पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या शिफारशीनुसार ९ ऑगस्ट रोजी पार्लमेंटचे कनिष्ठ सभागृह म्हणजेच नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्यात आली. संसदेच्या पाच वर्षांचा कार्यकाळ १२ ऑगस्ट रोजी संपुष्टात आला आहे. लवकरच पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका आयोजित करण्यात येणार आहेत. तत्पुर्वी तेथील राजकीय नेते अन्वर-उल-हक काकर यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अन्वर-उल-हक काकर कोण आहेत? पंतप्रधानपद आल्यामुळे त्यांच्यावर कोणती जबाबदारी येणार आहे? हे जाणून घेऊ या..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काकर पाकिस्तानचे नवे काळजीवाहू पंतप्रधान

अन्वर-उल-हक काकर यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानचे राष्ट्रपती अरिफ अलवी यांच्या हस्ते पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला लष्करप्रमुख (COAS) असीम मुनीर, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ समितीचे अध्यक्ष जनरल नदीम रझा आणि माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित होते. याआधी शरीफ यांनी संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. शरीफ तसेच विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांच्यात संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीनंतर पाकिस्तानचे काळजीवाहून पंतप्रधान म्हणून अन्वर-उल-हक काकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

तसे निवेदन रविवारी (१३ ऑगस्ट) जारी करण्यात आले होते. या निवेदनात शाहबाज शरीफ यांनी अन्वर-उल-हक काकर यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ते आगामी काळात पाकिस्तानचा राज्यकारभार पारदर्शी पद्धतीने पार पडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अन्वर-उल-हक काकर कोण आहेत?

अन्वर-उल-हक काकर हे ७१ वर्षांचे आहेत. ते बलुचिस्तान प्रदेशातील किला शैफुल्लाह प्रदेशातून येतात. ते अस्खलितपणे इंग्रजी, पर्शियन, बलोची, ब्राहवी, उर्दू तसेच पश्तू भाषा बोलतात. जिओ न्यूजनुसार (Geo News) काकर यांनी पाकिस्तानमधील क्वेटा येथे शिक्षण घेतलेले आहे. उच्च शिक्षणसाठी ते लंडनला गेले होते. शिक्षण घेऊन ते पाकिस्तानमध्ये परतले होते.

काकर राजकारणात पहिल्यापासूनच सक्रिय

त्यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) पक्षापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९९ साली जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या बंडानंतर नवाझ यांचे सरकार कोसळले. त्यानंतर त्यांनी या पक्षाचा त्याग केला. २०१८ साली ते सिनेट म्हणून पहिल्यांदा निवडून आले. ते सुरुवातीपासूनच राजकारणात सक्रिय होते. वरिष्ठ सभागृहात निवडून येण्यापूर्वी त्यांनी बलुचिस्तान प्रांताचे सरकारी प्रवक्ते म्हणून काम पहिलेले आहे. बलुचिस्तान अवामी पार्टी (बीएपी) या पक्षाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अन्वर-उल-हक काकर यांचे पाकिस्तानी लष्कराशी खूप चांगले संबंध आहेत, असे म्हटले जाते.

सिनेटमध्ये काकर यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. ते परदेशी पाकिस्तानी आणि मनुष्यबळ विकास स्थायी समितीचे अध्यक्ष होते. ते व्यवसाय सल्लागार समिती, वित्त आणि महसूल, परराष्ट्र धोरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीचेही सदस्य होते.

काकर यांची हंगामी पंतप्रधानपदी निवड का झाली?

९ ऑगस्ट रोजी पाकिस्तानी संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अन्वर-उल-हक काकर यांची पाकिस्तानचे काळजीवाहून पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. जेव्हा एखाद्या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येतो तेव्हा पाकिस्तानमध्ये संसद बरखास्तीचा निर्णय घेतला जातो. निवडणुकीच्या माध्यमातून नव्या पंतप्रधानपदाची निवड होईपर्यंत राज्यकारभार काळजीवाहू पंतप्रधानांकडे सोपवला जातो. याच प्रक्रियेंतर्गत अन्वर-उल-हक काकर यांच्यावर काळजीवाहू पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

काकर यांच्या निवडीमागे लष्कर?

अन्वर-उल-हक काकर यांना काळजीवाहू पंतप्रधान केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण याआधी ते पाकिस्तानच्या राजकारणात कधीही ठळकपणे अधोरेखीत झालेले नाहीत. अन्वर-उल-हक काकर यांचे नाव बाहेरून सुचवण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही या नावाचा स्वीकार करत आहोत, असे तेथील काही नेत्यांचे मत आहे. या नेत्यांचा रोख पाकिस्तानी लाष्कराकडे आहे.

इम्रान खान यांच्या पक्षाची काय भूमिका?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षानेदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तोशाखाना प्रकरणात दोषी ठरल्यामुळे सध्या इम्रान खान तुरुंगात आहेत. त्यांना आगामी पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. अन्वर-उल-हक काकर हे पाकिस्तानमध्ये पारदर्शक, तटस्थपणे निवडणुका आयोजित करतील, अशी अपेक्षा इम्रान खान यांच्या पक्षाने व्यक्त केली आहे. “निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास पाकिस्तानमध्ये कधीही राजकीय स्थिरता प्रस्थापित होणार नाही. असे झाल्यास आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने हे धोकादायक ठरणार आहे,” अशी प्रतिक्रिया माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद करेशी यांनी दिली.

अन्वर-उल-हक काकर यांच्यापुढे काय आव्हाने असतील?

अन्वर-उल-हक काकर यांच्यावर सध्या पंतप्रधानपदाची जबाबदारी आली असली तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत. यातील सर्वांत पहिले आव्हान हे निवडणुका आयोजित करण्याचे असेल. कारण संसद बरखास्त झाल्यानंत ९० दिवसांच्या आत निवडणुका आयोजित करणे हे बंधनकारक आहे. त्यामुळे अन्वर-उल-हक काकर यांना ९० दिवसांत निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण पाडावी लागणार आहे. २४१ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानसारख्या ॉदेशात निवडणूक घ्यायची म्हटल्यावर कमीत कमी सहा महिन्यांचा वेळ पाहिजे. या काळात मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार आहे. एखाद्या नेत्याला या मतदारसंघाच्या पुनर्रचनेवर आक्षेप असेल तर संबंधित नेता न्यायालयात धाव घेऊ शकतो. त्यामुळे या प्रक्रियेला अधिक विलंब लागू शकतो. असे असताना अवघ्या ३ महिन्यांत निवडणुका घेणे हे काकर यांच्यापुढचे प्रमुख आव्हान असणार आहे.

आर्थिक, राजकीय आघाडीवर कसोटी

यासह, गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक दृष्टीने गटांगळ्या खात आहे. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत पाकिस्तानला आर्थिक आघाडीवर सक्षम करण्याचेही त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय अस्थिरता आहे. याच कारणामुळे राजकीय आघाडीवरही काकर यांना संतुलन साधावे लागणार आहे.