-हृषिकेश देशपांडे
प्रख्यात अभिनेते आणि आंध्र प्रदेशातील जनसेना पक्षाचे संस्थापक के. पवन कल्याण यांच्याविरोधात विशाखापट्टणम येथे राज्यातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे राज्यात संघर्ष वाढला आहे. मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांना पवन कल्याण यांच्या वाढत्या लोकप्रियतेची धास्ती आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तीन राजधान्यांवरून वाद…
आंध्र प्रदेशातून तेलंगणा हे स्वतंत्र राज्य २०१४ मध्ये निर्माण झाले. पूर्वीच्या आंध्रची राजधानी हैदराबाद हे तेलंगणाची राजधानी झाली. त्यामुळे आंध्रमध्ये राजधानीसाठी शोध सुरू झाला. मुख्यमंत्री जगनमोहन यांनी विकेंद्रीकरणासाठी तीन राजधान्या असाव्यात असा निर्णय घेतला. त्यावरून वाद झाला. जगनमोहन यांच्या निर्णयानुसार विशाखापट्टणम ही प्रशासकीय, अमरावती ही विधिमंडळ कामकाजविषयक तर कर्नुल ही न्यायसंस्थेसाठी राजधानी म्हणून विकसित करण्याचे जाहीर केले. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र पवन कल्याण यांनी तीन राजधान्या ठेवण्यास विरोध केला आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अमरावती हीच राजधानी ठेवा अशी पवन कल्याण यांची मागणी आहे. त्याला जनसेना पक्षाचा युतीतील भागीदार भाजपनेही पाठिंबा दिला आहे. पवन कल्याण हे राज्यभर जगनमोहन सरकारविरोधात रान पेटवत आहेत.
आंध्रच्या राजकारणात अभिनेत्यांचे महत्त्व…
आंध्र प्रदेशात अभिनेत्यांचा मोठा चाहता वर्ग असतो. राजकारणात त्यांनी प्रवेश केल्यावर हेच पाठीराखे त्यांच्या मागे उभे राहतात असा अनुभव आहे. पवन कल्याण हे अभिनेते चिरंजीवी यांचे धाकटे बंधू. १४ मार्च २०१४ मध्ये त्यांनी जनसेना पक्षाची स्थापना केली. त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीत भाग न घेता तेलुगू देसम-भाजप आघाडीला पाठिंबा दिला. मात्र नंतर काही मुद्द्यावर तेलुगू देसमशी त्यांचे मतभेद झाले. २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीत पलाकोल ही एकमेव जागा त्यांच्या पक्षाला जिंकता आली. पवन कल्याण हे दोन मतदारसंघांतून पराभूत झाले. निकालानंतर सातत्याने जनतेचे प्रश्न ते उपस्थित करत आहेत.
राज्यभर दौरे…
या वर्षाच्या सुरुवातीपासून पवन कल्याण यांची राज्यभर दौरे सुरू केले. आंध्रमध्ये अशा दौऱ्यांचे तसेच पदयात्रांचे महत्त्व आहे. वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन काय किंवा त्यांचे वडील राजशेखर रेड्डी यांनी अशा संवाद यात्रांमधूनच राज्यात सत्ता परिवर्तन घडविल्याचा इतिहास आहे. आताही पवन कल्याण शेतकरी, महिला, बेरोजगार, तरुणांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे सत्ताधारी अस्वस्थ झाल्याचा आरोप होत आहे. विशाखापट्टणम येथे रविवारी पवन कल्याण यांना जनवाणी कार्यक्रमात रोखण्यात आले. शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे, राज्य सरकारवर विविध आरोप किंवा पायाभूत सुविधांचा अभाव या बाबी जनतेपुढे मांडून सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करत आहेत. गेल्या दोन महिन्यांत सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या नेतृत्वाला त्यांनी लक्ष्य केले आहे. त्यामुळेच जगनमोहन यांनी मंत्र्यांना जनतेत जाऊन तीन राजधान्यांच्या मुद्द्यावर आपली बाजू मांडा असे निर्देश दिले आहेत. विखाशापट्टणम येथे रविवारी हे दोन्ही कार्यक्रम एकाच शहरात आल्याने या संघर्षाला धार आली, त्यातून पवन कल्याण यांना स्थानबद्ध केल्याने वाद चिघळला.
राज्यातील राजकारण…
आंध्र विधानसभेला अद्याप दोन वर्षे आहेत. सत्ताधारी जगनमोहन यांचा वायएसआर काँग्रेसची स्थिती भक्कम वाटत आहे. विधानसभेत त्यांच्या मागे मोठे बहुमत आहे. गेल्या अडीच वर्षांत झालेल्या सर्व पोटनिवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला तेलुगू देसमला सूर सापडलेला नाही. त्या पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू गेल्या निकालातील दारुण पराभवानंतर नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत चाचपडत आहेत. भाजप विरोधी गोटात जावे की अनुकूल भूमिका घ्यावी हे त्यांनी उघड केलेले नाही. अर्थात राज्यात भाजपचेही फारसे संघटन नाही. भाजपने प्रजा पोरू नावाचे जनसंपर्क अभियान राज्यात सुरू केले आहे. केंद्रात विशेषत: राज्यसभेत तसेच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर जगनमोहन यांनी भाजपशी सहकार्याची भूमिका बजावली आहे. त्यामुळे पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते वायएसआरवर कठोर टीका टाळतात असा आक्षेप घेतला जातो. अर्थात जनसेना पक्ष व भाजप यांची आघाडी आहे. पवन कल्याण यांच्या सभांना गर्दी होत असली तरी, मतांमध्ये ती परिवर्तित होणार काय, हा मुद्दा आहे. मात्र आगामी काळात वायएसआर काँग्रेस विरुद्ध पवन कल्याण हा संघर्ष वाढणार हे नक्की.