Apple या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीने आपले भारतामधील पहिलेवहिले स्टोअर मुंबईमध्ये सुरू केले आहे. मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हे स्टोअर सुरू करण्यात आले असून त्याचे आज (१८ एप्रिल) उद्घाटन झाले आहे. विशेष म्हणजे या उद्घाटन कार्यक्रमाला अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कुक यांनी हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर अॅपल स्टोअरचे वैशिष्ट्य काय आहे? यामध्ये काय सुविधा मिळणार? हे जाणून घेऊ या.
दुसऱ्या स्टोअरचे २० एप्रिल रोजी उद्घाटन
याआधी भारतातील नियमांमुळे अॅपल कंपनीला येथे स्वत:चे स्टोअर सुरू करण्यास अडचणी येत होत्या. याच कारणामुळे ‘इमॅजीन’, ‘फ्यूचर वर्ल्ड’ यांसारख्या भागीदारांसोबत अॅपल कंपनीने येथे स्टोअर सुरू केले होते. मात्र आता अॅपलने भारतात स्वत:चे स्टोअर सुरू करण्यास सुरुवात केली आहे. सध्या मुंबईत पहिले स्टोअर सुरू झाले असून दुसऱ्या स्टोअरचे उद्घाटन दिल्लीमध्ये २० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. या स्टोअरच्या माध्यमातून अॅपल कंपनी भारतामध्ये उत्पादन आणि विक्री क्षेत्रामध्येही उतरली आहे. अॅपल भविष्यात देशात १० लाख नोकऱ्या निर्माण करणार आहे. तसा दावा अॅपल कंपनीने केला आहे. मुंबईत सुरू करण्यात आलेले स्टोअर हे खुद्द अॅपल कंपनीच्या मालकीचे आहे. त्यामुळे ग्राहक आता भारतात निर्मिती झालेल्या अॅपलच्या उत्पादनांना थेट खरेदी करू शकणार आहेत.
हेही वाचा >> विश्लेषण: अजितदादांबाबत नव्या समीकरणांची चर्चा का सुरू आहे?
अॅपलचे स्टोअर इतर स्टोअर्सच्या तुलनेत कसे वेगळे आहे?
अॅपलच्या स्टोअरमध्ये फक्त खरेदी आणि विक्री यावरच लक्ष दिले जाणार नाही, तर या स्टोअरच्या माध्यमातून ग्राहकांना अॅपलच्या उत्पादनांची पूर्ण अनुभूती घेता यावी, असा अॅपल कंपनीचा उद्देश आहे. या स्टोअरमध्ये ग्राहक थेट जाऊन हवा तेवढा वेळ तेथे थांबू शकतात. तसेच अॅपलच्या वेगवेगळ्या उत्पादनांसंदर्भात प्रश्न विचारू शकतात. यासह आयफोन तसेच मॅकबुकचा कसा वापर करावा, हेदेखील येथे लोक शिकू शकतात.
अॅपलची सर्व उत्पादने स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार!
अॅपलच्या स्टोअरमध्ये अनेक तज्ज्ञ कर्मचारी असणार आहेत. हे कर्मचारी ग्राहकांना तांत्रिक बाबी समजावून सांगतील. तसेच ग्राहकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतील. याच कारणामुळे अॅपलचे स्टोअर इतर स्टोअर्सपेक्षा वेगळे असेल. अॅपलच्या स्टोअरमध्ये रोज वेगवेगळे सेशन्स घेण्यात येतील. या कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांना अॅपलच्या वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. अॅपलची सर्व उत्पादन या स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील.
हेही वाचा >> करोना महामारीनंतर Plant Pandemic ची जगाला चिंता; बांगलादेशचा गहू उद्ध्वस्त करणाऱ्या रोगाचा भारताला धोका किती?
अॅपलच्या पहिल्या स्टोअरची कधी सुरुवात झाली?
जगात अॅपलचे पहिले स्टोअर मॅकलियन येथील डायस्नस कॉर्नर, वर्जिनिया आणि कॅलिफोर्नियातील ग्लेंडले गॅलेरिया येथे २००१ साली सुरू करण्यात आले. अॅपलचे स्टोअर सुरू करण्याच्या निर्णयामुळे तत्कालीन अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. मात्र त्या वेळी स्टीव्ह जॉब यांनी या निर्णयाचे समर्थन केले होते. “गिगाहर्ट्झ, मेगाबाइट्स हे शब्द फक्त ऐकण्यापेक्षा ग्राहक आता सर्व काही समजून घेऊ शकतात. तसेच अॅपलच्या उत्पादनांची अनुभूती घेऊ शकतात,” असे स्टीव्ह जॉब म्हणाले होते.
त्यानंतर आता साधारण दोन दशकांनंतर संपूर्ण देशात अॅपलचे एकूण ५०० स्टोअर्स आहेत. यातील काही स्टोअर्सना चांगलेच महत्त्व प्राप्त झालेले असून ते जगभरात प्रसिद्ध आहेत.
हेही वाचा >>विश्लेषण: आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण कशामुळे झाली?
अॅपल स्टोअरच्या उद्घाटनासाठी थेट सीईओंची उपस्थिती, नेमके कारण काय?
भारत ही मोठी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी बाजारपेठ आहे. त्यामुळे अॅपल कंपनीला येथे आपला विस्तार करायचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत अॅपल स्टोअर सुरू करण्याच्या निर्णयाकडे पाहता येईल. या स्टोअरच्या उद्घाटनासाठी थेट अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक उपस्थित राहिले. याच कारणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. याआधी टीम कुक भारतात २०१६ साली आले होते. आपल्या ताज्या भारतभेटीत टीम कुक यांनी देशातील अनेक बड्या उद्योगपतींची भेट घेतली आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेकरन या दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे.
टीम कुक नरेंद्र मोदींची घेणार भेट!
आपल्या भारतभेटीत टीम कुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यासह ते आयटी आणि इलेक्ट्रॉनिक विभागाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीत ते अॅपल कंपनीचा भारतात करावयाचा विस्तार, अॅपल कंपनीच्या उत्पादनांची विक्री आणि निर्यात या विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे टीम कुक भारतात आले असावेत, असे म्हटले जात आहे.