आयटीमध्ये प्रमुख कंपन्या असलेल्या Infosys Ltd आणि TCS ने ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत अपेक्षित निकाल दिला नसल्यानं आयटी शेअर्सवर काही प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला. सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) आणि क्रेडिट सुइसच्या संकटानंतर काही यूएस आणि युरोपियन कंपन्या मुख्यतः बँकिंग क्षेत्रात बँका प्रकल्प खर्च पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचेही इन्फोसिस आणि टीसीएसने अधोरेखित केले. आयटी क्षेत्राच्या एकूण महसुलात बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) क्षेत्राचा मोठा वाटा आहे. BFSI कंपन्यांची कमकुवत मागणी आयटी कंपन्यांच्या उत्पन्नाच्या वाढीकडे निर्देश करते.
आयटी शेअर्समध्ये घसरण का होत आहे?
इन्फोसिस आणि टीसीएसच्या अपेक्षेपेक्षा कमी निकालांमुळे या क्षेत्रातील घसरण सुरू झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४ साठी Infosys ने ४-७ टक्के महसूल मार्गदर्शन दिले आहे, जे आर्थिक वर्ष २०२३ मधील १६ टक्के वाढीपेक्षा कमी आहे. “मुळात विकसित अर्थव्यवस्थांमधील मंदीच्या ट्रेंडमुळे आयटी कंपन्यांचे चालू वर्षातील शेअर्स घसरणीला लागले आहेत. इन्फोसिसच्या निकालातही मार्जिनवर दबाव दिसतो आहे. जेव्हा इन्फोसिस आणि टीसीएस या आयटी शेअर्सची घसरण झाली, तेव्हा मार्जिनवरील दबाव त्याला कारणीभूत असल्याचं पाहायला मिळालं,” असंही एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन सांगतात.
सोमवारी इन्फोसिसचे शेअर्स इंट्राडे १२ टक्क्यांपर्यंत घसरले आणि १,२१९ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. मंगळवारी सकाळी इन्फोसिसचा शेअर ०.३ टक्क्यांनी वाढून प्रत्येकी १२६१.८५ रुपयांवर व्यवहार करीत होता. त्याच दिवशी सकाळी टीसीएस १६.६ टक्क्यांनी घसरून ३,१२३ रुपयांवर आला. निफ्टीचा आयटी निर्देशांक ०.१६ टक्क्यांनी घसरून २६,९६८.३ वर आला. टेक महिंद्रा, विप्रो, HCL आणि LTIMindtree यांसारख्या इतर कंपन्यांवरही विक्रीचा दबाव आहे.
पुढील ३-४ महिन्यांत आयटी शेअर्स कसा परतावा देतील?
अमेरिका आणि युरोप मंदीचा सामना करत असल्याने अनिश्चिततेमुळे पुढील तीन ते चार महिने आयटी शेअर्सवर विक्रीचा दबाव राहील, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. “आंतरराष्ट्रीय मंदीच्या ट्रेंडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मला वाटत नाही की, अल्प मुदतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार सध्या आयटी शेअर्स खरेदी करू इच्छितात. कारण शेअर्सवर काही प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून येतो आहे,” असेही रंगनाथन म्हणाले.
हेही वाचाः देशातील सर्वात श्रीमंत आमदार कर्नाटकची निवडणूक लढवणार, ५ वर्षात संपत्ती ६०० कोटींनी वाढली
गुंतवणूकदारांनी काय करावे?
बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, आयटी कंपन्यांना या वर्षी मागणीत थोडीशी घसरण दिसून येत असली तरी दीर्घकालीन आधारावर हे क्षेत्र खूप आशादायक दिसते. विकसित अर्थव्यवस्थांमधील मंदीचा धोका पुढील वर्षी कमी होईल, जे क्षेत्रासाठी चांगले असेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. “दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी सध्या शेअर्सच्या स्वरूपात पैसे गुंतवण्यासाठी ही खूप चांगली वेळ आहे. पुढील एका वर्षात कोणीही पैसे गुंतवण्यास सुरुवात करू शकते”, असंही जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.