Ramnavmi 2023 भारतीय कथासंभारात रामायणाला विशेष पसंती देण्यात आली आहे. अनेक भाषा, समूह, प्रांत यांच्या मर्यादा ओलांडून रामायण गेली शेकडो वर्षे भारतीय जनमानसावर अधिराज्य करत आहे. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर, अगदी पार आग्नेय आशियातील देशांमध्येही, रामायण पोहोचलेले दिसते. त्यामध्ये वाल्मीकी रामायणातील मूळ कथेमध्ये काही प्रांतिक तर काही स्थानिक बदलही झालेले संशोधकांना आढळून आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतात प्रादेशिक भाषांमधून, तसेच विविध प्रांतांमध्ये रामकथा आणि रामायण अस्तित्वात आले. या विविध आवृत्त्यांमधून तत्कालीन प्रदेशाची भौगोलिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्थिती समजण्यास मदत होते. त्यामुळेच भारतीय संस्कृतीत या परंपरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात अशाच स्वरूपाच्या स्थानिक रामकथा विविध काळांत रचण्यात आल्या होत्या. याच स्थानिक कथा-काव्यसंग्रहातील एक कथा ‘अंकुशपुराणा’च्या स्वरूपात आजही २१व्या शतकात आपले वेगळेपण अबाधित ठेवून आहे.
आणखी वाचा : विश्लेषण : ॲरिस्टॉटल ते २१ वे शतक : कांद्याचा रोचक प्रवास
अंकुशपुराण आहे तरी काय? त्याचा कर्ता कोण होता?
अंकुशपुराण हे लोककथा-काव्य १७व्या शतकात महाराष्ट्रात रचण्यात आले असावे, असे अभ्यासक मानतात. हे कथानक स्त्रीवर्गात अतिशय लोकप्रिय होते. तत्कालीन जात्यावरच्या ओव्यांचा हा आवडीचा विषय होता. या कथानकाचा गाभा हा सीतेच्या वेदनेशी साधर्म्य सांगणारा आहे. त्यामुळे सामान्य स्त्रीवर्गाचा हा जिव्हळ्याचा विषय होता. असे असले तरी या रामकाव्यकथेचा कर्ता लक्ष शिवदास हा पुरुष होता ही बाब लक्षणीय मानावी लागेल. हे कथाकाव्य म्हणजे लोकरामायणाचे उत्तरकांडच आहे. सीतापरित्याग व त्यानंतरच्या वनवासाची कथा हा या लोककथा-काव्याचा मुख्य विषय आहे.
अंकुशपुराणाच्या केंद्रस्थानी सीता
अंकुशपुराण हे रामायणाचे उत्तरकांड असल्याने कथेची सुरुवात सीतेला गृहत्याग करावयास लागणाऱ्या घटनेपासून होते. सर्वसाधारण अनेक रामकथांमध्ये धोबी हा सीतेच्या गृहत्यागाला कारणीभूत ठरतो, असे कथानक पाहायला मिळते. इथे अंकुशपुराण हे आपले वेगळेपण सिद्ध करते. या कथेत कैकेयी हीच सीतेच्या दुसऱ्या वनवासाला कारणीभूत ठरली. कथेनुसार कैकेयी, कौसल्या व सुमित्रा या कालहरणासाठी सीतेच्या भवनात जातात. येथे कैकेयी सीतेला रावणाचे चित्र रेखाटण्याचा आग्रह करते, यात कैकेयीचे कपट लपलेले आहे. कथानकानुसार सीता ही निरागस आहे. आपल्या सासूच्या कपटापासून अनभिज्ञ आहे. म्हणूनच ती रावणाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याचे चित्र काढून थांबते व यापलीकडे मी रावणास पाहिले नाही असे सांगते. कैकेयी आपल्या ऐकीव माहितीच्या आधारे रावणाचे चित्र पूर्ण करते व त्याच्या पायाजवळ राम व लक्ष्मण यांचे लहान स्वरूपात चित्र रेखाटते. यानंतर सीतेच्या परोक्ष दरबारात जाऊन चित्राचे उदाहरण देऊन सीतेने रावणाला आपल्या भवनात आणले व रघुकुलाचा नाश केला अशी आरोळी ती ठोकते.
कैकेयी इथेदेखील खलनायिकाच
कैकेयीने ठोकलेली आरोळी द्वयर्थी होती. रावण त्या वेळी जिवंत नव्हता व सीता गरोदर होती. सहा महिन्यांच्या गरोदर असलेल्या सीतेला वनात पाठवावे किंवा देहदंडाची शिक्षा द्यावी असे कैकेयी रामास सुचवते. या प्रसंगानंतर रामायणातील उत्तरकांडाच्या कथेची सुरुवात होते. सासूच्या कपटामुळे सीतेला सहन कराव्या लागणाऱ्या वेदनादायी प्रसंगांचे वर्णन कथाकाव्याच्या कर्त्याने अतिशय हळव्या भाषेत केले आहे. त्यामुळेच या कथाकाव्याचा प्रभाव सामान्य स्त्री-हृदयावर गेली पाच शतके आहे.
आणखी वाचा: Hikayat Seri Ram मलेशियातील मुस्लिमांना प्रिय ‘राम’ नाम असलेले ‘हिकायत सेरी राम’ नेमके आहे तरी काय?
रावणाच्या मर्मस्थानाभोवती फिरणारे कथानक
या कथेत सीतेने रावणाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याचे चित्र रेखाटले होते. प्रसिद्ध अभ्यासक डॉ. रामचंद्र चिंतामण ऊर्फ रा. चिं. ढेरे यांनी नमूद केल्याप्रमाणे रावणाच्या पायाचा डावा अंगठा हे त्याचे मर्मस्थान होते. मर्मस्थान म्हणजे शरीराच्या ज्या भागात किंवा शरीराबाहेर ज्या ठिकाणी त्या शरीराचा प्राण आहे ते ठिकाण. त्या मर्मस्थानावर आघात केल्याने मृत्यू होतो. म्हणूनच मराठी भाषेत एखाद्याला टोचून बोलल्यानंतर ‘त्याच्या मर्मस्थानी आघात झाला’ हा भावार्थाने वाक्प्रचार रूढ झाला आहे. वेगवेगळ्या अनेक रामायणांमध्ये रावणाचे मर्मस्थान हे निरनिराळे आहे. म्हणजेच रामाला रावणाचा वध करण्यासाठी लागणाऱ्या जागा कथेच्या भेदानुसार वेगवेगळ्या आहेत. आदिवासी व थाई रामायणात रावणाचा जीव हा त्याच्या शरीराबाहेर एका पेटीत होता. अध्यात्म रामायणानुसार रावणाचा जीव त्याच्या नाभीप्रदेशात होता तर दाक्षिणात्य रामकथांनुसार त्याच्या एका शिरात त्याचा प्राण होता. प्रत्येक कथेनुसार मर्म जाणून राम हा लक्ष्मण व हनुमान यांच्या मदतीने रावणाचा वध करतो.
रावणाचे मर्मस्थान व महाराष्ट्र – तिबेट संबंध
अंकुश रामायणात सीतेने रावणाच्या पायाचा अंगठा रेखाटण्यात तिचा नेमका उद्देश काय असावा ? या प्रश्नाचे उत्तर रावणाच्या मर्मस्थानात आहे.अंकुशपुराणात सीतेने रेखाटलेले रावणाच्या अंगठ्याचे चित्र हे केवळ तिच्या स्मृतिपटलावरील रावणाचे प्रतिबिंब नाही; तर बलात्काराने अपहरण करणाऱ्या नराधमाच्या वधाचा स्त्री-मनाने व बुद्धीने बाळगलेला ध्यास होता. तिबेटी व खोतानी रामायणांत रावणाचे प्राण हे त्याच्या पायाच्या अंगठ्यात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तेच मर्मस्थान अंकुशपुराणातदेखील आहे. त्यामुळेच या मराठी पुराणाचा व तिबेट-खोतान यांचा काही संबंध असावा का, असा प्रश्न पडतो. अशाच स्वरूपाचा संदर्भ भावार्थ रामायणातदेखील असल्याने महाराष्ट्र व तिबेट-खोतान यांच्यातील संस्कृतिबंध सिद्ध होतो. संत एकनाथांच्या भावार्थ रामायणात जटायू व रावण यांच्यातील सीताअपहरणाच्या वेळचा प्रसंग हा हृदय पिळवटून टाकणारा आहे. या संघर्षात जटायू व रावण यांच्यातील संवाद हा रावणाचे अंकुशपुराणातील मर्मस्थान समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. या संघर्षात रावण जटायूला आपले मर्मस्थान आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यात असल्याचे खोटे सांगतो. त्या वेळी सीता समोर असल्याने सीतेच्या दृष्टिकोनातून रावणाचा जीव हा त्याचा पायाच्या अंगठ्यात होता, त्यामुळे संपूर्ण अंकुश-रामायण हे स्त्रीभावनांशी संलग्न असल्याने रावणाच्या पायाचा अंगठा हा या कथेच्या केंद्रस्थानी आहे.
डाव्या पायाचा अंगठा आणि रावणवध
या कथेतील सीतेवर तिला रावणाचा अंगठा लक्षात राहिला कसा हा आरोप होतो. रामायणाच्या कथानकांमध्ये सीतेने कधीच रावणाकडे पहिल्याचा उल्लेख नाही; तसा तो या लोकसाहित्यातही नाही. रावणाच्या उपस्थितीत तिची नजर नेहमी जमिनीकडे होती, त्यामुळे साहजिकच रावणाचे पायच तिने पहिले असणार. तरीदेखील संपूर्ण पाय न रेखटता डाव्या पायाचा अंगठा रेखाटून सीतेने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या भावना रावणवधाशी निगडित आहेत. यामागे रावणाविषयीची कुठलीही आसक्ती असण्याचा प्रश्नच येत नाही. तरी या कथेतून सीतेच्या मनाची वेदना व कैकेयीचे कपट यांपैकी व्यक्तिशः वाचकाला जो प्रसंग भावतो तोच प्रसंग या कथेचे व त्या व्यक्तीचे मर्मस्थान आहे.