Ashadhi Wari 2023 वारकरी संप्रदायातील वारीची परंपरा प्राचीन आहे. खुद्द संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या कित्येक वर्षे आधी वारीची परंपरा सुरु असल्याचे दाखले उपलब्ध आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबातील लाखो भाविक (वारकरी) दरवर्षी देहू आणि आळंदी ते पंढरपूर या आषाढी पालखीच्या मिरवणुकीत सहभागी होतात, त्यामुळेच पंढरपूरचा उल्लेख जगातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असा केला जातो. केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून या वारीचे विराट स्वरूप पाहण्यासाठी भाविक-पर्यटक या काळात आवर्जून भेट देतात. अशा जगप्रसिद्ध वारीच्या इतिहासाविषयी…

वारीचा इतिहास नेमका किती जुना?

पंढरपूर यात्रेची परंपरा किमान ८०० वर्षांपासून अस्तित्त्वात असल्याचे संशोधक मानतात. संत ज्ञानेश्वरांनी दरवर्षी होणाऱ्या वारीचा उल्लेख केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या एका ओवीत पंढपूर वारीला नेल्याबद्दल आपल्या वडिलांचे आभार मानले आहेत. याच वारीदरम्यान त्यांना प्रथमच विठूरायाचे दर्शन झाले होते. संत ज्ञानेश्वर हे इसवी सनाच्या तेराव्या शतकात होऊन गेले. याचाच अर्थ तेराव्या शतकापूर्वी ही प्रथा अस्तित्त्वात होती. संत ज्ञानेश्वरांनंतर संत भानुदास आणि संत एकनाथ यांच्या काळात ही परंपरा १५व्या आणि १६व्या शतकापर्यंत सुरू असल्याचे दाखले उपलब्ध आहेत. नंतरच्या काळात, भक्ती परंपरेतील संतांनी वेगवेगळ्या स्वरूपात वारीची परंपरा चालू ठेवली. १७ व्या शतकातील संत तुकाराम, हे महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या भक्ती परंपरेतील प्रमुख संतांपैकी एक आहेत. संत तुकाराम महाराज गळ्यात संत ज्ञानेश्वरांच्या पादुका परिधान करून वार्षिक यात्रेला जात असत. आता या परंपरेचे स्वरूप बदलले दिसते. सध्या वारीत पादुका सुंदर पालखीतून नेल्या जातात.

Madhukar Kukde returns to BJP after 10 years
तब्बल १० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापासी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath shinde 170 seats mahayuti
विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Murbad , Kisan Kathore, Subhash Pawar,
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची, लोकसभेनंतर ग्रामीण पट्ट्यात पुन्हा जातीय समिकरणांना वेग
Shivajinagar Constituency BJP Vs Congress Rebellion in Congress Congress nominated Dutta Bahirat against BJP MLA Siddharth Shirole Pune
शिवाजीनगरमध्ये ‘सांगली पॅटर्न?’
Laxman Dhoble is in the Pawar group and son abhijit dhoble in opposition role
मोहोळमध्ये ढोबळे पिता-पुत्राचे निराळे सूर!

आणखी वाचा: विश्लेषण: Cultural Genocide – एखाद्या संस्कृतीच्या इतिहासातील पाऊलखुणा पुसून टाकणं शक्य असतं का? 

वारीविषयीच्या आख्यायिका

वारीच्या आख्यायिकांपैकी एक थेट ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्याशी संबंधित आहे. १९व्या शतकात ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्यातील एक सरदार हैबतबाबा आरफळकर हे ज्ञानेश्वरांचे भक्त कसे झाले याच्याशी ही आख्यायिका संबंधित आहे. म्हणूनच आळंदीला ज्ञानेश्वरांचे दर्शन घेण्यापूर्वी प्रवेशद्वारापाशी हैबतबाबांचे दर्शन होते.

सरदार हैबतबाबा यांची आख्यायिका

१८२० च्या दशकाच्या उत्तरार्धात, सरदार हैबतबाबा साताऱ्याच्या दिशेने प्रवास करत असताना, त्यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला आणि या हल्ल्यात त्यांचे अपहरण करण्यात आले. दरोडेखोरांच्या बंदिवासात असताना आता आपला मृत्यू जवळ आला आहे हे लक्षात येताच हैबतबाबांनी अखंड हरिपाठाचे पारायण सुरु केले. त्यांनी संत ज्ञानेश्वरांना रक्षणासाठी प्रार्थना केली. याच काळात दरोडेखोराच्या पत्नीला पुत्ररत्न प्राप्त झाले. हैबतबाबांच्या रूपाने खुद्द ज्ञानेश्वरांचे पाय आपल्या घराला लागले व याचीच परिणती म्हणून आपल्याला मुलगा झाला असे मानून त्या दरोडेखोरांच्या प्रमुखाने हैबतबाबांची माफी मागून त्यांना मुक्त केले. हैबतबाबांनी आपल्या सुटकेचे सर्व श्रेय ज्ञानेश्वरांना दिले आणि आपले उर्वरित आयुष्य संत सेवेत घालविण्याचे ठरवले.
हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांसाठी स्वतंत्र वारीची परंपरा पुन्हा सुरू केल्याचे सांगितले जाते, कालांतराने ती वारी संत तुकारामांच्या वारीत विलीन झाली, असे अभ्यासक मानतात. श्रीमंत संरक्षकांच्या मदतीने हैबतबाबांनी पालखी, हत्ती, घोडे, वाद्ये आणि हजारो भक्तांसह मिरवणूकीचे एका भव्य मोहिमेत परावर्तन केले, त्यालाच आपण दिंडी म्हणतो. प्राचीन काळापासून सुरू असलेल्या त्या वारीला भव्य रूप देण्याचे श्रेय हैबतबाबांकडे जाते, असे अभ्यासकांना वाटते. वारीची ती भव्य परंपरा आजही सुरू आहे.

