Ancient Indian Ikat Found in Egyptian Tomb: बाजार गजबजलेला होता… गर्दी तशी बरीच होती… त्यातही एका गोष्टीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. ती गोष्ट म्हणजे एका स्त्रीच्या साडीवर पडलेली सूर्याची सोनेरी किरणे. या किरणांमुळे तिच्या साडीवरील नक्षीकाम वाळवंटातील मृगजळासारखे चमकत होते. हीच आहे ‘इकत’ साडी, एक मनमोहक भारतीय वस्त्रकला, ज्यात वेगवेगळ्या रंगाचे धागे केवळ त्याचे सौंदर्यच दर्शवत नाहीत, तर इतिहास आणि कलात्मकतेच्या गोष्टीदेखील सांगतात. सोनीपत येथील वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईन (WUD) येथील फॅशन स्कूलचे प्राध्यापक जॉन वर्गीस यांनी सांगितले की, इजिप्तमधील एका फेरोच्या थडग्यात सर्वात जुने ‘इकत’चे तुकडे सापडले. यामुळे या कलेची प्राचीनता तसेच जागतिक पोहोच स्पष्ट होते. या थडग्यात सापडलेला इकतचा तुकडा ओडिशा राज्याशी संबंधित होता. एकूणच यातून भारताच्या समृद्ध प्राचीन वस्त्रपरंपरेचे महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी सांगितले.
सामाजिक दर्जा आणि सांस्कृतिक परिचयाचे प्रतीक
शतकानुशतके, ‘इकत’चा वापर करून वस्त्रांवर गुंतागुंतीचे, रंगीत नक्षीकाम तयार करण्यात आले आहे. तेच नक्षीकाम अनेकदा दक्षिण आणि आग्नेय आशिया, मध्य आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या भागांमध्ये सामाजिक दर्जा आणि सांस्कृतिक परिचयाचे प्रतीक म्हणून वापरले गेले, असे प्राध्यापक वर्गीस यांनी सांगितले. प्रसिद्ध डिझायनर जोडगोळी डेव्हिड अब्राहम आणि राकेश ठाकोर यांनी या वस्त्रकलेवर मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यांचे पहिले काम, अमला (आवळा) अँड ब्लॅक रंगातील डबल-इकत हाऊंडस्टूथ साडी लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमच्या कायमस्वरूपी संग्रहाचा भाग आहे.
प्राचीन भारतापासून आधुनिकतेपर्यंत
इकत हा शब्द मलेशियन- इंडोनेशियन शब्द मेंगिकत वरून आला आहे. ज्याचा अर्थ गाठ बांधणे किंवा बांधणी असा होतो. यात धाग्यांना रंग लागण्यापासून वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा संदर्भ दिला आहे. भारताच्या विविध भागांमध्ये ‘इकत’ने पाय पसरल्यावर प्रत्येक प्रदेशाने आपली स्थानिक प्रतिके, रंग आणि परंपरांच्या प्रभावाखाली स्वतंत्र ‘इकत’ शैली आणि नक्षी विकसित केल्या असे या डिझायनर जोडगोळीने एका संवादात सांगितले. भारतीय उपखंडात ‘इकत’ विविध प्रादेशिक अभिव्यक्तीप्रमाणे फुलते. ओडिशामध्ये ‘डबल इकत’ ही प्रसिद्ध आहे. या भागात परस्परविरोधी रंगांचा वापर करून चकाकणारी भूमितीय नक्षी तयार केली जाते. गुजरातच्या ‘पटोला सिल्क’वर सूर्यास्तासारखी चमक असते, हजारो झेंडूची फुल उधळावी असे तेज असते… जणू त्याच्या धाग्यांमध्येच या गोष्टी विणल्या गेल्या आहेत. पैसली आणि वसंतात फुलणारी फुले या साडीचे विशेष आकर्षणच म्हणावे लागेल. आंध्र प्रदेशचे ‘उप्पाडा’ हे जरी ‘जामदानी’साठी अधिक प्रसिद्ध असले तरी त्या मातीतील ‘इकत’ देखील प्रादेशिक गोष्टी सांगत असते. या साडीवर असलेली भूमितीय नक्षी, मंदिराची नक्षी आणि रंगांतील समरूपता विशेषच म्हणावी लागेल.
पण ‘इकत’ केवळ तिच्या सौंदर्यापेक्षा अधिक आहे. पूर्वी रेशीम धाग्यांत विणलेली नक्षी राजघराण्यांसाठी किंवा शुभ प्रसंगांसाठी राखून ठेवलेली असे आणि ती नक्षी एकही शब्द न उच्चारता खूप काही सांगत असे. ‘इकत’ तयार करणे ही अनेकदा पिढ्यान् पिढ्या चालत आलेली कौटुंबिक परंपरा होती. त्यासाठी एका ध्यानस्थ साधूचा संयम आणि मंदिरातील नर्तकीची कुशलता आवश्यक आहे. प्रत्येक पूर्ण केलेला तुकडा मानवी कौशल्याचा पुरावा असायचा आणि एक वारसा म्हणून जपला जायचा. ज्यात विणकराच्या वंशाची आणि वस्त्रधारी व्यक्तीच्या प्रतिष्ठेची कहाणी सांगितली जायची.
इकत तयार करण्याची प्रक्रिया?
