दत्ता जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विविध जागतिक संघटनांसह आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य संघटनेच्या (अपेक) हवामान केंद्राने यंदा देशात चांगल्या पावसाळयाचा अंदाज व्यक्त केला आहे.

अपेकच्या हवामान केंद्राचा अंदाज काय?

आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (अपेक) संघटनेच्या हवामान केंद्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, जून २०२३ मध्ये प्रशांत महासागरात सक्रिय असलेली एल-निनोची स्थिती आजअखेर सक्रिय आहे. एल-निनोमुळे मागील वर्षांच्या मोसमी पावसावर विपरीत परिणाम झाला होता. मात्र यंदाचा मोसमी पावसाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे जूनमध्ये एल-निनोची सध्याची स्थिती हळूहळू निवळून मोसमी पावसाला पोषक असलेल्या ‘ला-निना’ची स्थिती निर्माण होईल. त्यामुळे भारतासह दक्षिण आशियात पावसाळयात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर, या तीन महिन्यांत भारतात चांगल्या सरी पडण्याचा अंदाजही अपेकने वर्तविला आहे. ला-निनाच्या स्थितीमुळे भारतात सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो, असे आजवरचे निरीक्षण आहे.

हेही वाचा >>> X वरचा Click here ट्रेंड काय आहे? त्यावर टीका कशासाठी?

एल-निनोचा देशावर परिणाम काय झाला?

मागील वर्षी, २०२३च्या जून महिन्यात प्रशांत महासागरात एल-निनोची स्थिती हळूहळू निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. जुलै महिन्यात एल-निनोची तीव्रता वाढली होती. त्याचा परिणाम म्हणून ऑगस्ट आणि त्यानंतर देशातील  मोसमी पावसाच्या पर्जन्यवृष्टीवर मोठा परिणाम झाला होता. यापूर्वी २०१६मध्ये एल-निनो सक्रिय झाला होता. हवामान विभागाच्या इतिहासात सन २०१६ हे आजवरचे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंदविले गेले आहे. सन २०२३ हे वर्षही २०१६ नंतरचे उष्ण वर्ष ठरले. एल-निनोचा परिणाम म्हणून दुष्काळी, अतिवृष्टी, तापमानात वाढ असे परिणाम जगभरात दिसून आले. भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. अतिवृष्टी, कमी पाऊस अशा असमान पर्जन्यवृष्टीचा सामना करावा लागला. ऑगस्ट महिन्यात पावसात मोठा खंड पडल्यामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. 

ला-निनामुळे यंदा दमदार सरी?

प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान वाढते. प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढतो. पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात. वारे आपल्या सोबत बाष्पाने भरलेले ढग तिकडे वाहून नेतात. परिणामी पूर्वेकडील भागात अतिवृष्टी, तर पश्चिमेकडील म्हणजे दक्षिण, आग्नेय आशियात दुष्काळी स्थिती निर्माण होते. एल-निनोला एल-निनो सदर्न ऑसिलेशन (ईएनएसओ) असे म्हणतात. ला-निनाची स्थिती याच्या नेमकी उलट असते. ला-निनाची स्थिती निर्माण झाल्यामुळे भारतासह दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो, असे आजवरचे निरीक्षण आहे.

हेही वाचा >>> हवेतच विमानाचा दरवाजा निखळला; बोइंग मॅक्स कंपनीची विमानं का होतात दुर्घटनाग्रस्त?

मोसमी पाऊस देशासाठी किती महत्त्वाचा?

देशात खरीप लागवडीखालील सरासरी एकूण क्षेत्र ८०० लाख हेक्टर आहे. चांगला पाऊस झाल्यास लागवडीत वाढ होते. सन २०२०मध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे २०२०च्या खरिपात ८८२.१८ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. सन २०१९मध्ये ७७४.३८ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. सरासरी नियोजित वेळेत समाधानकारक मोसमी पाऊस दाखल झाल्यास पेरणी क्षेत्रात वाढ होते. देशातील खरीप हंगाम पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. सन २०१८मध्ये ९१ टक्के पाऊस झाला होता, अन्नधान्य उत्पादन २८५.२ दशलक्ष टन झाले होते. सन २०१९मध्ये ११० टक्के पाऊस झाला होता, २९७.५ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाले होते. सन २०२२मध्ये १०६ टक्के पाऊस झाला, अन्नधान्य उत्पादन ३२३.५ दशलक्ष टन झाले होते. चांगला पाऊस झाल्यास देशाच्या शेती उत्पादनात चांगली वाढ होते.

ला-निनामुळे जगात अन्नसुरक्षा?

र्नैर्ऋत्य मोसमी पाऊस प्रामुख्याने आशिया खंडातील देशांचा पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. आशियाई देशांची लोकसंख्या प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे जगाची एकूण लोकसंख्या आठ अब्जाच्या घरात आहे. त्यात आशिया खंडातील लोकसंख्या ४.७५ अब्ज; म्हणजे जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे ६० टक्के. ला-निनामुळे चांगल्या पावसाची शक्यता असलेल्या ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, म्यानमार, भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि चीन हे देश कृषी उत्पादनातही आघाडीवरील देश आहेत. तांदूळ उत्पादनात चीन, भारत, पाकिस्तान, म्यानमार; गहू उत्पादनात चीन, भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान; तेलबिया- कडधान्य उत्पादनात म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया आघाडीवर आहेत. येथे उत्पादित होणारे अन्नधान्य स्थानिक पातळीवरील मोठया लोकसंख्येची भूक भागवून, जगभरात निर्यात केले जाते. त्यामुळे जगाची अन्नसुरक्षा निश्चित करण्यात ला-निना स्थिती महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे.

dattatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall print exp zws