अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळवणे हे प्रत्येकासाठी एका स्वप्नासारखे आहे. मात्र, आता ट्रम्प सरकारच्या काळात ग्रीन कार्डच्या चर्चेने जोर धरला आहे. कारण- अमेरिकेन ग्रीन कार्ड मिळण्याची शक्यता आता आणखी कमी होऊ शकते. याच घडामोडींमध्ये भारतीय वंशाचे सीईओ यांनी ग्रीन कार्ड मिळेल का, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला. त्यावर चक्क अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी ‘होय’, असे उत्तर दिले. प्रश्न विचारणारे एआय सर्च इंजिन ‘Perplexity AI’चे सीईओ अरविंद श्रीनिवास आहेत. या प्रश्नोत्तरांनंतर सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरत आहे. कोण आहेत अरविंद श्रीनिवास? सोशल मीडियावर चर्चेत असणारे हे प्रकरण काय? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय घडलं?

अरविंद श्रीनिवास यांनी ‘एक्स’वर विचारले की, त्यांना ग्रीन कार्ड मिळेल का? त्यांच्या आधीच्या एका पोस्टमध्ये श्रीनिवास यांनी सांगितले की, ते तीन वर्षांपासून ग्रीन कार्ड मिळण्याची वाट पाहत आहेत. अब्जाधीश उद्योजक व ‘एक्स’चे मालक एलॉन मस्क यांनी त्यांच्या प्रश्नावर ‘होय’, असे उत्तर दिले. ग्रीन कार्ड औपचारिकपणे स्थायी निवासी कार्ड म्हणून ओळखले जाते. हे कार्ड ज्यांना दिले जाते, त्यांना अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याची आणि काम करण्याची परवानगी मिळते. एलॉन मस्क यांच्या उत्तरानंतर सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरत आहे. मस्क यांच्या उत्तरावर श्रीनिवास यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा : “नेहरूंनी एडविना माऊंटबॅटन यांना लिहिलेली पत्रं परत करावीत”, अशी भाजपाची गांधी कुटुंबाकडे मागणी; पत्रात नक्की काय दडलंय?

कोण आहेत अरविंद श्रीनिवास?

श्रीनिवास हे ‘Perplexity AI’चे सह-संस्थापक व सीईओ आहेत. हे जेफ बेझोससह प्रख्यात गुंतवणूकदारांचे समर्थन असलेले एआय सक्षम सर्च इंजिन आहे. श्रीनिवास यांनी २०२२ मध्ये अँडी कोनविन्स्की, डेनिस याराट्स व जॉनी हो यांच्याबरोबर मिळून ‘पर्प्लेक्सिटी’ची स्थापना केली होती. आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी असलेल्या श्रीनिवास यांनी बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ‘ओपन एआय’मध्ये रिसर्च इंटर्न म्हणून केली. त्यानंतर त्यांनी गूगल आणि डिप माइंड यांसारख्या मोठ्या टेक कंपन्यांमध्ये अशाच स्वरूपाच्या भूमिका पार पाडल्या. Perplexity AI सह-संस्थापक होण्यापूर्वी श्रीनिवास यांनी ओपन एआयसाठी एक संशोधन शास्त्रज्ञ म्हणूनही काम केले.

सोशल मिडियावरील मस्क यांचा संवाद

उल्लेखनीय बाब म्हणजे मस्क आणि श्रीनिवास यांनी ‘एक्स’वर संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ग्रीन कार्डसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा केल्याबद्दल श्रीनिवास यांच्या पोस्टला प्रतिसाद दिला होता. श्रीनिवास यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते, “मी तीन वर्षांपासून माझ्या ग्रीन कार्डची वाट पाहत आहे; पण अजूनही ते मिळालेले नाही.” त्यावर मस्क यांनी, “आमच्याकडे एक अप-डाउन प्रणाली आहे, जी उच्च कुशल व्यक्तींना कायदेशीररीत्या अमेरिकेमध्ये प्रवेश करणे कठीण करीत आहे आणि गुन्हेगारांसाठी सोपे करीत आहे. नोबेल पारितोषिक विजेत्याला कायदेशीर प्रवेश करणे सोईस्कर असण्यापेक्षा एखाद्या गुन्हेगाराला बेकायदा सीमा ओलांडणे सोपे का आहे? डोनाल्ड ट्रम्प आणि डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (डीओजीई) ही बाब सुधारतील,” असे उत्तर दिले.

