-भक्ती बिसुरे

कोणत्याही साथरोगाच्या दृष्टीने हिवाळा हा तसा संवेदनशील काळ समजला जातो. गेली अनेक वर्षे स्वाइन फ्लू या आजाराचे रुग्ण हिवाळ्यात वाढतात हे आपण पाहतो. करोना या महासाथीने गेली साधारण तीन वर्षे मानवी जगण्याचे आयाम बदलले आहेत. महासाथ सुरू झाल्यानंतरच्या प्रत्येक हिवाळ्यात करोना साथरोगाचे गंभीर रूप जगातील सर्वच देशांनी अनुभवले आहे. त्यामुळेच आता येऊ घातलेला हिवाळा नवी करोना लाट आणेल की सध्या दिसणारे निवळलेले साथरोगाचे चित्र तसेच कायम राहील, याबाबतच्या चर्चांना विज्ञान आणि वैद्यक शास्त्राच्या वर्तुळात उधाण आले आहे. ‘सायन्स न्यूज’ या नियतकालिकाने याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे.

हिवाळा आणि साथरोगाचा संबंध?

बहुतांश हंगामी आजार निर्माण करणारे विषाणू (सीझनल व्हायरस) हे हिवाळ्यात अधिक सक्रिय असतात. त्याचाच परिणाम म्हणून साथरोगाच्या संसर्गाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्याही हिवाळ्यात वाढताना दिसून येते. जगातील अनेक भागांमध्ये हिवाळ्यात इन्फ्लूएंझाचे रुग्ण वाढतात. आपल्याकडे भारतातही मान्सून परत गेल्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागते. हिवाळा सुरू झाल्यानंतर भारतातही विषाणूंमुळे होणारे श्वसनसंस्थेशी संबंधित आजार बळावतात. योग्य वेळी उपचार न घेतल्यास या आजारांची गुंतागुंत वाढते. रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज भासते. काही रुग्ण सहव्याधीग्रस्त असतील तर त्यात जीवही गमावतात. करोना विषाणू संसर्गाचा त्याच्या सुरुवातीपासूनच श्वसनसंस्थेशी निकट संबंध आहे. आता हिवाळा सुरू होत आहे आणि चीनसह सर्वत्र करोनाच्या ओमायक्रॉन या वेगवान संक्रमण करणाऱ्या ओमायक्रॉनचे नवनवे प्रकार सापडत असल्याचेही दिसत आहे. त्यामुळेच आता हिवाळ्याच्या सुरुवातीला करोना साथरोगाबाबत खबरदारीची चर्चा पुन्हा सुरू होताना दिसत आहे.

परदेशात नव्या लाटेची चिंता?

हिवाळ्याच्या आगमनाबरोबर परदेशात अनेक ठिकाणी करोना साथरोगाच्या नवीन लाटेची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ब्रिटनसह अन्य युरोपीय देशांमध्ये ही चिंता नागरिक आणि आरोग्य यंत्रणांनाही भेडसावत आहे. सरकारी नोंदीमध्ये त्याची कोणतीही दखल दिसत नसली तरी तापमानातील घट आणि रुग्णसंख्येचा वर जाणारा आलेख यांचा संबंध अगदी सहज लक्षात येत आहे, असे निरीक्षण तेथील तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आता करोनावर उपचार करण्याबाबत स्पष्टता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडे आहे. बहुसंख्य नागरिक प्रत्यक्ष संसर्ग किंवा करोना प्रतिबंधात्मक लसीकरण या दोन कारणांमुळे करोनाच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे रोगाविरुद्ध प्रतिकारशक्तीही आहे. मात्र, गेल्या काही काळात करोना साथरोगाची तीव्रता निवळल्यामुळे नागरिकांनी सर्व प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब सोडून दिला आहे. बहुतांश जगाने मुखपट्टी वापरण्याची सक्ती आता रद्द केली आहे आणि बहुसंख्य नागरिकही मुखपट्टीला दुरावले आहेत. त्यामुळे यंदाचा हिवाळा करोना रुग्णसंख्येच्या दृष्टीने कसा असेल, याबाबत अंदाज व्यक्त करणे आणि प्रतिबंधात्मक उपायांचे आवाहन या दोन गोष्टी सोडल्यास अवघे जगच काय घडते ते पाहण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे.

चिंता सतत बदलणाऱ्या ओमायक्रॉनचीच?

ओमायक्रॉन या करोना प्रकारात सातत्याने होत असलेले बदल (म्युटेशन) त्या विषाणूला जिवंत ठेवण्यासाठी पूरक ठरत आहे. त्यातूनच मानवाने आतापर्यंत मोठ्या कष्ट आणि वेदनेतून मिळवलेल्या रोगप्रतिकारशक्तीला हुलकावणी देण्यात ओमायक्रॉन यशस्वीही ठरत आहे. बीए.२ या ओमायक्रॉन प्रकाराला गारद करत बीए.५ या ओमायक्रॉनच्या प्रकाराने मधल्या काळात चांगलेच थैमान घातले. त्यानंतर आता चीनमध्ये बीएफ.७ आणि बीए.५.१.७ हे ओमायक्रॉनचे नवे प्रकार आढळले आहेत. भारतात एक्सबीबी, बीए.२.३.२० आणि बीक्यू.१ हे नवे प्रकार आढळले असून त्यांपैकी एक्सबीबीची संक्रमण क्षमता बीए.२.७५ पेक्षा अधिक असल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसून येत आहे. ओमायक्रॉनचे असे नवनवे प्रकार येणे आणि त्यातील बहुसंख्य प्रकारांकडे रोगप्रतिकारशक्ती भेदण्याची क्षमता असणे हे यंदाच्या हिवाळ्याच्या दृष्टीने प्रामुख्याने चिंताजनक असल्याचे जागतिक स्तरावर करण्यात येत असलेल्या विविध संशोधनांतून अधोरेखित होताना दिसत आहे.

गरज नेमक्या संरक्षण आणि उपायाची?

ओमायक्रॉनच्या नवनवीन प्रकारांबाबत चिंतेची बाब म्हणजे एकदा संसर्ग होऊन बऱ्या झालेल्या व्यक्तींनाही नव्या प्रकारांचा संसर्ग पुन्हा होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर सातत्याने नेमके संरक्षण आणि नेमके उपाय यांची गरज अधोरेखित होत आहे. अमेरिकेत वापरात असलेल्या काही औषधांनीही ओमायक्रॉनच्या नवीन प्रकारांच्या रुग्णांवर फारसा सकारात्मक परिणाम दाखवला नसल्याची माहिती आहे. या सगळ्या परिस्थितीत हिवाळा सुसह्य करायचा असेल आणि नवीन लाटेचा धोका टाळायचा असेल तर आपण बाजूला ठेवलेले किंवा विस्मरणात गेलेले करोना प्रतिबंधात्मक उपाय पुन्हा एकदा गांभीर्याने अवलंबण्याची गरज वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दूर झालेली मुखपट्टीही स्वसंरक्षणासाठी पुन्हा जवळ करण्याची गरज आहे.

Story img Loader