सौदी अरेबिया, कतार अशा श्रीमंत देशातून मोठ्या प्रमाणावर क्रीडा गुंतवणूक होत आहे. अनेक आकर्षक योजना त्यांनी पुढे आणल्या आहेत. आता तर सौदी अरेबियाने क्रिकेटमध्ये उतरण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी फ्रॅंचायझी तत्त्वावर आधारित ट्वेन्टी-२० लीग आयोजित करण्याचा त्यांचा प्रस्ताव असून, गेली वर्षभर ते यासाठी प्रयत्न करत आहेत. सौदी अरेबियाच्या या नव्या क्रिकेट धोरणाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.
सौदी अरेबियाची नेमकी योजना काय?
सौदी अरेबियाने क्रीडा क्षेत्रातील आपली गुंतवणुक वाढविण्यास सुरुवात केली आहे. फुटबॉल, टेनिस, गोल्फ, फॉर्म्युला वनपाठोपाठ आता या देशाने आपला मोर्चा क्रिकेटकडे वळवला आहे. क्रिकेट विश्वात लोकप्रिय होणाऱ्या फ्रॅंचायझी आधारित ट्वेन्टी-२० क्रिकेटची निवड त्यांनी केली असून, यासाठी त्यांनी ५०० दशलक्ष डॉलर्स (रुपयात सुमारे ४३ अब्जांहून अधिक) इतकी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.
सौदी लीगला पाठिंबा कुणाचा?
या लीगसाठी सौदी अरेबियातीलच एसआरजे स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंटचा आर्थिक पाठिंबा लाभला आहे. फुटबॉलच्या ए लीगचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनी टाउनसेंड यांच्याकडे लीगचे नेतृत्व सोपविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एसआरजे गेल्या वर्षीपासून या लीग संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी चर्चा करत आहे.
नेमके उद्दिष्ट काय?
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू नील मॅक्सवेलच्या कल्पनेतून ही लीग समोर आली. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंचा यामध्ये मोठा सहभाग अपेक्षित आहे. कारण, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू संघटनेच्या माध्यमातून या लीगच्या उद्दिष्टांवर काम केले जात आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या पारंगत देशाच्या पलिकडे जाऊन कसोटी क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी महसूल उभा करणे, हा यामागील प्रमुख उद्देश आहे. ही लीग प्रत्यक्षात येईल तेव्हा ती आयपीएल आणि बीबीएलच्या (बिग बॅश लीग) बरोबरीने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आपले आस्तित्व सिद्ध करेल.
लीगचे प्रस्तावित स्वरूप कसे आहे?
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचे व्यवस्थापन पाहणाऱ्या नील मॅक्सवेलची ही प्रमुख कल्पना आहे. ती सौदी अरेबियाने प्रत्यक्षात उतरविण्याची तयारी दर्शविली आहे. फ्रॅंचायझी क्रिकेट स्वरूपातील लीगमध्ये आठ संघांचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून, ही लीग टेनिस ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धांच्या धर्तीवर वर्षातून चार वेळा वेगवेगळ्या केंद्रांवर खेळविण्यात येईल. यातील एक केंद्र ऑस्ट्रेलिया असेल आणि अन्य तीन केंद्रे ही नवीन असतील. लीगमध्ये पुरुष, महिलांचे सामने होतील. अंतिम सामना सौदी अरेबियात अपेक्षित आहे.
‘आयसीसी’समोर आव्हान?
सध्या कसोटी क्रिकेटचे अस्तित्व क्रिकेट खेळणाऱ्या प्रमुख देशांच्या पलिकडे फारसे राहिलेले नाही. याबाबत ‘आयसीसी’देखील चिंतेत आहे. पण, थोडा पुढचा विचार करून खेळाडूंना चांगला मोबदला मिळवण्याची आणि पर्यायी उत्पन्नाचा स्रोत स्थापित करण्याची या लीगची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सध्या प्रसारण कंपन्या आणि वितरकांकडून ‘आयसीसी’ला मिळणाऱ्या उत्पन्नाचा सर्वाधिक वाटा भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडला मिळतो. त्यामुळे लहान देशांना आर्थिक व्यवहार्यतेसाठी संघर्ष करावा लागतो. हीच तफावत दूर करण्याचा या लीगचा प्रयत्न आहे.
‘आयपीएल’, ‘बीबीएलला’ आव्हान?
सौदी अरेबिया आपल्या लीगच्या व्यवस्थापनाबाबत ठाम आहे. सध्या आयपीएल आणि बिग बॅशचा क्रिकेट विश्वावर मोठा पगडा आहे. ही लीग त्यांच्या स्पर्धेत कुठेच उतरत नाही. त्यांचे नियोजन स्वतंत्र आणि वर्षांतून चार वेळा असणार आहे. अर्थात हा सगळा विचार ‘आयसीसी’ने मान्यता दिल्यानंतरचा आहे. या लीगला मान्यता मिळाल्यास ‘आयपीएल’ आणि ‘बीबीएल’च्या वेळापत्रकाला धक्का न लावता ही लीग खेळविली जाणार आहे.