एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी केलेल्या एका भाषणात ‘विद्वान योद्धा’ या प्राचीन लष्करी संकल्पनेवर प्रकाश टाकला आहे. एअर चीफ मार्शल चौधरी हे हवाई दलाच्या कॅपस्टोन चर्चासत्रामध्ये बोलत होते. भारतीय हवाई दलाच्या तिसऱ्या वॉरफेअर अँड एरोस्पेस स्ट्रॅटेजी प्रोग्राम (WASP) अभ्यासक्रमाच्या समारोपप्रसंगी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. एअर चीफ मार्शल चौधरी म्हणाले, या १५ आठवड्यांच्या स्ट्रॅटेजी प्रोग्राममुळे विद्वान योद्धा या संकल्पनेची व्याख्या कालसुसंगत करण्यास मदत झाली आहे.
या स्ट्रॅटेजी प्रोग्रामची सुरुवात २०२२ साली झाली होती. भारतीय हवाईदलाच्या (IAF), कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर, सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाची पायाभरणी झाली. या कार्यक्रमाद्वारे सहभागींना भूराजनीति, रणनीती, साकलीक राष्ट्रीय शक्ती याविषयीचे ज्ञान प्रदान करणे. शिवाय रणनीतीसंदर्भात बहुशाखीय पद्धतीने चिकित्सक विचार प्रक्रियेस चालना देणे यावर इथे भर दिला जातो.
विद्वान योद्धा या संकल्पनेचा अर्थ काय?
आपल्या भाषणात, हवाई दल प्रमुख म्हणाले की, विद्वान योद्धा हा आजच्या वाढत्या जटिल आणि गतिशील सुरक्षेच्या वातावरणात बौद्धिक कुशाग्रता राखत त्याला लढाऊ पराक्रमाची जोड देणारा असतो. ही संकल्पना जागतिक स्तरावर अनेक मोठ्या लष्करी यंत्रणांचा भाग आहे. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू लष्करी प्रशिक्षणाबरोबर शैक्षणिक ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे उत्तम आकलन करून देणे हा आहे. या कार्यक्रमांतर्गत सहभागींचे वेगवेगळ्या स्तरावर लष्करी प्रशिक्षण आणि शिक्षणाबरोबर सामरिक आणि धोरणात्मक ज्ञान वाढविले जाईल. लष्करी नेतृत्वाची पुढची पिढी घडवण्यासाठी ही संकल्पना महत्त्वाची मानली जात आहे. युद्धात पराक्रमाबरोबर, प्रत्यक्ष वैचारिकदृष्ट्या रणनीती मजबूत करण्यासाठी ही संकल्पना महत्त्वाची आहे.
आर्मी ट्रेनिंग कमांडचे (एआरटीआरएसी) नेतृत्व करणारे आणि यूपीएससीचे सदस्य असलेले लेफ्टनंट जनरल राज शुक्ला (निवृत्त), यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, ही संकल्पना सैन्यात मोठ्या धोरणात्मक विचारसरणीला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करते, तसेच आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमध्ये शैक्षणिकदृष्ट्या आणि युद्धाच्या सामरिक ज्ञानामध्ये पारंगत अशी व्यक्तिमत्त्वे घडविण्याचे काम करते. ते पुढे म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेचा व्यापक दृष्टीकोन असलेल्या अधिकाऱ्यांची एक संस्था तयार करणे हे उद्दिष्ट आहे, हे अधिकारी शिक्षण आणि अंतःप्रेरणेने धोरणात्मक विचार करणारे असतील.”
ते पुढे म्हणाले की महाभारतासारख्या प्राचीन भारतीय महाकाव्यातही ही संकल्पना अस्तित्वात आहे, त्यांचे वर्णन बौद्धिक खोली असलेले लढवय्ये असे करण्यात आले आहे. “उदाहरणार्थ, अर्जुन किंवा कृष्ण हे विचारवंत नेते होते. ते युद्ध पारंगत आणि राज्यनिपुण होते,”
लष्करातील योध्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लष्करी शिक्षण सतत विकसित होणे आवश्यक आहे. “उदाहरणार्थ, अशा अभ्यासक्रमांसाठी लष्कराबाहेरचे नागरी तज्ज्ञ शिक्षक म्हणून असले पाहिजेत, तसेच या योद्ध्यांचे भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दलचे ज्ञान सातत्याने अपडेट होणे देखील आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा: Sinification of Islam: चीन करतंय मशिदींचेही चिनीकरण; चीनमध्ये नेमके काय घडतंय?
विद्वान योद्ध्यांची गरज
आगळ्या वेगळ्या अशा युद्धसदृश परिस्थितीमध्ये पारंपरिक रणनीतिबरोबरच अत्याधुनिक युद्धपद्धतीची सांगड घालत नावीन्यपूर्ण विचार करण्यास प्रवृत्त करणे हे या संकल्पनेमागचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. रणनितीमधील तज्ज्ञता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, इतर देशांबरोबर असलेले राजनैतिक व सामरिक संबंध या ज्ञानाचा चिकित्सक पद्धतीने विचार करून सुरक्षेविषक जोखिमांचा विचार करून अवघड परिस्थितीत अचूक निर्णय घेणे आणि परिस्थितीनुसार आकलन करून त्यात प्रसंगी बदलही करणे या विद्वान योद्ध्यांकडून अपेक्षित आहे. प्रत्यक्ष युद्धप्रसंग पाहून त्यानुरूप रणनीतिमध्ये तत्काळ बदल त्यांना आजवरचे मिळालेले प्रशिक्षण, ज्ञान आणि सामरिक विचार याच्याआधारे करता येईल.
विद्वान योद्ध्यांची कौशल्ये
आधुनिक काळातील विद्वान योद्ध्यांकडे एकूणच सेवेमध्ये लागणारी तज्ज्ञता आणि त्याचबरोबर विद्यमान लष्करासाठी लागणारी कृत्रिम बुद्धीमत्ता, सायबर सुरक्षा, अंतराळातील कारवाया आणि त्याचबरोबर विद्यमान आंतरराष्ट्रीय संबंध यांचा चिकित्सक विचार करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. एकुणच या अत्याधुनिक ज्ञान व पारंगततेच्या बळावर शत्रूवर मात करण्यास जोरदार बळ मिळेल.