– ज्ञानेश भुरे
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्धचे आंदोलन संपल्यावर बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांनी नव्याने सरावाला सुरुवात केली आहे. बजरंग, विनेश तर सरावासाठी परदेशात गेले. आशियाई स्पर्धेत ते खेळतील, पण अजून जागतिक आणि ऑलिम्पिक स्पर्धेपासून ते दूर आहेत. या दोन्ही स्पर्धेत ते कसे पोहोचू शकतात, याबाबत…
बजरंग, विनेश, साक्षीच्या मार्गातील नेमक्या अडचणी काय आहेत?
सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीपासून या तिन्ही कुस्तीगिरांचा वेळ कुस्ती सरावापेक्षा ब्रिजभूषण यांच्याविरोधातील आंदोलनात गेला आहे. त्यामुळे ते केवळ सरावच नाही, तर शारीरिक तंदुरुस्तीपासून खूप दूर गेले आहेत. सध्याची तिघांची तंदुरुस्ती त्यांना आंतरराष्ट्रीयच काय, पण राष्ट्रीय स्तरावरही खेळण्यास योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. जागतिक स्पर्धेसाठी त्यांचा सहभाग राष्ट्रीय महासंघावर अवलंबून असेल, पण ऑलिम्पिकसाठी त्यांना पात्रता फेरीतून जावेच लागेल. ऑलिम्पिक पात्रतेला १६ सप्टेंबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे आणि १२ मे २०२४ पर्यंत चालणार आहे.
हे तिघे जागतिक स्पर्धा खेळू शकतात का?
बजरंग, विनेश आणि साक्षी यांच्यापैकी बजरंग आणि विनेश यांना राष्ट्रीय महासंघाच्या हंगामी समितीने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश दिला आहे. अर्थात, यावरून अजून बराच वाद सुरू आहे. या मल्लांना फक्त आशियाई स्पर्धेसाठी सूट देण्यात आली होती. जागतिक स्पर्धेसाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निवड चाचणी होणार आहे. यावेळी एकाही मल्लाला चाचणीतून सूट मिळणार नाही. प्रत्येकाला चाचणी द्यावीच लागेल, असे हंगामी समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवड चाचणीच्या निकालावर त्यांचा जागतिक स्पर्धेतील सहभाग अवलंबून असेल.
ऑलिम्पिकमध्ये किती मल्लांचा सहभाग असतो?
जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा या दहा वजनी गटांत घेतल्या जातात. मात्र, ऑलिम्पिक स्पर्धा या पुरुष (फ्री-स्टाईल, ग्रीको रोमन) आणि महिला अशा तीन प्रकारातील प्रत्येकी सहा वजनी गटांत खेळविल्या जातात. एकूण १८ वजन गटातून २८८ मल्ल ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतात. यासाठी तीन पात्रता स्पर्धा होतात. ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक मल्लाला या पात्रता फेरीतून जावेच लागते. गतविजेते म्हणून येथे कुणालाही थेट प्रवेश नसतो. यजमान देशाच्या मल्लालाही यातून सूट नसते. मात्र, यजमान देशाचा मल्ल पात्रता फेरीतून पात्रता सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यास अपवादात्मक परिस्थितीत या देशाच्या एका मल्लास (प्रत्येक वजन गट) थेट प्रवेश मिळतो.
ऑलिम्पिक पात्रता कशी ठरते?
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी एकंदर तीन पात्रता स्पर्धा असतात. यात पहिली जागतिक अजिंक्यपद स्पर्धा (१६ ते २४ सप्टेंबर २०२३), दुसरी पात्रता स्पर्धा आंतरखंडीय स्पर्धा (एकूण ४) यापैकी भारतासाठी आशियाई अजिंक्यपद (१२ ते १४ एप्रिल २०२४) आणि तिसरी अखेरची जागतिक पात्रता फेरी (९ ते १२ मे २०२४). यामध्ये जागतिक स्पर्धेतून पहिले चार खेळाडू (सुवर्ण, रौप्य आणि दोन कांस्यपदक विजेते) आणि कांस्यपदकांच्या लढतीत पराभूत मल्लांमधील एक असे एकूण पाच (प्रत्येक वजन गटातून), आंतरखंडीय स्पर्धेतून पहिले दोन (एकूण चार स्पर्धांतून ८), जागतिक पात्रता फेरीतून पहिले दोन आणि कांस्यपदक विजेत्यांमधून एक असे तीन या पद्धतीने एकूण २८८ मल्ल ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतात.
ऑलिम्पिक स्पर्धेला महत्त्व का?
आंतरराष्ट्रीय कुस्ती कार्यक्रमात दहा वजनी गटात लढती होत असल्या, तरी ऑलिम्पिकमध्ये केवळ सहाच वजनी गटांच्या लढती होतात. विशेष म्हणजे ऑलिम्पिक वर्षात जागतिक स्पर्धेचे आयोजन फक्त ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट नसलेल्या चार वजनी गटांसाठी होते. त्यामुळे त्या वर्षी ऑलिम्पिक वजनी गटातील लढतींना एक प्रकारे जागतिक स्पर्धेचाच दर्जा असतो. म्हणून ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागास आणि पदकास विशेष महत्त्व असते.
या तीन टप्प्यांसाठी भारतीय मल्ल कसे ठरतात?
भारतीय मल्लांची निवड अर्थातच निवड चाचणीतून केली जाते. यासाठी भारतीय कुस्ती महासंघ निवड चाचणीचे आयोजन करते आणि संबंधित वजन गटातील विजेत्या मल्लाची भारतीय संघात निवड होते. सध्या तरी भारतीय कुस्ती महासंघावरील हंगामी समितीच चाचणी घेत आहे. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक ७ ऑगस्टला होणार असून, त्यानंतर कुस्ती महासंघ निवड चाचणी घेईल. आशियाई स्पर्धेसाठी तरी हंगामी समितीने बजरंग, विनेशला थेट प्रवेश दिला आहे. पण, जागतिक स्पर्धेसाठी दोघांनाही निवड चाचणीतून जावे लागणार आहे.
हेही वाचा : PHOTOS: तिरंग्याची शान वाढवणाऱ्या कुस्तीपटूंना फरफटत नेलं
बजरंग, विनेशला कोणाचे आव्हान असणार?
आशियाई क्रीडा स्पर्धा नाही, पण जागतिक स्पर्धेसाठी या मल्लांना निवड चाचणीतून जावे लागणार आहे. या वेळी विनेशला ५३ किलो वजनी गटात अंतिम पंघालचे आव्हान राहील. जागतिक कुमार गटातील विजेती आणि वरिष्ठ आशियाई स्पर्धेत रौप्यपदक विजेती ही खेळाडू आहे. त्याचबरोबर अंजू ही आणखी एक खेळाडू आव्हान उभे करू शकते. पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटातून बजरंगला फारसे आव्हान लाभेल असे वाटत नाही. महिलांच्या ६२ किलो वजनी गटात साक्षी मलिकसमोर सोनम मलिकचा अडथळा असेल. ऑलिम्पिक कांस्यपदकानंतर साक्षीने सोनमविरुद्ध आजपर्यंत केवळ राष्ट्रकुल निवड चाचणीत एकमेव विजय मिळवला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सलग चार वेळा तिला सोनमने मात दिली आहे.