भाषा हे आपले विचार, भावभावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. मूलतः दोन व्यक्तींमधील संपर्क साधण्याचे महत्त्वाचे काम भाषा करते. मानवी उत्क्रांतीच्या प्रारंभीच्या टप्प्यात ज्या वेळेस भाषा निर्माण झाली नव्हती, त्या वेळेस माणसाने संपर्कासाठी आवाजाच्या माध्यमाचा वापर केला. या संपर्क साधण्याच्या प्रक्रियेत जगात आज बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषा निर्माण झाल्या आहेत. जगातील वेगवेगळ्या भाषा ज्या भागात, ज्या ठिकाणी निर्माण झाल्या; त्या भागाची त्या ओळख ठरल्या. भाषा व संस्कृती यांचा निकटवर्ती संबंध आहे. जगाच्या इतिहासात जो जेता असतो त्याचीच भाषा व पर्यायाने संस्कृती आत्मसात केली जाते. कदाचित जेते सुरुवातीस पराभूतांची भाषा वापरतातही. कारण तेव्हा पर्याय नसतो. जगाच्या नकाशात होणारी युद्धे ही केवळ शस्त्राच्या बळावर होतात असे नाही. अर्थशास्त्र हा समोर असून न दिसणारा घटक जगातील युद्धांच्या पायाभरणीतील महत्त्वाचा दुवा आहे. जो आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो त्याच्याकडे जेतेपद आपसूकच जाते आणि त्याच्याच भाषेचा व संस्कृतीचा बोलबाला ऐकू येतो. याचाच परिणाम म्हणून १७ व्या शतकापासून जागतिक व्यापारात अधिसत्ता गाजवणाऱ्या ब्रिटिशांच्या इंग्रजी भाषेचा प्रभाव संपूर्ण जगावर दिसतो. अमेरिका आर्थिक महासत्ता असली तरी ब्रिटिशांच्या वसाहतीनंतर ही गोष्ट घडून आली आहे. या वसाहतीनंतर इंग्रजी ही अमेरिकेच्या संवादाची भाषा ठरली. त्यानंतर आज अमेरिकेतील स्थानिक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यायाने अमेरिकेतील मूळची पॅलिओ इंडियन्स यांची संस्कृती ही त्याच नाशाच्या वाटेवर आहे. त्यामुळे तुमची भाषा व संस्कृती यांचा संबंध तुमच्या देशाच्या अर्थशास्त्राच्या बळकटीशी अधिक आहे. म्हणूनच भाषा व संस्कृती यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावरून जगाच्या इतिहासात अनेक युद्धेही झाली आहेत व होत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा