– गौरव मुठे

समाजमाध्यमांवरील उपयोजनांचा (अ‍ॅप्लिकेशन्स) वापर करून शेअर मार्केटमधील निर्देशांकाच्या चढउतारावर डब्बा ट्रेडिंगचा बेकायदा उद्योग करणारी साखळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणली असून याप्रकरणी तीन शेअर दलालांना अटक करण्यात आली. आरोपींकडे सापडलेल्या नोंदींवरून त्यांनी मूडी एक्सचेंज नावाच्या अ‍ॅपद्वारे डब्बा ट्रेडिंगची सोय केली होती. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. मार्च ते जून या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४,६७२ कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे निष्पन्न झाले आहे. डब्बा ट्रेडिंग हे बेकायदेशीर अजून त्यासाठी शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहे. डब्बा ट्रेडिंगमुळे सरकारचा महसूल बुडतोच मात्र त्याद्वारे सामान्य गुंतवणूकदारांची देखील मोठी फसवणूक शक्य आहे. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईने गुंतवणूकदारांना ‘डब्बा ट्रेडिंग’ आणि त्या संबंधित व्यापाऱ्यांपासून दूर राहण्यासाठी वेळोवेळी सूचना केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डब्बा ट्रेडिंग’ म्हणजे काय?

डब्बा ट्रेडिंगला ‘बॉक्स ट्रेडिंग’ किंवा ‘बकेट ट्रेडिंग’ असेही म्हणतात. डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून चालणारे व्यवहार हे पूर्णतः बाजार मंच म्हणजेच राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) यांसारख्या स्टॉक एक्स्चेंजच्या कक्षेबाहेर होतात. हे सर्व व्यवहार बेकायदेशीर असल्याने भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ आणि बाजार मंच एनएसई, बीएसईच्या नियंत्रणाबाहेर असतात.

हेही वाचा : डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून ४६७२ कोटींची उलाढाल, गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक

भांडवली बाजारात प्रत्यक्षात व्यवहार न करता सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांच्या किमतीच्या हालचालींवर बोली लावली जाते. म्हणजेच बाजारात समभागांच्या किमतीच्या हालचालीशी निगडित असलेला जुगार हा आहे. म्हणजेच गुंतवणूकदाराने ठराविक कंपनीच्या समभागाची प्रत्यक्ष बाजारात खरेदी न करता (प्रत्यक्ष मालकी हक्क नसतो) तो त्या ‘डब्बा ट्रेडिंग’च्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सवर खरेदी करायचा. जशी प्रत्यक्षात समभागांची किंमत वाढते तशी त्या अ‍ॅप्लिकेशन्सवर दर्शविली जाते. फायदा झाल्यास बेकायदेशीर डब्बा ब्रोकर तो नफा गुंतवणूकदाराला देतो किंवा तोटा झाल्यास डब्बा ब्रोकरकडे गुंतवणूकदाराकडून तोट्याची वसुली करतो, यालाच ‘डब्बा ट्रेडिंग’ म्हणतात. व्यापारी ट्रेडिंग किंवा डीमॅट खात्याशिवाय किंवा केवायसी तपशील प्रदान न करता समभागांच्या किमती किंवा निर्देशांकांवर सट्टा लावू शकतात. केवळ कर वाचविण्यासाठी आणि अनियंत्रित नफेखोरीसाठी ‘डब्बा ट्रेडिंग’ केले जाते. बऱ्याचदा असे व्यवहार केवळ अनौपचारिक किंवा कच्च्या नोंदी, कच्ची सौदा (व्यवहार) पावती, चलन, देयके किंवा रोखीच्या पावत्या यामाध्यमातून चालविले जातात.

काही गुंतवणूकदारांकडून ‘डब्बा ट्रेडिंग’ का केले जाते?

