्रसाद यांनी ‘ट्वीट’ केले. तसेच राहुलची निवड ही कामगिरीच्या आधारे नाही, तर तो काही व्यक्तींचा लाडका असल्याने होत आहे, असा आरोपही प्रसाद यांनी केला.
प्रसाद यांचा दुसरा वार आणि चोप्राचे प्रत्युत्तर…
दिल्ली येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात राहुल केवळ १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर पुन्हा प्रसाद यांनी राहुलबाबत रोखठोक मत मांडले. ‘‘वाईट कामगिरी सुरूच. एक खेळाडू जो छाप पाडण्यात अपयशी ठरतो आहे, त्याला पुन:पुन्हा संधी देण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या हट्टाचा हा परिणाम आहे. गेल्या २० वर्षांत अन्य कोणत्याही फलंदाजाला इतकी कमी सरासरी असूनही इतके कसोटी सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याचा समावेश करण्यासाठी प्रतिभावान आणि लयीत असलेल्या फलंदाजांना अंतिम ११ जणांमध्ये संधी दिली जात नाही,’’ असे प्रसाद यांनी ‘ट्वीट’ केले. त्या वेळी त्यांनी शिखर धवन, मयांक अगरवाल, शुभमन गिल आणि सर्फराज खान यांसारख्या खेळाडूंवर अन्याय होत असल्याचेही म्हटले; परंतु सामना सुरू असताना प्रसाद यांनी केलेले हे ‘ट्वीट’ माजी सलामीवीर आणि आताचा समालोचक आकाश चोप्राला फारसे रुचले नाही. ‘‘वेंकी भाई, कसोटी सामना अजून सुरू आहे. आपले मत मांडण्यासाठी किमान दोन्ही डाव संपण्याची तरी वाट पाहा. आपण सर्व एकाच संघात आहोत, ते म्हणजे ‘टीम इंडिया’त. तुम्ही तुमचे मत मांडू नका, असे माझे म्हणणे नाही; परंतु योग्य वेळ साधा. अखेर आपल्या खेळात ‘वेळ’ सर्वांत महत्त्वाची आहे,’’ असे चोप्राने प्रसाद यांना उद्देशून ‘ट्वीट’ केले. इथेच वादाची पहिली ठिणगी पडली. ‘‘माझ्या मते, मी केलेली टीका योग्यच आहे. राहुलने दुसऱ्या डावात अर्धशतक केले, तरी माझे मत बदलणार नाही,’’ असे प्रत्युत्तर प्रसाद यांनी दिले.
वाद टोकाला का गेला?
आकाश चोप्रा आपल्या ‘यूट्यूब’ चॅनलवरून क्रिकेटबाबत आपले मत मांडत असतो. ‘यूट्यूब’वरच चोप्राने राहुल आणि प्रसाद यांच्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी एक चित्रफीत केली. यात त्याने प्रसाद यांनी केलेल्या विविध ‘ट्वीट’चा दाखला दिला. राहुलबाबत प्रसाद जे आकडे सांगत आहे, त्यात पूर्ण तथ्य नसल्याचे चोप्राचे म्हणणे होते. ‘सेना’ (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये राहुलने गेल्या तीन वर्षांत समाधानकारक कामगिरी केल्याचे आकडे सांगत असल्याचे चोप्रा म्हणाला. त्यामुळे ‘तुमचे काही धोरण किंवा मत योग्य ठरवेल, असेच आकडे केवळ सांगू नका,’ अशा प्रकारचे विधानही चोप्राने केले. त्यानंतर प्रसाद यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून चोप्राला प्रत्युत्तर दिले.
प्रत्युत्तर देताना प्रसाद काय म्हणाले?
‘‘माझा मित्र आकाश चोप्राने ‘यूट्यूब’वर एक चित्रफीत प्रसारित केली. त्याने माझे (राहुलविरोधात) काही धोरण असल्याचा दावा केला. जाणूनबुजून माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला आणि मयांकची घरच्या मैदानांवरील ७०ची सरासरी विसरला,’’ असे प्रसाद यांनी ‘ट्वीट’मध्ये लिहिले. तसेच ते पुढे म्हणाले, ‘‘माझे कोणत्याही खेळाडूच्या विरोधात कसलेही धोरण नाही. कदाचित अन्य कोणाचे असावे. मतभेदाला ‘वैयक्तिक धोरणा’चा रंग देणे आणि ‘आपले मत ट्विटरवर मांडू नको,’ असे आकाश चोप्राने सांगणे हास्यास्पद आहे. अखेर स्वत:चे मत मांडूनच तो आता आपली कारकीर्द घडवत आहे. माझा राहुल किंवा कोणत्याही खेळाडूला विरोध नाही. मात्र, अन्यायकारक निवड आणि वेगळ्या खेळाडूंसाठी वेगळे नियम याला माझा विरोध आहे. आकाशने माझ्याबाबत केलेले विधान निराशाजनक आहे.’’
हेही वाचा : विश्लेषण : भारतीय महिला क्रिकेट संघ पुन्हा विश्वविजेतेपदापासून वंचित! अपयशामागे कारणे कोणती?
पुढे चोप्रा काय म्हणाला आणि त्यावर प्रसाद यांचे काय म्हणणे?
‘‘वेंकी भाई, माझ्या म्हणण्याचा तुम्ही चुकीचा अर्थ घेत आहात. तुम्ही तुमचे मत ‘ट्विटर’वर आणि मी ‘यूट्यूब’वर मांडतो. मी तुम्हाला चर्चा करण्यासाठी आमंत्रण देतो. मतभेद असणे चांगले आहे. मात्र, आपण मते योग्य पद्धतीने मांडू या,’’ असे चोप्रा म्हणाला; परंतु ‘‘मी माझे मत ‘ट्विटर’च्या माध्यमातून स्पष्टपणे मांडले आहे. मी या विषयावर तुझ्याशी आणखी चर्चा करण्यास इच्छुक नाही,’’ असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.