– राखी चव्हाण
परळी येथील २१० मेगावॉटचे प्रत्येकी दोन युनीट, कोराडी येथील २०० मेगावॉटचा एक युनिट, चंद्रपूर येथील २१० मेगावॉटचे प्रत्येकी दोन युनिट, तर भुसावळ येथील २१० मेगावॅटचा एक युनिट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या बदल्यात कोराडी येथे ६६० मेगावॉटचे प्रत्येकी दोन युनिट प्रस्तावित आहेत. कोराडी येथील या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात पर्यावरणवादी आणि नागरिक एकत्र आले आहेत.
वीज प्रकल्पाच्या नव्या युनिटला विरोधाची कारणे काय?
कोराडीतील वीज प्रकल्पामुळे आधीच शेती नापिक झाली आहे. भूजल दूषित झाले असून, त्याचा परिणाम माणसांवरच नव्हे, तर जनावरांवरही झाला आहे. हवेतील प्रदूषणात नागपूर पहिल्या दहा शहरांमध्ये आहे. त्यामुळे हे नवे युनिट सुरू झाले तर नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा आणखी परिणाम होईल. दोन नव्या युनिटमुळे प्रदूषणात भर पडेल. त्यामुळे इतर ठिकाणचे वीज युनिट बंद करून ते नागपुरातच आणण्याचा अट्टाहास का, अशी भूमिका नागरिक, पर्यावरणवाद्यांनी घेतली आहे.
जनसुनावणीवरील आक्षेप काय आहेत?
प्रस्तावित वीज प्रकल्पांचे पर्यावरण परिणामकारक मूल्यांकन करण्यात आले असून, २९ मे रोजी दुपारी १२.३० वाजता प्रकल्प कार्यालय परिसरात जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. शहराचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले असताना इतक्या उन्हात जनसुनावणी का, या जनसुनावणीत केवळ प्रकल्पापासून दहा किलोमीटर परिघातील नागरिकांनाच का आमंत्रित केले, जनसुनावणी कोणत्याही ठिकाणी व कोणत्याही वेळी घेतली जाऊ शकते. मग, प्रकल्पाच्या कार्यालय परिसरातच जनसुनावणी का, असे अनेक आक्षेप नोंदवत ही जनसुनावणी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकल्पाबद्दल राजकीय भूमिका काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रकल्पग्रस्तांनी दाद मागितली. उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. मात्र, केंद्रीय मंत्र्यांकडून प्रकल्प विरोधकांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांची बाजू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. हा प्रकल्प कोराडीत न करता नागपूर परिसरातील इतर ठिकाणांचा विचार व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, नागपूर जिल्ह्यातच हा प्रकल्प नको, अशी भूमिका प्रकल्प विरोधकांनी घेतली आहे.
कोराडीतील आधीच्या वीज प्रकल्पाची स्थिती काय?
औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राखेच्या विल्हेवाटीबाबत महाजनकोने पर्यावरणीय नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे खसाळा येथील राख बंधारा फुटला. यामुळे नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नदीत राख पसरली. परिसरातील शेतीमध्ये राखयुक्त पाणी गेल्यामुळे किमान दोन वर्षांसाठी शेती निकामी झाली. कोराडीतील वीज प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदुषणावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाजनकोला अनेकदा नोटीस बजावली. त्यासाठी दंडही ठोठावला, पण काहीही फरक पडला नाही. मंडळाने त्यांना प्रत्येकी ६६० मेगावॉटच्या तीन युनिटवर ‘फ्लू गॅस डिसल्फरायझिंग प्लान्ट’ लावण्यास सांगितले. मात्र, आजतागायत या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.
कोराडीतील राख बंधाऱ्याची स्थिती काय?
राख बंधारा बांधताना त्याच्या उंचीबाबत केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयाला कळवावे लागते. पुढे-मागे त्यात बदल होणार असतील तर त्याचीही मंजुरी घ्यावी लागते. खसाळा राख बंधाऱ्याबाबत सुरुवातीला ही मंजुरी घेण्यात आली. मात्र, त्यानंतर पुन्हा सुमारे दीड मीटरने ही उंची वाढवण्यात आली. राखेच्या बंधाऱ्याच्या मूळ उंचीवर पुन्हा माती टाकून दीड मीटर उंची वाढवून बंधाऱ्याची साठवण क्षमता नियमबाह्य पद्धतीने वाढवण्यात आली. त्यामुळे बंधाऱ्याची शक्ती आणि क्षमता कमकुवत झाली. क्षमतेपेक्षा अधिक राख साठवण्यात आल्यामुळेच हा बंधारा फुटला.
प्रस्तावित प्रकल्पाबाबत पर्यावरण परिणाम मूल्यांकनाची स्थिती काय?
कोराडी येथे हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आल्यानंतर त्याचे पर्यावरण परिणाम मूल्यांकन करण्यात आले. त्याचा अहवाल त्यांनी महाजनकोला दिला. मात्र, तो स्थानिकांना समजेल अशा भाषेत देणे अपेक्षित असताना तो तसा देण्यात आला नाही. स्थानिक ग्रामपंचायतींनाही या अहवालापासून दूर ठेवण्यात आले. प्रकल्पाला सकारात्मक असा अहवाल तयार करुन या प्रकल्पाचा मार्ग महाजनकोला मोकळा करायचा आहे, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला.
हेही वाचा : विश्लेषण : मोफत विजेची आश्वासने जणू राजकीय प्रथा?
कोराडी परिसरातील पाण्याची स्थिती काय?
वीज प्रकल्पामुळे कोराडी परिसरातील भूजल दूषित झाले आहे. तीन वर्षांपूर्वी असर, मंथन, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थांनी कोराडी परिसरातील गावांमध्ये सर्वेक्षण केले. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा तिन्ही ऋतुंमध्ये परिसरातील भूजलाची तपासणी करून प्रयोगशाळेत परिक्षण करण्यात आले. त्यावेळी भूजलात आर्सेनिक, सेलेनिअम, लेड, मँगनीज, लिथियम, कॉपर, मर्क्युरी, अल्युमिनिअम, लिथियम हे घटक मोठ्या प्रमाणात आढळले. परिसरातील तब्बल १८ गावांतील पाणी दूषित झाले आहे.
rakhi.chavhan@expressindia.com