– मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्‍ट्रात गेल्‍या दोन दशकांमध्‍ये रासायनिक खतांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला असून २००१-०२मध्‍ये राज्‍यात एकूण १७ लाख मेट्रिक टन खत शेतीसाठी वापरले गेले होते, तो वापर आता ७० लाख मे. टनांपर्यंत पोहचला आहे. अलीकडे कृषी विभागाने रासायनिक खतांचा साठा मुबलक उपलब्ध असल्याचे जाहीर केले असले, तरीही बेसुमार खतांचा मारा हा चिंताजनक बनला आहे. प्रमाणापेक्षा अधिक खत दिले तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पिकांना भासून उत्पादन घटते, असे शेतीतज्‍ज्ञांचे मत आहे. अशा स्थितीत कृषी विभागाला खत वापराविषयी नियोजन करावे लागणार आहे.

शेती करण्‍यासाठी खतांची आवश्‍यकता किती?

सूर्यप्रकाश, उष्णता, हवा, पाणी, मातीची संरचना इत्‍यादी गोष्टी वनस्पतींच्या व पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. यांपैकी सूर्यप्रकाश, हवा, पाणी, उष्णता हे सर्व वनस्पती मुळांवाटे व पानांवाटे घेऊ शकतात आणि बाकीचे काही पदार्थ मातीतून शोषून घेतात. नैसर्गिक वा कृत्रिमरीत्या बनविलेल्या पदार्थांमार्फत वनस्पतींच्या वाढीस आवश्यक व पोषक असणारी रासायनिक मूलद्रव्ये दिली जातात. वनस्पतींना बाहेरून द्याव्या लागणाऱ्या खतांमध्‍ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम ही महत्त्वाची आहेत. त्याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, लोह, जस्त, मँगेनीज, तांबे, मॉलिब्डेनम व क्लोरीन ही मूलद्रव्ये अल्प प्रमाणात दिली जातात.

रासायनिक खतांचा वापर किती आहे?

कृषी विभागाच्‍या आकडेवारीनुसार २००१-०२ या वर्षात राज्‍यात १६.९ लाख मे. टन रासायनिक खतांचा वापर झाला. म्‍हणजे प्रति हेक्‍टरी ७५ किलोग्रॅम खत शेतांमध्‍ये टाकण्‍यात आले. त्‍यात दरवर्षी सातत्‍याने वाढ होत गेली. २०२१-२२ मध्‍ये खरीप आणि रब्‍बी या दोन्‍ही हंगामात ७०.६७ लाख मे. टन खत वापरले गेले. प्रतिहेक्‍टरी वापर हा ११९ किलोग्रॅमपर्यंत पोहचला. यंदाच्‍या म्‍हणजे २०२२-२३ च्‍या हंगामात ७४.६७ लाख मे. टन खतांचा वापर होण्‍याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. वीस वर्षांमध्‍ये खतांचा वापर चार पटींनी वाढल्‍याचे हे चित्र आहे.

खतांचे प्रमाण वाढल्‍यास काय होईल?

वाढत्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे शेती, जंगल, पाणी आणि मानव दुष्परिणाम होत आहेत. १९६०च्या दशकात अमेरिकेत वाढत्या रासायनिक खतांच्या वापराची दखल घेतली गेली. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या फेरविचार करण्याचे निर्देश तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी दिले होते. यावर सखोल सर्वेक्षण, संशोधन आणि चिंतन करून रासायनिक शेती, उत्पादन पद्धतीला आळा घालून शाश्वत शेतीची शिफारस करण्‍यात आली होती. भारतात मात्र अजूनही या बाबतीत फारसा अभ्‍यास पुढे आलेला नाही. शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात नाही.

मातीची सुपीकता घटत चालली आहे का?

शेतीचे उत्‍पादन वाढून अन्नधान्यात देश स्वयंपूर्ण बनणे, हे पहिल्या हरित क्रांतीचे यश मानले गेले. आपल्याला उत्पन्न वाढ दिसत असली, तरी मातीच्या सुपीकतेमध्ये घसरण होत चालली आहे, त्याचा अभ्यास करून घसरण थांबवण्यासाठी पुरेसे प्रयत्‍न केले जात नाहीत, हा आक्षेप आहे. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि तिचा कस राखून ठेवण्यासाठी मुख्यत्वे खतांचा वापर केला जातो. पण, खतांच्‍या वापरात नियोजनाचा अभाव असल्‍याने सुपीकता घटत चालल्‍याचे निरीक्षण तज्‍ज्ञांनी नोंदवले आहे.

खतांची गरज कशी ठरवता येईल?

पिकांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी जमिनीची उत्पादनक्षमता, पोषक द्रव्यांचा अभाव दर्शविणारी लक्षणे, जमिनीचे व वनस्पतीचे विश्लेषण, मृदा प्रकार, पिकांच्या वाढीसंबंधी केलेले प्रत्यक्ष शेतीतील प्रयोग ह्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक असते. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम ही मूलद्रव्ये पिकांनी जमिनीतून काढून घेतल्यावर परत त्यांची जमिनीत भरती करणे आवश्यक असते. तसेच जमिनीची संरचना टिकविण्यासाठी तिची योग्य पद्धतींनी व योग्य वेळी मशागत करणे तसेच योग्‍य प्रमाणात खत घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : विश्लेषण : बीटी कापूस वाणावर नवीन संशोधन काय? सामंजस्य कराराचा काय परिणाम होणार?

कोणते उपाय राबविणे आवश्‍यक आहे?

प्रमाणापेक्षा अधिक खत दिले तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पिकांना भासून उत्पादन घटते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांसोबत कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खत, नॅनो यूरिया यांचाही वापर आवश्यकतेप्रमाणे करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला माती तपासणी अहवालाप्रमाणे खताची मात्रा दिली पाहिजे, असा सल्‍ला तज्‍ज्ञांनी दिला आहे. खत वापराचे तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे. शिवाय खत वापरण्याच्या पद्धती आणि व्यवस्थापन विकसित करणे गरजेचे आहे. कोणते पीक आणि किती मात्रांमध्ये कोणते खत वापरायचे याची माहिती देखील शेतकऱ्यांना मिळायला हवी.

mohan.atalkar@gmail.com