‘bodo.ai’चे मुख्य उत्पादन अधिकारी रोहित कृष्णन यांनी सुरू केलेल्या यूएस इमिग्रेशन प्रक्रियेच्या गुंतागुंतीबद्दलच्या एका व्यापक ऑनलाइन संभाषणादरम्यान श्रीनिवास यांची पोस्ट आली होती. कृष्णन यांनी लिहिले होते, “मला स्थलांतरितांच्या संवादाबद्दल एक गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे या देशात स्थलांतरित होणे किती कठीण आहे हे फार कमी लोकांना कळते. मी आता तीन वेळा स्थलांतरित झालो आहे आणि अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्य कठीण होत आहे.” गेल्या महिन्यात श्रीनिवास यांनी इमिग्रेशन प्रक्रियेत सुधारणा करण्यावर आपले विचार मांडले होते. त्यांनी एक सुव्यवस्थित आणि तंत्रज्ञान-सक्षम प्रणाली सुचवली. “एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी कायदेशीर इमिग्रेशन अधिक चांगले करण्यासाठी उत्सुक आहेत. आपण सर्वांनी देशात गुंतवणूक करत असताना अमेरिकेत इमिग्रेशनचा विचार करा,” असे ते म्हणाले होते. “तुम्ही मोबाईल ॲपवरून कागदपत्रे अपलोड करणे, ॲपल पे, एका आठवड्यात शेड्युल केलेली मुलाखत आणि एका महिन्यात निकाल तुमच्यापर्यंत पोहोचणे, इतके सोपे असावे,” असेही त्यांनी सांगितले.

ग्रीन कार्ड म्हणजे काय?

ग्रीन कार्ड अधिकृतपणे स्थायी निवासी कार्ड म्हणून ओळखले जाते. त्यामुळे परदेशी नागरिकांना युनायटेड स्टेट्समध्ये कायमस्वरूपी राहण्याची आणि काम करण्याची परवानगी मिळते. यूएस सिटिझनशिप अॅण्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS)द्वारे जारी केले जाणारे हे कार्ड कायदेशीर कायमस्वरूपी निवासस्थानाचे प्रतिनिधित्व करते आणि कार्डधारकांना देशातील विविध अधिकार आणि विशेषाधिकार प्रदान करते.

हेही वाचा : २०२५ मध्ये ‘या’ देशांतील प्रवासाचे नियम बदलणार; याचा भारतीयांवर काय परिणाम होणार?

ग्रीन कार्डचे फायदे काय?

ग्रीन कार्ड धारण करण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे अमेरिकेत कायमस्वरूपी निवासाचा अधिकार. ग्रीन कार्डधारक कोणत्याही क्षेत्रात किंवा व्यवसायात निर्बंधांशिवाय काम करण्यास मोकळे असतात. कार्यात्मक व्हिसा हा त्या व्यक्तींना विशिष्ट नियोक्ते किंवा उद्योगांशी जोडतो; मात्र ग्रीन कार्डधारकांना अशी कोणतीही अट नसते. ग्रीन कार्डधारक मेडिकेअर, सोशल सिक्युरिटी आणि इतर सरकारी प्रायोजित कार्यक्रमांसारख्या सामाजिक लाभांसाठीदेखील पात्र असतात. पुढे ते अमेरिकेमध्ये आणि बाहेर जाण्यासाठी अतिरिक्त व्हिसा किंवा अधिकृततेशिवाय प्रवास करू शकतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aravind srinivas indian origin ceo backed by elon musk for a green card rac