समभागांच्या खरेदी-विक्रीवर सरकारला द्यावी लागणारी करदेय रक्कम टाळण्यासाठी मुख्यतः डब्बा ट्रेडिंग केले जाते. डब्बा ट्रेडिंगमध्ये उत्पन्न किंवा नफ्याच्या कायदेशीर नोंदी नसल्यामुळे डब्बा व्यापाऱ्यांना कर आकारणीपासून वाचण्यास मदत मिळते. यातून मिळालेल्या उत्पन्नावर कोणतीही कर आकारणी होत नाही. म्हणजेच त्यांना त्यांच्या व्यवहारांवर सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी), किंवा वस्तू बाजारातील व्यवहारावर भरावा लागणारा कमॉडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (सीटीटी) भरावा लागत नाही. शिवाय रोखीचा वापर होत असल्याने हे व्यवहार बँकिंग प्रणालीमध्ये दिसून येत नाही. हे सर्व व्यवहार बेकायदेशीरपणे पार पडत असल्याने यामुळे सरकारचा मोठा महसूल बुडतो.

गुंतवणूकदारांचे काय नुकसान होते?

सर्व व्यवहार बेकायदेशीर असल्याने ते नियामक कार्यकक्षेच्या बाहेर आहेत. गुंतवणूकदारांना गुंतवणूकदार संरक्षण, विवाद निराकरण यंत्रणा आणि तक्रार निवारण यंत्रणेची मदत घेता येत नाही, जी बाजार मंचाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांसाठी उपलब्ध असते. यामुळे सामान्य गुंतवणूकदाराने चुकून किंवा भूलथापांना बळीपडून डब्बा ट्रेडिंग माध्यमातून व्यवहार केल्यास त्यातील फसवणुकीसाठी त्याला कोणाकडेही दाद मागता येत नाही. सर्व व्यवहार रोखीचा वापर करून आणि कोणत्याही लेखापरीक्षणयोग्य नोंदीशिवाय केले जात असल्याने त्यामाध्यमातून ‘काळा पैशाच्या’ वाढीसही प्रोत्साहन मिळते. बऱ्याचदा यातील पैसा हा मनी लाँडरिंग आणि गुन्हेगारीसाठी किंवा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाण्याची शक्यता असते.

शेअर बाजारातील कोणत्या फायद्यांना मुकावे लागते?

अधिकृत बाजार मंचाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी समभाग खरेदी केल्यास त्याला विविध फायदे मिळतात. समजा एखाद्या कंपनीने लाभांश (डिव्हिडंड), बक्षीस समभाग (बोनस) किंवा समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) सारख्या घोषणा केल्यास त्याचा लाभ गुंतवणूकदारांना घेता येतो. कारण अधिकृत बाजार मंचावरून समभाग खरेदी केल्यास गुंतवणूकदार हा त्या समभाग खरेदी केलेल्या कंपनीचा भागधारक असल्याने त्याला सर्व फायदे मिळतात. याउलट डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून होणारे व्यवहार हे आभासी असल्याने आणि प्रत्यक्ष ते त्या कंपनीचे भागधारक नसल्याने गुंतवणूकदारांना वरील फायद्यांपासून वंचित राहावे लागते.

हेही वाचा : विश्लेषण : शेअर मार्केटमधून भरमसाठ पैसे कमावताय; ‘डब्बा ट्रेडिंग’मुळे तुमचंही होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या 

‘डब्बा ट्रेडिंग’ करणे कायदेशीर गुन्हा आहे का?

डब्बा ट्रेडिंगवर भारतात बंदी घालण्यात आली असून हे ट्रेडिंग खासगी व्यक्तींमार्फत त्यांच्या नियमांनुसार चालविले जाते. तसेच भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या कक्षेबाहेर हे व्यवहार पार पडत असल्याने ‘सेबी’ने त्याला जुगार या प्रकारात गणले आहे. सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट (एससीआरए) १९५६ च्या कलम २३(१) अंतर्गत ‘डब्बा ट्रेडिंग’ करणे हा गुन्हा ठरविला जातो. त्यात दोषी आढळल्यास गुंतवणूकदार आणि व्यापार्‍यांना १० वर्षांपर्यंत कारावास किंवा २५ कोटींपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स कायद्यांचे उल्लंघन करण्याव्यतिरिक्त, डब्बा ट्रेडिंग भारतीय दंड संहिता, १८७० च्या कलम ४०६, ४२० आणि १२०-बी च्या कक्षेत येते.

gaurav.muthe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Analysis on dabba trading in share market and its legality print exp pbs
Show comments