Ancient submerged bridge in Mallorca: युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडामधील जिऑलॉजीच्या प्राध्यापकांनी एका प्राचीन गुहेतील तब्बल ६००० वर्षांपूर्वीचा दगडी पूल शोधून काढला आहे. या शोधामुळे मॅलोर्का बेटावर असलेल्या मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा आणखी जुन्या असल्याचे सिद्ध झाले आहे. यापूर्वी झालेल्या संशोधनामध्ये निश्चित करण्यात आलेल्या मानवी वस्तीसाठीच्या प्राचीन कालखंडामागे जाणारा हा कालखंड असल्याचे संशोधकांना लक्षात आले आहे. हा शोध पश्चिम भूमध्य सागरातील प्रारंभिक मानवी इतिहासातील अनेक पैलू उघड करणारा आहे, असे मत संशोधकांनी मांडले आहे.
मॅलोर्का हे बेट हे समुद्राच्या जवळ असल्याने मानवी वस्तीच्या प्राथमिक खुणा या बेटावर आढळणे अपेक्षित होते. परंतु या बेटांवर कोणत्याही प्रकारच्या मानवी वस्तीच्या खुणा सापडल्या नव्हत्या. त्यामुळे बहुदा प्राचीन मानवाने ही बेटं वस्तीसाठी निवडली नसावीत, असाच अभ्यासकांचा तर्क होता. त्यामुळेच मॅलोर्काच्या किनाऱ्यावरील एका प्राचीन पुलाच्या अलीकडेच घेण्यात आलेल्या शोधाकडे या कोड्याचे उत्तर म्हणून पाहिले जात आहे. हा पूल या बेटांवरील मानवी वस्तीचे पुरावे सादर करतो. तसेच या बेटांवरील मानवी वस्तीचा अतिप्राचीन काळही अधोरेखित करतो.
अधिक वाचा: बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?
मॅलोर्कावर पहिल्या मानवाचा शोध
कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायर्नमेंटमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात २००० साली अभ्यासकांच्या टीमने प्राचीन गेनोवेसा गुहेतील पॅसेजमधून पाण्यात डुबकी मारली. गेल्या ६००० वर्षांमध्ये समुद्राची पातळी वाढल्याने गुहा मुख्यतः पाण्याखाली गेली आणि कॅल्साइट शिल्पांसारख्या आकर्षक आणि वेगळ्या सौंदर्यरचना त्यावर तयार झाल्या. साय न्यूजने (Sci News) दिलेल्या वृत्तानुसार हा पूल २५ फूट लांबीचा आहे. या बुडालेल्या पुलाची आणि इतर पुरावशेषांच्या माध्यमातून समुद्रपातळी वाढीस लागल्यावर येथे वस्ती केलेल्या मानवाने हे स्थान सोडल्याचे लक्षात येते असे बोगदान ओनाक यांनी सांगितले. बोगदान ओनाक हे दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठात भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक आणि नव्याने प्रकाशित झालेल्या संशोधनाचेचे प्रमुख लेखक आहेत.
भूगर्भशास्त्रज्ञ भूतकाळात ६,००० वर्षांपूर्वी कसे पोहोचले?
अभ्यासात असे आढळून आले की, एक दगडी मार्ग आणि भिंत एका पुलावर उतरते. या मार्गाने कधीकाळी पाण्याखाली असलेला तलाव ओलांडला होता. हा मार्ग मोर्टार किंवा सिमेंटशिवाय बांधला होता असे अभ्यासकांनी सांगितले. मोठे चुनखडीचे तुकडे आणि त्यावर १.६३ मीटर किंवा ५.३५ फूट लांब सपाट मोठे दगड इत्यादी साधनांच्या मदतीने मार्ग तयार केला. नाविफॉर्म कालखंडातील (३५५०-३००० वर्षांपूर्वीच्या) मातीच्या भांड्यांमुळे अभ्यासकांना कालखंड ठरवता आला. गुहेतील भूवैज्ञानिक संरचना आणि पुलावरील फिकट रंगाचा पट्टा मानवजातीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा शोध ठरला आहे. “आमच्या कालक्रम गणनेनुसार ५,९६४ ते ५,३५९ वर्षांपूर्वी समुद्राच्या पातळीत होणारी वाढ थांबली आणि त्यानंतर समुद्राची पातळी शंभर वर्षे स्थिर राहिली, असे प्राध्यापक ओनाक म्हणाले.
अधिक वाचा: How vegetarian is India? भारत खरंच शाकाहारी आहे का? राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण काय सांगते?
बोटीतून बेटांवर मानव किती लवकर पोहोचला?
ताज्या पुराव्याने या परिसरातील मानवी वस्तीचा कालखंड सुमारे ४,४०० वर्षांपूर्वीचा असल्याचे आढळते, परंतु जेनोवेसा गुहेतील पुलाने त्यापूर्वी हा कालखंड आणखी २००० वर्ष मागे गेला आहे. हाडे आणि मातीची भांडी यांच्या अभ्यासातून हा काळ आणखी मागे जाण्याची शक्यता आहे. जेनोव्हेसा गुहेत या संरचनांच्या बांधकामामागील नेमकी कारणं अद्याप अस्पष्ट आहेत, असे प्राध्यापक ओनाक यांनी साय न्यूजला सांगितले. समुद्रात ज्या खोलीवर हे पुरावे सापडले आहेत. त्यावरून ५,६०० वर्षांपूर्वी इथे मानवी अस्तित्त्व होते, याचे पुरावे मिळतात. या संशोधनामुळे इतिहासातील अनेक पैलू उघड होण्यास मदत झाली आहे. तसेच हे संशोधन आंतरविद्याशाखीय सहकार्याचे महत्त्वही अधोरेखित करते असे मत ओनाक यांनी व्यक्त केले आहे. पाण्याखालील या शोधाने एक अज्ञात जग उघडकीस आणले आहे.