India General Election 2024 Update दक्षिणेकडील राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल होण्याची जुनी परंपरा आहे. तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ताबदल होतो. सत्ताधारी पक्षाला सत्ता कायम राखण्यात यश येत नाही. हा कल यंदा आंध्र प्रदेशात कायम राहिला आहे. वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी सत्ता कायम राखण्यात यश आलेले नाही. १७५ पैकी १३० पेक्षा अधिक जागा तेलुगू देसमला मिळण्याची चिन्हे आहेत. गेल्या वेळी १५१ जागा जिंकलेल्या जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला १५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्ताबदलाची महत्त्वाची कारणे कोणती?

गेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू सरकारच्या कारभाराच्या विरोधात वातावरणनिर्मिती करून जगनमोहन रेड्डी हे सत्तेत आले होते. १७५ पैकी १५१ जागा या पक्षाला मिळाल्या होत्या. निर्विवाद सत्ता मिळूनही जगनमोहन हे सत्ता कायम राखू शकले नाहीत. तेगुलू देसमचे चंद्राबाबू नायडू, जनसेनाचे पवनकल्याण आणि भाजपची युती झाल्याने जगनमोहन यांच्यासमोर मोठे आव्हान होते. हे आव्हान मोडण्यात जगनमोहन यांना यश आले नाही. चंद्राबाबूंमुळे कम्मा, पवनकल्याणमुळे कप्पू हे दोन महत्त्वाच्या समाजांची मोट बांधण्यात यश आले. तसेच जगनमोहन यांच्या सरकारच्या कारभाराबद्दल लोकांमध्ये नाराजी होती. याचा फटका जगनमोहन यांना बसला.

हेही वाचा…Lok Sabha Election Results 2024 : मतमोजणीच्या दिवशी नेमके काय घडले?

सरकारच्या कारभाराबद्दल नाराजी?

जगनमोहन यांनी लोकांना मोठी आश्वासने दिली होती. त्यांच्या सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवल्या होत्या. पण लोकांना सरकारचा कारभार पसंत पडलेला नाही. आंध्र प्रदेशची राजधानी कोणती असावी, याचा जगनमोहन यांनी घोळ घातला. चंद्राबाबू नायडू सरकारच्या काळात अमरावती ही राजधानी करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले होते. पण जगनमोहन यांनी सत्तेत येताच हे काम थांबविले. विशाखापट्टणम, अमरावती आणि कर्नूल तीन राजधान्या उभारण्याचा निर्णय घेतला होता. पण राजधानीचा विषय न्यायालयात गेला. यामुळे आंध्र प्रदेशला राजधानीच राहिली नाही. याबद्दलही लोकांमध्ये नाराजी होती.

चंद्राबाबू नायडू यांना पसंती का?

जगनमोहन सरकारबद्दल असलेल्या नाराजीचा लाभ चंद्राबाबूंनी उठवला. निवडणुकीच्या आधी जगनमोहन सरकारने चंद्राबाबू यांना गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर अटक केली होती. अटकेमुळे चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात वातावरण तयार होईल, असा जगनमोहन यांचा अंदाज होता. पण यातून लोकांच्या मनात चंद्राबाबूंबद्दल सहानुभूती निर्माण झाली. चंद्राबाबू यांनी भाजप आणि जनासेना या दोन पक्षांबरोबर युती केली. जनासेना पक्षाचे नेते पवनकल्याण यांची लोकप्रियता चंद्राबाबूंना उपयुक्त ठरली. तेलुगू देसम, जनासेना आणि भाजप यातून आंध्रच्या सर्व विभागांमध्ये यश मिळविणे शक्य झाले.

हेही वाचा…भारताचे पंतप्रधान प्रामुख्याने उत्तर प्रदेशातूनच का निवडले जातात?

भाजपचा फायदा काय झाला?

आंध्र प्रदेशात भाजपची ताकद नगण्य आहे. भाजपला आंध्रमध्ये जेव्हा केव्हा लोकसभा वा विधानसभेत जागा मिळाल्या तेव्हा तेलुगू देसमबरोबर केलेल्या युतीचा फायदा झाला होता. भाजपला स्वबळावर फार काही यशाची अपेक्षा नव्हती. यातून भाजपने मग तेलुगू देसम आणि जनासेना या दोन पक्षांबरोबर युती केली. चंद्राबाबूंनाही भाजपची गरज होती. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत खाते उघडण्यात भाजपला युतीमुळे यश आले. दक्षिणकडील राज्यांमध्ये भाजपची फारशी ताकद नसताना आंध्रमध्ये सत्तेचा लाभ होणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra pradesh assembly elections telugu desam set to return to power ysr congress faced defeat how chandrababu naidu defeat jagan mohan reddy print exp psg
Show comments