– राखी चव्हाण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काळ्या बिबट्यांचे आकर्षण वाढतेय, कारण त्यांची संख्याही वाढत चालली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प खरे तर वाघांसाठी प्रसिद्ध, पण येथेही चार काळे बिबटे आहेत. पर्यटकांना वाघांइतकीच उत्सुकता या बिबट्यांबाबतही आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पातही काळ्या बिबट्या आढला होता आणि अलीकडेच काही महिन्यांपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात या बिबट्याची शिकार करण्यात आली. मात्र, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात या काळ्या बिबट्यांनी पर्यटकांना ओढ लावली आहे.

बिबट्या कशामुळे काळा होतो?

काळा बिबट्या ही वेगळी जात नाही. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे बिबट काळे दिसतात. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता, नेहमीचे ठिपके दिसतात. बिबट्यांमधील मेलॅनिझम एका उत्परिवर्तनातून उद्भवते, जे मेलेनिनचे उत्पादन नियंत्रित करणारे जनुक काढून टाकते. यामुळे रंगद्रव्याचे जास्त उत्पादन होते आणि आवरण काळे होते.

काळे बिबटे प्रामुख्याने कोणत्या भौगोलिक क्षेत्रात आढळतात?

काळे बिबटे प्रामुख्याने नैर्ऋत्य चीन, भूतान, भारत आणि म्यानमार आणि जावा बेटासह संपूर्ण मलय द्वीपकल्पात आढळतात. या भागांमध्ये, प्रबळ जनुके (जीन्स) असलेल्या प्राण्यांच्या फिकट रंगाच्या पट्ट्यांपेक्षा मेलेनिस्टिक म्हणजेच काळे बिबटे नेहमी दिसतात. मलय द्वीपकल्पातील जवळजवळ सर्वच बिबटे मेलेनिस्टिक आहेत. आफ्रिकेत ते फार मोठ्या प्रमाणात दिसून येत नाहीत, पण इथिओपिया, केनिया आणि कॅमेरूनच्या विषववृत्तीय जंगलांमध्ये त्यांची नोंद आहे.

हेही वाचा : चंद्रपूर: ताडोबाचे मुख्य आकर्षण काळा बिबट्या; पर्यटकांना मनसोक्त दर्शन

काळ्या बिबट्यांचा अधिवास कोणता?

सामान्य बिबटे सव्हाना (उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश), जंगले, स्क्रबलँड (लहान आणि खुरट्या झाडांनी झाकलेला प्रदेश) आणि वाळवंटासह जवळपास सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात. तर काळे बिबट दक्षिण आणि आग्नेय आशियातील घनदाट उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये नेहमीच आढळतात. याठिकाणी त्यांचा रंग जंगलांच्या कमी प्रकाशात घनदाट वनस्पतींमध्ये एकरूप झालेला दिसून येतो. ते बहुतेक जंगलातील झाडांच्या खालच्या फांद्यांमध्ये असतात, जिथे ते विश्रांती घेतात आणि शिकार करतात.

काळ्या बिबट्यांची वागणूक कशी असते?

काळे बिबट हे प्रामुख्याने एकटे राहतात. त्यांचा काळा रंगच त्यांचे कवच आहे. त्यामुळे ते आजूबाजूला असतील तरीही दिसून येत नाहीत. समोर असलेल्या सावजाला त्याची कल्पनाही नसते आणि याचाच फायदा घेत काळे बिबटे त्याची शिकार टिपतात. तसे ते निशाचर असतात आणि दिवसा विश्रांती घेतात. रात्रीच्या अंधारात लपून राहू पाहणाऱ्या बिबट्यांसाठी मेलानिस्टिक उत्परिवर्तन फायद्याचे ठरते. त्यांच्या क्षमतेमध्ये सामान्य बिबट्यांच्या तुलनेत कोणतीही त्रुटी नसते.

काळे बिबटे कुठे आढळतात?

काळे बिबटे हे दाट जंगलांमधे जास्त असतात. तिथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो असे मानले जाते. भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात, आसाममध्ये आढळतात. नेपाळ, आफ्रिकेमधे तसेच माउंट केनियाच्या जंगलांमध्ये त्यांचा वावर आहे. आफ्रिकेत काळ्या बिबट्याच्या अधिवासाचे अनेक अहवाल आले आहेत, परंतु शक्यता तपासल्यानंतर फार कमी ठिकाणी ते आढळले आहेत. काळ्या बिबट्याच्या निरीक्षणाच्या २०१७ च्या जागतिक पुनरावलोकनात इथिओपिया, केनिया आणि दक्षिण आफ्रिकेतील प्राण्याचे १९०९ पासूनचे अहवाल आढळले. मात्र ज्या अहवालाची खात्री पटली तो अहवाल इथिओपियाचा होता.

काळ्या बिबट्यांच्या संरक्षणाची गरज काय?

बिबट्यांना अनेक धोक्यांचा सामना करावा लागतो. यात प्रामुख्याने शिकारीचा धोका अधिक आहे. त्यांच्या अवयवांची तस्करीही केली जाते. काही महिन्यांपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील काळ्या बिबट्याची शिकार करण्यात आली. तसेच अधिवासाचाही धोका आहे. अधिवास नष्ट होणे, मानवाशी संघर्ष असे अनेक धोके आहेत. या सर्व धोक्यांचा सामना बिबट्यांना करावा लागतो. त्यामुळे आधीच कमी संख्येत असलेल्या बिबट्यांची संख्या आणखी कमी होऊ शकते.

हेही वाचा : व्याघ्र संवर्धनावरच भर का?

काळ्या बिबट्याचा अधिक छळ का होतो?

मेलेनिस्टिक नसलेल्या बिबट्यांपेक्षा काळ्या बिबट्यांचा जास्त छळ का होतो याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. जर बिबट्याने पशुधन मारले तर त्याच्या रंगाची पर्वा न करता स्थानिकांकडून छळ केला जातो. त्यामुळेच काही देशांमध्ये त्यांना संरक्षण दिले आहे. केनियामध्ये शिकार कायदेशीर असताना काही मार्गदर्शकांनी मात्र काळ्या बिबट्यांची शिकार करण्यास नकार दिला.

rakhi.chavhan@gmail.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis of why black leopard numbers are increasing in vidarbha print exp pbs