– अनिकेत साठे
युद्धक्षेत्रातील तातडीच्या गरजांची पूर्तता व दीर्घकालीन सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिकेने युक्रेनला क्लस्टर बॉम्बसह नव्याने शस्त्रसामग्री देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. काही पारंपरिक सामग्री अमेरिकेने कधीच कुणाला दिलेली नव्हती. तीदेखील युक्रेनला मिळणार आहे. चिलखती वाहने व खंदकांच्या मदतीने काही क्षेत्रात वर्चस्व राखणाऱ्या रशियन फौजांना निष्प्रभ करण्यात ती उपयुक्त ठरतील. परंतु, क्लस्टर बॉम्ब सारखा दारुगोळा युक्रेनवासियांसाठी नव्या संकटाला निमंत्रण देणारा ठरू शकतो.
अमेरिकेने जाहीर केलेले शस्त्रसामग्री संपुट काय?
रशिया विरोधात चिवट झुंज देणाऱ्या युक्रेनला बळ देण्याचे काम अमेरिका व पाश्चिमात्य देशांकडून होत आहे. त्या अंतर्गत बायडन प्रशासनाने युक्रेनसाठी अतिरिक्त युद्ध सामग्रीचे संपुट जाहीर केले. त्यात हवाई हल्ल्यांपासून संरक्षणासाठी सामग्री, चिलखती वाहने, चिलखतविरोधी शस्त्रे व अन्य उपकरणांचा समावेश आहे. हवाई संरक्षणासाठी एआयएम – ७ क्षेपणास्त्र, विमानविरोधी स्ट्र्रिंगर प्रणाली, जलद भ्रमंतीची क्षमता राखणाऱ्या तोफखाना क्षेपणास्त्र प्रणालीसाठी अतिरिक्त दारुगोळा, १५५ मिलिमीटरच्या हॉवित्झर तोफा, त्यासाठी लागणारे तोफगोळे, पायदळासाठी लढाऊ वाहने, भूसुरुंग निकामी करणारी उपकरणे, टीओडब्ल्यू क्षेपणास्त्र, खांद्यावरून डागता येणारी जॅवलिन चिलखतविरोधी प्रणाली, अडथळे दूर करण्यासाठीच्या आयुधांचा समावेश आहे. यात चिलखती वाहने व खंदकात दडलेल्या शत्रू विरोधात प्रभावी कामगिरीची क्षमता राखणाऱ्या क्लस्टर बॉम्बचाही अंतर्भाव आहे.
क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय?
डागलेल्या दारुगोळ्यातून लहान आकाराचे असंख्य बॉम्ब आसपासच्या मोठ्या क्षेत्रात पसरवण्याची रचना असणारे आयुध म्हणून क्लस्टर बॉम्ब ओळखले जातात. हवा, पाणी व जमिनीवरून ते डागता येतात. लक्ष्यावर आघात केल्यानंतर डझनभर वा त्याहून अधिक संख्येने लहान बॉम्ब परिसरात विखुरतात आणि फुटतात. त्यामुळे त्या परिसरातील कुणालाही बचावाची संधी मिळत नाही. एकतर ते मारले जातात किंवा गंभीर जखमी होऊ शकतात. दुसऱ्या महायुद्धात त्यांचा सर्वप्रथम वापर झाला होता. रशियाही युक्रेन युद्धात तसा दारुगोळा वापरत आहे.
वापराचे धोके कसे?
क्लस्टर बॉम्ब एकदा लक्ष्यावर आदळला की, सभोवताली पसरलेले सर्वच लहान बॉम्ब फुटतील, याची शाश्वती नसते. खंदक, तटबंदीच्या ठिकाणी, खोदलेल्या जमिनीवरील सैन्याविरोधात ते अत्यंत प्रभावी ठरतात. पण, ओलसर, मऊ जमिनीवर त्यांचा लगेच स्फोट होत नाही. हाच ते वापरण्याचा मोठा धोका आहे. युद्धात शत्रूच्या फौजांना रोखण्यासाठी विशिष्ट सीमावर्ती क्षेत्रात भूसुरुंग पेरले जातात. युद्धानंतर ते क्षेत्र काळजीपूर्वक भूसुरुंगमुक्त न झाल्यास स्फोटांचे संकट उभे ठाकते. क्लस्टर सामग्रीने विखुरलेल्या लहान बॉम्बने हे धोके कित्येक पटीने वाढतात. न फुटलेले बॉम्ब उचलताना वा पायदळी आल्यास स्फोट होऊ शकतात. एका अहवालानुसार अशा प्रकारातील दारुगोळ्याच्या अवशेषांमुळे २०२१ वर्षात १४१ जणांचा बळी गेला. त्यापैकी ९७ टक्के सामान्य नागरिक होते. यात दोन तृतीयांश मुले होती.
या बॉम्बवर निर्बंध का नाहीत?
सामान्य नागरिकांसाठी अतिशय धोकादायक ठरणाऱ्या भूसुरुंग, क्लस्टर युद्धसामग्रीवर बंदी घालण्यााठी २००८ मध्ये जागतिक परिषद झाली होती. त्यात १२३ देशांनी सहभाग नोंदविला. चर्चेअंती २०१० मध्ये या स्वरूपातील दारुगोळ्याचे उत्पादन, हस्तांतरण व साठवणुकीस बंदी घालण्यात आली. तसा करार अमलात आला. परंतु, रशिया, अमेरिका व युक्रेन यांनी निर्बंध करारावर स्वाक्षरी केलेली नाही. आखाती युद्ध, अफगाणिस्तान व इराकमध्ये क्लस्टर बॉम्बचा वापर झाला आहे. अनेक देशांनी स्वतःहून निर्बंध मान्य केले. मात्र, कराराच्या परिघाबाहेरील राष्ट्रांना अटकाव कसा घालायचा, हा प्रश्न आहे.
हेही वाचा : विश्लेषण : बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करून रशिया काय साध्य करणार?
फायदा-तोटा कसा?
रशियन फौजांना नामोहरम करण्यात क्लस्टर बॉम्ब प्रभावी ठरतील. त्याचा युक्रेनला विविध प्रकारे उपयोग होईल, असे लष्करी तज्ज्ञ सांगतात. खंदकाचे जाळे विस्तारणाऱ्या रशियन तुकड्या, मोकळ्या मैदानावरील चिलखती वाहने व रशियन सैन्याविरोधात ते वापरले जातील. या बॉम्बने युक्रेनियन तोफखान्याची प्रहारक क्षमता लक्षणीय वाढणार असल्याकडे लक्ष वेधले जाते. नव्या शस्त्रसामग्रीने रशिया-युक्रेन युद्धाला निर्णायक वळण देण्यास लाभ होईल. मात्र, त्याच्या वापरातून बरेच नुकसानही संभवते. आंतराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेच्या मते क्लस्टर बॉम्बचा पहिल्या आघातात पूर्णपणे स्फोट होत नाही. त्यातून विखुरलेले लहान बॉम्ब न फुटण्याचे प्रमाण १० ते ४० टक्क्यांच्या दरम्यान आहे. या शस्त्राचा जिथे मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे, ते प्रदेश नष्ट न झालेल्या लाखो दारुगोळ्याच्या अवशेषांनी प्रभावित झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. स्फोट न झालेले बॉम्ब वा अवशेष लहान असतात. त्यांच्या आकारावरून त्याची कल्पना करता येत नाही. लहान मुलांना ते खेळण्यासारखे भासू शकतात. यातून ते उचलण्याचे प्रकार होऊन मृत्यू वा अपंगत्व येऊ शकते.