वारीचा महिना

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्याच्या ८ व्या किंवा ९ व्या दिवशी देहू आणि आळंदी येथून वारी सुरू होते. विठ्ठलाच्या चरणी भाविकांच्या मिरवणुकीचा समारोप आषाढ महिन्याच्या ११ व्या दिवशी एकादशीला पंढरपूरात होतो. पंढरपूरच्या विठ्ठलाला विष्णूचा अवतार मानले जाते. भक्ती चळवळीच्या परंपरेनुसार, दरवर्षी चैत्र (मार्च-एप्रिल), आषाढ (जून-जुलै), कार्तिक (ऑक्टोबर-नोव्हेंबर) आणि माघ (जानेवारी-फेब्रुवारी) महिन्यात पंढरपूरला वाऱ्या निघतात. या चार वाऱ्यांपैकी आषाढी वारी ही भाविकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे आणि त्या वारीत लाखो भाविक सहभागी होतात. वारकरी संप्रदायात बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश असल्याने त्यांना आषाढवारीची वेळ सोयीची वाटते. वारी सुरू होईपर्यंत, शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची पेरणी आधीच पूर्ण केलेली असते.

पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालख्यांचा मार्ग

संत तुकारामांची पालखी मिरवणूक देहू येथून निघून आकुर्डी, पुणे, लोणी काळभोर, यवत, बारामती, इंदापूर, अकलूज, वाखरी मार्गे पंढरपूर येथे पोहोचते. संत ज्ञानेश्वरांची पालखी वेगळ्या वाटेने जाते – ती आळंदीहून पुण्यात प्रवेश करते, त्यानंतर सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, माळशिरस, शेगाव, वाखरी मार्गे पंढरपूरकडे जाते.

आणखी वाचा: विश्लेषण : शूर्पणखा स्वतंत्र स्त्री ते राक्षसी… खरेच कोण होती ती? 

वारीतील दिंडीचे नियोजन

या दोन वारींमध्ये राज्यभरातून सहा लाखांहून अधिक भाविक सहभागी होत असले तरी, वारीचे आयोजन आणि व्यवस्थापन करणे हे खरे कौशल्याचे काम आहे. हे नियोजन करताना भक्तांचे दिंडी नावाच्या गटांमध्ये विभाजन केले जाते. प्रत्येक दिंडी किंवा युनिटमध्ये ५० ते १००० वारकऱ्यांचा समावेश असतो. प्रत्येक दिंडीमध्ये एक प्रमुख असतो व इतर सदस्य असतात. ज्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या देवून नियुक्त केले जाते, त्यात सहभागींसाठी रात्रीचा थांबा आणि जेवणाची सोय करणे आदींचा समावेश असतो. इतर गट भजन, कीर्तन आणि ‘मनोरंजन’साठीची जबाबदारी स्वीकारतात. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत सुमारे २५० दिंड्या असतात, तर संत तुकारामांच्या पालखीसोबत ३३० दिंड्या असतात. या वारीदरम्यान संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या केवळ दोनच पालख्या पंढरपूरला जात नाहीत. तर संत एकनाथ, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आणि बाबाजी चैतन्य अशा इतर संतांच्या पादुका घेऊन तब्बल ६८ पालख्या महावारीत सामील होतात.

वारीचे बदलते स्वरूप

आता यात्रेचे स्वरूप थोडे बदलले आहे. पूर्वीच्या काळी दिंड्या आपापल्या गावातून आळंदी किंवा देहूपर्यंत आणि त्यानंतर पंढरपूरपर्यंत पायी जात असत. आता वारकरी देहू आणि आळंदीपर्यंत ट्रकमधून किंवा इतर वाहनाने प्रवास करून उर्वरित तीर्थयात्रा पायी करत असल्याने आता हा प्रवास थोडा सोपा झाला आहे. वाहनांद्वारे प्रवास केल्याने प्रवासाच्या काही भागासाठी अन्न आणि इतर आवश्यक वस्तू वाहून नेणे सोपे होते, कारण याआधी भाविकांना या वस्तू स्वत: घेऊन जाव्या लागत होत्या.