– अमोल परांजपे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या तीन महिन्यांमध्ये इराणमध्ये सुमारे एक हजार शालेय मुली आजारी पडल्या आहेत. (हा आकडा अनधिकृत आहे. आकडा जास्तही असू शकतो.) सर्वांची लक्षणे एकच… मळमळणे, उलट्या होणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, बेशुद्ध पडणे इत्यादी. हे सगळे शाळेमध्येच घडत असल्यामुळे अर्थातच या प्रकाराभोवती संशयाचे धुके जमा झाले आहे. हे नेमके कोण आणि का करत आहे, याची चर्चा आता जगभरात रंगली आहे.

इराणच्या शाळेमधील या गूढ प्रकाराची व्याप्ती किती?

देशातल्या आठ प्रांतांमधील किमान ५८ शाळांमध्ये मुली अस्वस्थ होण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. सर्वात पहिली घटना उजेडात आली ती ३० नोव्हेंबर रोजी. इराणमधील पवित्र शहर, ओम येथील एका शाळेतील १८ मुलींना अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले. तेव्हापासून गेले तीन महिने कोणत्या ना कोणत्या शहरात असे प्रकार घडले आहेत. यामध्ये काही मुले आणि शिक्षकांचाही समावेश असला, तरी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलीच बहुतांश प्रमाणात लक्ष्य ठरल्या आहेत. मुळात इराणमध्ये मुले आणि मुली अशा एकत्र शाळा अगदीच नगण्य आहेत. त्यामुळे केवळ मुलींच्या शाळांना लक्ष्य करणे अधिक सोपे झाले आहे. याबाबत फारशी अधिकृत माहिती देण्यात आली नसली, तरी समाजमाध्यमांवर प्रसृत झालेल्या काही ध्वनीचित्रांमुळे हे प्रकरण बरेच गंभीर असावे, असे दिसते.

मुली अचानक आजारी पडण्याचे कारण काय?

काही विश्लेषकांच्या मते, शाळेमध्ये एखादा विषारी वायू मुद्दाम सोडला जात असण्याची शक्यता आहे. त्रास सुरू होण्यापूर्वी कुजलेले मासे किंवा कुजलेल्या फळांसारखा वास येत असल्याची तक्रार या मुली करत होत्या. याचा अर्थ एखादा विषारी वायू मुलींच्या शाळेमध्ये किंवा मुलींची संख्या जास्त असलेल्या वर्गांमध्ये मुद्दाम सोडला जात असल्याची शक्यता आहे. अर्थात, याला इराणचे शालेय शिक्षण खाते किंवा सरकारकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. घडल्या प्रकाराची चौकशी सुरू झाली असल्याचे ठोकळेबाज उत्तर प्रशासनाकडून देण्यात येत आहे. अद्याप कुणी दगावलेले नाही. अस्वस्थ झालेल्या बहुतांश विद्यार्थिनी २४ तासांमध्ये ठणठणीत होत आहेत. या कथित ‘विषप्रयोगा’चे गांभीर्य अधिक आहे, ते त्याभोवती असलेल्या संशयाच्या वलयामुळे…

केवळ शालेय मुलींनाच का लक्ष्य केले जात आहे?

इराणमधील स्त्रियांसाठी काम करणाऱ्या काही सामाजिक संस्थांना यामागे दोन संभाव्य कारणे दिसत आहेत. पहिली शक्यता म्हणजे मुलींना शाळेत जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी देशातील ‘तालिबानी’ मानसिकतेचे काही लोक हा प्रकार करीत असावेत. दुसरे संभाव्य कारण अधिक गंभीर आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये महसा अमिनी या तरुणीच्या पोलीस कोठडीतील मृत्यूनंतर संपूर्ण इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाची लाट उसळली होती. यामध्ये शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. मुलींच्या शाळा आणि महाविद्यालये या आंदोलनाचे केंद्र ठरल्या होत्या. या आंदोलनातील सहभागाचा बदला घेण्यासाठी कुणीतरी मुलींना लक्ष्य करीत असावे, अशी शंका आहे. हे आंदोलन सरकारविरोधी असल्यामुळे आणि सरकारने ते दडपण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न केल्यामुळे ही शक्यता अधिक चिंताजनक आहे.

मुलींवर झालेल्या विषप्रयोगांबाबत सरकारचे म्हणणे काय?

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असले तरी एकूणच सरकारी यंत्रणेमध्ये घडल्या प्रकाराबाबत संभ्रमाची स्थिती आहे. मुलींवर विषप्रयोग होतो आहे का, असेल तर त्यासाठी कोणता वायू वापरला जात आहे, विषारी वायू पसरविण्यासाठी कोणती उपकरणे वापरली जात आहेत, यामागे कोणती संघटना आहे यातल्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर सध्या तरी इराण सरकारकडे नाही. रासायनिक अस्त्र तज्ज्ञांच्या मते यामध्ये विषप्रयोगासाठी वापरला जाणारा वायू कोणता आहे, हे शोधून काढणे सर्वात महत्त्वाचे आहे आणि ती सर्वात कठीण गोष्टही आहे. काही पीडित मुलींच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले आहेत. मात्र त्यात कोणताही विषारी पदार्थ आढळून आलेला नाही.

हेही वाचा : विश्लेषण : हेरगिरीच्या आरोपाखाली माजी मंत्र्याला थेट फाशीची शिक्षा, इराणमधील अलिरेझा अकबरी प्रकरण काय आहे? जाणून घ्या

खरोखर विषप्रयोग होतो आहे की समूह मानसिकतेचा परिणाम?

या प्रकारामध्ये एक दूरची शक्यता अशी की हे सगळे प्रकार बहुतांश मानसिक असावेत. सुरुवातीला काही प्रमाणात मुलींच्या शाळेत विषारी वायू सोडला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्यानंतरचे प्रकार हे समूह मानसिकतेमधून घडले असावेत का, या दिशेनेही काही पाश्चिमात्य संस्था तपासणी करत आहेत. याला इंग्रजीमध्ये ‘मास हिस्टेरिया’ असे म्हटले जाते. म्हणजे कुठलातरी अज्ञात वास आला की विषारी वायू सोडल्याच्या भीतीमुळे विद्यार्थिनी आजारी पडत असाव्यात, अशी एक शक्यता आहे. अर्थात, या गृहितकाला सिद्ध करेल, असा पुरावादेखील अद्याप मिळालेला नाही. २०१० साली अफगाणिस्तानमध्ये विद्यार्थिनींच्या शाळेमध्ये अशाच पद्धतीने विषारी वायू सोडण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र त्याचा तपास कधीच पूर्णत्वाला जाऊ शकला नाही. आता इराणमध्ये पुन्हा तेच घडत आहे. जोपर्यंत याचा उलगडा होत नाही, तोपर्यंत इराणमधील विद्यार्थिनींना नाहक एका भीतीच्या सावटाखाली राहावे लागणार आहे.

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis of who is poisoning school girls in iran print exp pbs