‘trueBrowns’ च्या उदिता बन्सल या त्यांच्या कलेक्शनमध्ये अनेकदा ‘इकत’चा वापर करतात. यांनी स्पष्ट केले की, इकत तयार करणे ही एक श्रम-प्रधान प्रक्रिया आहे.त्यासाठी काही दिवसांपासून ते काही आठवडे लागू शकतात. हा कालावधी नक्षीकाम किती गुंतागुंतीचे आहे आणि किती रंगांचा वापर केला जातो यावर ठरतो. ‘साध्या डिझाईन्ससाठी साधारणपणे ५०-१०० तास लागतात, तर जटिल नक्षीकामाला खूपच जास्त वेळ लागतो. परिणामस्वरूप एक अद्वितीय कापड तयार होते. जे कुशल विणकरांच्या कलात्मकतेचे आणि समर्पणाचे दर्शन घडवते,” असे त्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले. ‘इकत’ तंत्रामध्ये विणण्यापूर्वी ताण किंवा धाग्यांना परस्परविरोधी रंग लावण्याची प्रक्रिया समाविष्ट असते, जिथे धाग्यांच्या भागांना घट्ट बांधले जाते जेणेकरून इच्छित नक्षीकाम तयार होईल. तसेच बांधलेल्या भागांना रंग चढत नाही. परिणामी धागे एकत्र विणल्यानंतर एक नजाकत असलेली अनोखी नक्षी तयार होते. या प्रक्रियेसाठी कलाकारांकडून अचूक गणना आणि अपार कौशल्याची आवश्यकता असते. ‘अब्राहम अँड ठाकोर’ यांनी सांगितले की, त्यांच्या ‘इकत’ला शेकडो, कधी कधी हजारो तासही लागू शकतात. वेळेची आवश्यकता डिझाइनच्या गुंतागुंतीवर, ‘इकत’चा प्रकार (सिंगल किंवा डबल) आणि सहभागी कलाकारांच्या कौशल्यावर अवलंबून असतो, असे डिझायनर जोडगोळीने सांगून उदिता बन्सल यांचा मुद्द्याच पुन्हा अधोरेखित केला.
इकतचे आधुनिक पुनरुज्जीवन
विसाव्या शतकात या तेजस्वी धाग्यांचा प्रकाश मंदावला. मोठ्या प्रमाणावर मशीनवर उत्पादन केलेल्या स्वस्त आणि सर्वव्यापी कापडांनी प्राचीन हस्तनिर्मित कापडाची मागणी कमी केली. यामुळे उदरनिर्वाह कमी झाला आणि पिढ्यांपिढ्या जपत आणलेली कला लयाला जाऊ लागली, विस्मृतीच्या काठावर पोहोचली. परंतु, ‘स्लो फॅशन’ मुळे हस्तकलेच्या वस्त्रांचे सन्मानाने पुनरागमन झाले आहे. त्यामुळे हे सुंदर कापड पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. असे असले तरी ‘इकत’च्या श्रम-प्रधान प्रक्रियेमुळे कलाकारांसमोर आर्थिक आव्हाने उभी राहतात, असे उदिता यांनी स्पष्ट केले. त्यांनी ‘इकत’ला पुनरुज्जीवित करण्यासाठी ग्राहक शिक्षण आणि ‘फेअर ट्रेड’ पद्धतींच्या समर्थनावर भर दिला. ज्यामुळे या कलेचे अस्तित्व टिकून राहील. सचेत आणि प्रामाणिक ग्राहक हस्तनिर्मित ‘इकत’ वस्त्र विश्वासार्ह स्त्रोतांकडून खरेदी करून या समृद्ध वस्त्रपरंपरेला पाठिंबा देऊ शकतात. यामुळे कलाकारांना आधार मिळतो आणि पारंपारिक तंत्रे जिवंत राहतात असेही त्या म्हणाल्या.
खरी आणि बनावट इकतमध्ये फरक कसा ओळखायचा?
खऱ्या ‘इकत’ची ओळख पटवण्यासाठी चांगले निरीक्षण आवश्यक आहे. रंग थोडासा पसरलेला किंवा नक्षीकामात सूक्ष्म बदल दिसले, तर हे हस्त-निर्मित कपड्याचे वैशिष्ट्य आहे, असे ‘अब्राहम अँड ठाकोर’ यांनी सांगितले. हस्तनिर्मित कापडात जटिल डिझाईन्स शक्य असल्या, तरी खूप सूक्ष्म तपशील मशीनने तयार केलेल्या नकलांचा संकेत असू शकतो. हस्तनिर्मित, ‘इकत’मध्ये नेहमीच किंचित असमानता असते, जी त्याच्या अस्सलतेचे चिन्ह आहे. अस्सल ‘इकत’ विणलेली असते, त्यामुळे नक्षीकाम कापडाच्या दोन्ही बाजूंवर दिसते. छापील नकलांमध्ये सामान्यतः नक्षीकाम केवळ एका बाजूला असते, असे प्राध्यापक वर्गीस यांनी स्पष्ट केले.
प्राचीन फेरोच्या थडग्यांपासून ते आधुनिक फॅशन रॅम्पवरपर्यंत ‘इकत’ने काळाच्या ओघात आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक धाग्यात कथा आणि परंपरा जपून ठेवली आहेत. तरीही, ही सुंदर कलाकृती आज मोठ्या प्रमाणात मशीनवर उत्पादन केलेल्या नकलांमुळे धोक्यात आली आहे. प्रत्येक तुकड्यात गुंतलेले कौशल्य आणि वारसा ओळखून, आपण ‘इकत’ला जिवंत ठेवण्यासाठी हातभार लावू शकतो.