-भक्ती बिसुरे
दिवाळी हा भारताच्या कानाकोपऱ्यात साजरा होणारा सर्वात मोठा सण नुकताच येऊन गेला. दिवाळीच्या काळात वाजवले जाणारे फटाके आणि हवेचे प्रदूषण यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. दिवाळीच्या काळात देशातील अनेक शहरांनी हवेच्या प्रदूषणाची धोक्याची पातळीही ओलांडलेली आपण पाहिली. नवी दिल्ली या भारताची राजधानी असलेल्या शहरातील हवेच्या प्रदूषणाची स्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे तेथील कामकाजावरही निर्बंध लादण्यात आले आहेत, हेही आपण जाणतोच. या पार्श्वभूमीवर कितीही कमी प्रमाणातील असो की कितीही कमी कालावधीसाठी असो, हवेच्या प्रदूषणाशी संपर्क येणे हे मानवी आरोग्यासाठी हिताचे नसल्याचा स्पष्ट इशाराच तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
असा गंभीर इशारा का?
नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (NCAP) तर्फे नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणांनुसार यंदा हिवाळ्याचा पहिला महिना असलेला ऑक्टोबर संपत आला त्यावेळी दिल्ली, चंडीगड, लखनऊ, पाटणा या देशातील प्रमुख शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी २.५ पीएम अधिक एवढी नोंदवण्यात आली. खरे तर मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळीतही हवा स्वच्छ राहिल्याचे दिसून आले, तरी ही वाढ दिसून येणे चिंताजनक आहे. यंदा केवळ कोलकाता या शहरात प्रदूषणाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत घटलेले दिसले. २०१७पासून दिवाळी पूर्वी आणि दिवाळीनंतरचे सात दिवस प्रदूषण पातळीची नोंद केली असता मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाच्या सणाला काहीशी स्वच्छ हवा दिसली असली तरी प्रदूषणाची पातळी मात्र २.५ पीएमने वाढल्याचे चित्र आहे, हे काहीसे विरोधाभासाचे चित्र नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामच्या माहितीतून समोर आले आहे.
प्रदूषणाचे किती प्रमाण सुरक्षित?
हवेचे प्रदूषण कितीही कमी प्रमाणात असले किंवा त्याच्या संपर्कात येण्याचा काळ कितीही अत्यल्प असला तरी ते प्रदूषण मानवी आरोग्यासाठी अजिबात हिताचे नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात जन्माला येणारी नवजात बालके सध्या दररोज २० ते २५ सिगारेट्स ओढल्याच्या प्रमाणात धूर श्वासावाटे शरीरात घेत आहेत, अशी धक्कादायक माहिती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया देतात. त्यामुळेच या प्रदेशातील व्यक्तींनी तेवढेच तातडीचे कारण नसल्यास घराबाहेर पडू नये. विशेषत: लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधींमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्ती अर्थात जोखीम गटाने विशेष काळजी घ्यावी. सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडणे संपूर्ण टाळावे आणि खरोखरीच गरजेचे असल्यास दुपारी त्यातल्या त्यात प्रदूषणाची पातळी कमी असताना घराबाहेर पडावे, असे आवाहन डॉ. गुलेरिया यांनी केले आहे. याच परिसरात गेल्या काही दिवसांत बाह्यरुग्ण विभागात श्वसनाचे विकार आणि प्रदूषणाच्या दुष्परिणामांनी ग्रासलेले रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. केवळ उत्तर भारतातच नव्हे तर देशाच्या विविध भागांमध्ये दिवाळीच्या काळात वाजवल्या गेलेल्या फटाक्यांमुळे श्वास घेण्यास त्रास, दमा, छातीत दुखणे, जळजळ, ब्राँकायटिस असे त्रास मोठ्या प्रमाणात वाढले असून रुग्णांना किमान आठवडाभराचे औषधोपचार घेण्याची गरज भासत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. दिल्ली आणि परिसरात हे प्रमाण अधिक असल्याचे एम्सकडून नमूद करण्यात आले आहे.
परिणाम काय आणि किती गंभीर?
दिल्ली, लखनऊ, पाटणा, चंडीगड या शहरांसह बहुतांश उत्तर भारतात ऑक्टोबर आणि दिवाळीच्या दरम्यान हवेच्या गुणवत्तेने गंभीर स्तर नोंदवला. देशातील सगळ्याच प्रमुख शहरांमध्ये असेच चित्र थोड्याफार फरकाने दिसून आले. हवेची गुणवत्ता खालावल्याने होणारे प्रदूषण हे दीर्घकाळ टिकणारे असते. या प्रदूषणाच्या संपर्कात येणाऱ्या सर्वच वयोगटातील व्यक्तींवर त्याचे परिणाम दिसतात. मात्र, लहान मुलांच्या आरोग्यावर दिसणारे परिणाम त्यांच्या वाढीच्या वयाच्या दृष्टीने अधिक चिंताजनक असतात. हवेच्या प्रदूषणामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीच्या प्रक्रियेत अडथळे येतात. त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यांच्या क्षमताही पूर्णपणे विकसित होण्याच्या दृष्टीने प्रदूषण हा एक चिंतेचा घटक म्हणूनच काम करतो. त्यामुळे कार्यक्षमता, जगण्याची गुणवत्ता यांवर परिणाम होतात तसेच आजारांचा धोका वाढीस लागतो, असा इशारा तज्ज्ञ डॉक्टर देतात.
जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?
प्रदूषके श्वासावाटे शरीरात गेल्याने शरीरातील पेशींमध्ये जळजळ, ऑक्सिडेटिव्ह ताण, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, फुफ्फुस, हृदय, मेंदू या अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो. त्याचे पर्यावसान आजारांमध्ये होते. शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर हवेच्या प्रदूषणाचा परिणाम होऊ शकतो. प्रदूषक घटकांचा आकार अत्यंत सूक्ष्म असल्याने त्यांचा थेट फुप्फुसांशी आणि त्यामार्गे रक्तात प्रवेश होतो. पर्यायाने ती संपूर्ण शरीरात पसरतात आणि विविध रोगांना निमंत्रण देतात. लहान मुलांमध्ये मधुमेह, मेंदू आणि वर्तनाच्या समस्या यांमध्ये वाढ होते, असेही जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.