– संदीप कदम
मुंबईकर युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामात आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने ’आयपीएल’च्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याची किमया साधली. त्याची कामगिरी पाहता लवकरच त्याला भारतीय संघात स्थान मिळण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याची इथवरची वाटचाल कशी होती, त्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, याचा घेतलेला हा आढावा.
यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामातील यशस्वीची कामगिरी कशी राहिली?
राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या या हंगामात उल्लेखनीय राहिली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांत ५२.२७ च्या सरासरीने ५७५ धावा केल्या आहेत. तसेच, सर्वोत्तम फलंदाजासाठीच्या ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. अग्रस्थानी असलेल्या फॅफ ड्यूप्लेसिसच्या ५७६ धावा आहेत. या हंगामाची सुरुवात यशस्वीसाठी चांगली नव्हती. पंजाब किंग्जविरुद्ध त्याला पहिल्या सामन्यात ११ धावाच करता आल्या. यानंतर मात्र, सनरायजर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने अनुक्रमे ५४ व ६० धावा केल्या. यानंतर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १० व गुजरात टायटन्सविरुद्ध त्याला १ धावच करता आली. यानंतर त्याला चांगला सूर गवसला. लखनऊ सुपर जायंट्स (४४), रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (४७) व चेन्नईविरुद्ध (७७) त्याने छाप सोडली. मुंबई इंडियन्सविरुद्ध घरच्या वानखेडे स्टेडियमवर खेळताना त्याने १२४ धावांची स्फोटक खेळी केली. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध तर त्याने विक्रमी अर्धशतक झळकावताना नाबाद ९८ धावांची खेळी करताना संघाला एकहाती विजय मिळवून दिला. यशस्वीने आतापर्यंत खेळलेल्या ३५ सामन्यांत ११२२ धावा केल्या असून त्यामध्ये त्याने १ शतक व ७ अर्धशतके झळकावली आहेत.
१९ वर्षांखालील विश्वचषक व मुंबईकडून खेळताना यशस्वीची कामगिरी कशी होती?
यशस्वीने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे २०२० मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेने. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली. त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक ४०० धावा केल्या. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध ५९ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध त्याने ५७ धावांची नाबाद खेळी केली. उपांत्यपूर्व सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवले. त्यात यशस्वीने ६२ धावांचे योगदान दिले. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या निर्णायक उपांत्य सामन्यात त्याने ११३ चेंडूंत नाबाद १०५ धावा करताना भारताला अंतिम फेरीत पोहोचवले. अंतिम सामन्यातही यशस्वीने ८८ धावांची खेळी केली. मात्र, भारताला बांगलादेशविरुद्ध पराभूत व्हावे लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यशस्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो. तेथेही त्याने आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. प्रथम श्रेणीतील १५ सामन्यांत त्याने १८४५ धावा केल्या असून २६५ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. ‘लिस्ट ए’मध्ये त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा, तर ट्वेन्टी-२० मध्ये ५५ सामन्यांत त्याने १५२८ धावा केल्या आहेत. यामध्ये अनुक्रमे २०३ व १२४ अशा त्याच्या सर्वोत्तम खेळी आहेत.
यशस्वीचा आतापर्यंत प्रवास कसा राहिला?
उत्तर प्रदेशच्या सुरिया येथून एक मुलगा क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहून मुंबईत पोहोचला. मात्र, त्याच्यासमोर असंख्य आव्हाने उभी होती. त्याची राहण्याची सोय नसल्याने अनेकदा मैदानातील तंबूत त्याला राहावे लागले. त्यामध्ये लाइट नसायची. तसेच, पैसे नसल्यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था करणेही अशक्य होते. त्या तंबूत मैदानाची देखरेख करणारे माळीही राहत होते. त्यामुळे यशस्वीला अनेकदा ओरडाही खावा लागला. मात्र, त्याने न खचता क्रिकेटकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. मात्र, २०१३ मध्ये त्याची ओळख प्रशिक्षक ज्वाला सिंह यांच्याशी झाली. यानंतर त्यासाठी सर्व काही बदलून गेले. त्याने ज्वालाला आपल्या घरात राहण्यास दिले. यशस्वीनेही संधीचे सोने करताना धावांचा रतीब घातला. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळण्यापूर्वी त्याने मुंबईकडून छत्तीसगढविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने काही लक्षवेधी खेळी केल्या. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवल्यानंतर यशस्वीला ’आयपीएल’मध्ये खेळण्याची संधी मिळाली. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना पहिल्या ‘आयपीएल’ हंगामात यशस्वीला काही खास करता आले नाही. तरीही संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे यशस्वी या हंगामात चमकदार कामगिरी करताना दिसत आहे.
हेही वाचा : IPL 2023: यशस्वी जैस्वालच्या आयुष्यात ‘या’ दोन शब्दांना खूपच महत्त्व; हातावर बनवला आहे टॅटू
यशस्वीला भारतीय संघात स्थान मिळण्याची संधी किती?
यंदाचा ’आयपीएल’ हंगाम २८ मे रोजी संपणार आहे. यानंतर भारतीय संघ ७ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर भारतीय संघ पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. याशिवाय आयर्लंडविरुद्ध ते तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यात यशस्वीला भारतीय संघात संधी मिळू शकते. या वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार असल्याने वरिष्ठ खेळाडू अधिकधिक एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष देतील आणि त्यामुळे युवा खेळाडूंना ट्वेन्टी-२० मध्ये संधी मिळेल. त्याच्या कोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीने ‘बीसीसीआय’ निवड समितीचे लक्ष वेधले असेल. त्यामुळे ‘आयपीएल’च्या उर्वरित सामन्यांत आणखी धावा करत तो सर्वांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करेल.