दक्षिण आशियाई देश असलेल्या कंबोडियामध्ये असलेले ‘अंगकोर वाट’ हे मंदिर आता ८ वे आश्चर्य म्हणून ओळखले जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वात मोठी धार्मिक रचना म्हणून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये त्याची नोंद आहे. अंगकोर वाट हे निःसंशयपणे जगातील अनेक आकर्षणांपैकी एक आहे. या मंदिराने इटलीच्या पॉम्पेईला मागे टाकत जगातील ८ वे आश्चर्य होण्याचा मान मिळविला आहे. या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त स्थापत्य रचनेचा हिंदू धर्माशी आणि भारतीय संस्कृतीशी दृढ संबंध आहे. अंगकोर वाट हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ देखील आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंगकोर वाट हे जगप्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. मूलतः हे मंदिर भगवान विष्णूंचे असून इसवी सनाच्या १२ व्या शतकात उत्तर कंबोडियामध्ये सूर्यवर्मन दुसरा या राजाच्या कालखंडात बांधण्यात आले होते. सूर्यवर्मन दुसरा याने इसवी सनाच्या १११३ ते ११५० या कालावधीत राज्य केले. या मंदिरामुळेच भारत आणि कंबोडिया यांच्यामधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बंध समजण्यास मदत होते. नंतरच्या काळात हा मंदिर परिसर बौद्ध धर्मियांच्या प्रभावाखाली गेल्याने हे स्थळ बौद्ध धार्मियांसाठी देखील तितकेच महत्त्वाचे ठरले. एकूणात हे मंदिर ४०० एकरहून अधिक परिसरावर पसरलेले आहे, म्हणूनच जगातील सर्वात मोठ्या धार्मिक स्थळांमध्ये या मंदिराचे स्थान विशेष मानले जाते. अंगकोर वाट याचा अर्थ स्थानिक ख्मेर भाषेत “मंदिराचे शहर” असा होतो. १९७० च्या दशकात ख्मेर रूज राजवटीत आणि पूर्वीच्या प्रादेशिक संघर्षांमध्ये या मंदिराचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे या मंदिरात सद्य:स्थितीत कोणतेही कोणतेही धार्मिक विधी होत नाहीत. असे असले तरी कंबोडियामधील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.

अधिक वाचा: तुळशी विवाहामागच्या प्रथा- परंपरा काय आहेत?

अंगकोर वाट कुठे आहे?

अंगकोर वाट २००,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आधुनिक कंबोडियन शहर सिएम रीपच्या उत्तरेस सुमारे पाच मैलांवर स्थित आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार या मंदिराचा परिसर ख्मेर साम्राज्याची राजधानीचा होता. ख्मेर भाषेत ‘अंगकोर’ या शब्दाचा अर्थ ‘राजधानी/नगर’ असा होतो, तर ‘वाट’ या शब्दाचा अर्थ ‘मंदिर’ असा होतो. सुरुवातीला, अंगकोर वाटची रचना हिंदू मंदिर म्हणून करण्यात आली होती, परंतु, १२ व्या शतकाच्या अखेरीस ते बौद्ध स्थळ मानले गेले. बौद्ध धर्मीय धारणेनुसार मंदिराच्या बांधकामाची आज्ञा इंद्र देवाने दिली होती आणि हे काम एका रात्रीत पूर्ण झाले होते. या मंदिराचे काम राजा सूर्यवर्मन यांच्या कालखंडात झाल्याचे अभिलेखीय पुरावे उपलब्ध आहेत. या अभिलेखामध्ये नमूद केल्याप्रमाणे दिवाकर पंडित नावाच्या राजपुरोहिताने सूर्यवर्मन याचा राजा म्हणून राज्याभिषेक केला होता. किंबहुना याच लेखातून या राजाच्या राज्यविस्ताराविषयी माहिती मिळते. सूर्यवर्मन याने व्हिएतनामपर्यंत आपले राज्य वाढविले होते. सूर्यवर्मन हा विष्णूचा परम भक्त होता. याच्या काळात अनेक विष्णू मंदिरे बांधली गेली. त्या सर्वांमध्ये अंगकोर वाट हे भव्य तसेच कला व स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.

अंगकोर वाटची रचना

इतर अनेक ऐतिहासिक स्थळांप्रमाणे हे मंदिर देखील विस्मरणात गेले होते. १८४० साली फ्रेंच प्रवासी हेन्री मौहॉट यांनी केलेल्या नोंदी मुळे पुन्हा एकदा जगाचे लक्ष या मंदिराकडे वळले. या मंदिराच्या बांधकामात वालुकाष्म दगडाचा वापर करण्यात आलेला आहे. या मंदिराच्या सभोवती विस्तीर्ण खंदक असून १५ फूट उंच प्राकार भिंत आहे. या प्राकाराच्या आत, अंगकोर वाट मंदिर ४०० एकरांपेक्षा जास्त परिसरात पसरलेले आहे. या मंदिराची कला शैली अंगकोर वाट शैली म्हणून ओळखली जाते. मंदिराच्या भिंतींवरील अप्सरांची शिल्पे ही या मंदिराच्या आकर्षणाची केंद्रबिंदू आहेत.

अधिक वाचा: भारतीय कला-साहित्यातील देवी लक्ष्मीची बदलती प्रतिमा!

युद्धशिल्पे

या मंदिरात अनेक युद्धशिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पांमध्ये वेगवेगळ्या युद्धांचा समावेश आहे. कृष्णाचं बाणासुराशी झालेलं युद्ध, विष्णूचं असुरांशी झालेलं युद्ध, लंकेचं युद्ध, देवांचं आणि असुरांचं युद्ध, कुरुक्षेत्राचं युद्ध इत्यादींचा समावेश होतो. मूलतः हे विष्णूच मंदिर असल्याने यात विष्णूशी संबंधित वेगवेगळ्या प्रतिमांचा – प्रसंगांचा समावेश होतो. खुद्द सूर्यवर्मन व त्यांच्या दरबारातील अनेक प्रसंग या मंदिराच्या भिंतीवर कोरण्यात आले आहेत. राजा व राजाच्या अधिकाऱ्यांच्या शिल्पांजवळ नाम पट्ट कोरण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या शिल्पांची ओळख पटते. या मंदिराच्या मध्यभागी एक गर्भगृह आहे. या गर्भगृहात विष्णूची प्रतिमा प्रतिष्ठापित करण्यात आली होती. गर्भगृहाच्या कोपऱ्यात शिखर असलेल्या गर्भगृहाच्या प्रतिकृती कोरण्यात आलेल्या आहेत. सूर्यवर्मन नंतरच्या राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यामुळे विष्णूच्या जागी बुद्ध मूर्ती स्थापन करण्यात आली.

आजचे अंगकोर वाट

कधी काळी वैभव अनुभवणाऱ्या या मंदिराची दुरावस्था झाली होती. अतिवृष्टीपासून भूकंपापर्यंत तसेच गृहयुद्धामुळे या मंदिराचे प्रचंड नुकसान झाले होते. या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे श्रेय फ्रेंचांकडे जाते. नंतरच्या काळात भारत, जर्मनी या देशांनी या मंदिराच्या संवर्धनासाठी विशेष योगदान दिलेले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankorwat temple is recognized as the eighth wonder of the world what is the relationship of this temple with hindu culture svs
Show comments