ASI underwater archaeology Dwarka: भारतीय पुरातत्त्व विभागाने द्वारका येथे केलेल्या पुरातत्त्वीय उत्खननाला जवळपास दोन दशके उलटली आहेत. आता पुन्हा एकदा या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या स्थळाचा शोध घेण्याचा प्रयत्न भारतीय पुरातत्त्व खातं करणार आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या (ASI) अंडरवॉटर आर्किऑलॉजी विंगच्या (UAW) चमूने गुजरातच्या किनाऱ्याजवळ समुद्रात परत एकदा उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा उद्देश ४००० वर्षे जुन्या सुनियोजित शहराच्या रहस्यांचा शोध घेणे हा आहे. ही मोहीम पाण्याखालील भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभ्यास आणि संरक्षण करण्याच्या ASI च्या मिशनचा एक भाग आहे. पाण्याखाली दडलेले प्राचीन द्वारका शहर हे नेहमीच कुतूहल आणि रहस्याचा विषय ठरलेले आहे.
हिंदू पुराणानुसार द्वारका ही कृष्णाची कर्मभूमी मानली जाते. ओखा किनाऱ्यालगतच्या बेट द्वारका आणि द्वारका येथे उत्खननाच्या मोहिमेला जवळपास दोन दशकं झाली आहेत. यापूर्वी शेवटचे उत्खनन २००५ ते २००७ दरम्यान करण्यात आले होते. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अंडरवॉटर आर्किऑलॉजी विंगच्या नेतृत्त्वाखालील ही पाण्याखालची ऐतिहासिक शोधमोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सुमारे ४००० वर्षे प्राचीन असलेल्या या पाण्याखालील शहराचे अवशेष शोधून त्याचे रहस्य उलगडण्याच्या उद्देशाने ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
बुडलेल्या श्रीकृष्ण नगरीचा पुनर्शोध
भारतीय पुरातत्त्व खात्याच्या (ASI) पाच सदस्यीय चमूने अतिरिक्त महासंचालक (पुरातत्व) प्रा. आलोक त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली द्वारका किनाऱ्यालगत पाण्याखाली उत्खनन सुरू केले आहे, अशी माहिती सांस्कृतिक मंत्रालयाने अलीकडेच प्रसिद्ध केली. प्रा. त्रिपाठी यांच्या नेतृत्त्वाखालील या चमूमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर महिला पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. यात अपराजिता शर्मा, पूनम विंद आणि राजकुमारी बार्बिना या महिला पुरातत्त्व अभ्यासकांचा समावेश आहे. सुरुवातीच्या संशोधनासाठी या चमूने गोमती क्रीकजवळील भाग निवडला आहे.
द्वारका आणि बेट द्वारका येथे बंदराच्या सखोल सर्वेक्षण आणि संशोधनासाठी ASI च्या अंडरवॉटर आर्किऑलॉजी विंगने (UAW) हे संशोधन पुन्हा सुरू केले आहे. १९८० च्या दशकापासून UAW ही भारतातील सागरी पुरातत्त्व संशोधनाचा प्रमुख भाग राहिली आहे. UAW च्या स्थापनेपासून या विभागाने भारतभर अनेक पुरातत्त्वीय आणि पर्यावरणीय स्थळांवर संशोधन आणि शोधमोहीम राबवली आहे. यात लक्षद्वीपमधील बंगाराम बेट, तामिळनाडूमधील महाबलीपुरम, गुजरातमधील द्वारका, मणिपूरमधील लोकतक तलाव आणि महाराष्ट्रातील मुंबईजवळील एलिफंटा बेट यांचा समावेश आहे. द्वारकेच्या किनाऱ्याजवळ आणि भूभागावर ASI च्या UAW तर्फे करण्यात आलेले शेवटचे उत्खनन २००५ ते २००७ दरम्यान झाले होते.
द्वारकेची पुराणकथा
मथुरेतून गुजरातमध्ये स्थलांतर केल्यानंतर हिंदू धर्मातील सप्तपुरींपैकी एक असलेली द्वारका भगवान श्रीकृष्णाने समुद्रातून पुनर्प्राप्त केल्याचे मानले जाते. पुराणकथांनुसार श्रीकृष्णाच्या प्रस्थानानंतर ही नगरी अरबी समुद्रात लुप्त झाली आणि त्या घटनेने कलियुगाचा प्रारंभ झाला. द्वारकेच्या धार्मिक महत्त्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ साली फेब्रुवारी महिन्यात द्वारकाधीश मंदिराला दिलेल्या भेटीत प्रकाश टाकला. त्यांनी स्कूबा गियर घालून समुद्रात उतरलेल्या स्वतःच्या प्रतिमा शेअर केल्या होत्या.

पंतप्रधान मोदी यांनी पाण्याखालील भगवान कृष्णाच्या हरवलेल्या नगरीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली होती. “मी समुद्रात जाऊन प्राचीन द्वारका नगरीचे दर्शन घेतले. पुरातत्त्वतज्ज्ञांनी पाण्याखाली लपलेल्या द्वारका नगरीबद्दल खूप काही लिहिले आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्येही द्वारकेचे वर्णन आहे. तिथे भव्य प्रवेशद्वार आणि उंच इमारती होत्या. स्वतः भगवान श्रीकृष्णाने या नगरीची निर्मिती केली होती,” असे पंतप्रधान मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी द्वारका दर्शनानंतर आयोजित केलेल्या सभेत सांगितले.
पुरातत्त्वीय पुरावे पुराकथा आणि वास्तव यांना जोडणारे
काही तज्ज्ञ असे मानतात की, पाण्याखाली सापडलेले अवशेष नैसर्गिक रचनाही असू शकतात किंवा सापडलेल्या पुराव्यांचे कालमान महाभारताच्या कालखंडाशी निश्चितपणे जुळतेच असे म्हणता येणार नाही. तरीही, द्वारकेच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी अजूनही अनेक गोष्टींचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे आणि ज्ञानाच्या या महासागराचा अभ्यास करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. द्वारकेच्या पाण्याखालील रहस्यांचा शोध १९३० च्या दशकात हिरानंद शास्त्री यांच्या प्रयत्नांपासून सुरू झाला. त्यानंतर १९६३ साली जे. एम. नानावटी आणि एच. डी. संकालिया यांच्या नेतृत्वाखाली पहिले मोठे उत्खनन करण्यात आले.

त्यानंतर सागरी पुरातत्त्वज्ञांनी अधिक उत्खनने केली आणि प्राचीन अवशेष तसेच पाण्याखाली लपलेल्या द्वारकेच्या वास्तू उलगडल्या. १९८३ ते १९९० या काळात पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी अनेक महत्त्वाचे शोध लावले. युनेस्कोने दिलेल्या माहितीनुसार त्यात किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष, दगडी बांधकाम, खांब, दगडी नांगर आणि जलसिंचन प्रणालीचा समावेश होता. असे मानले जाते की, या मजबूत पायावरच प्राचीन द्वारकेच्या तटबंदीची भिंत उभारली गेली असावी. संस्कृतमध्ये ‘द्वारका’ म्हणजे ‘द्वार’ किंवा प्रवेशद्वार. प्राचीन काळी द्वारका ही भारताचे पश्चिम आशियाशी व्यापारी संबंध राखणारी एक महत्त्वाची व्यापारी नगरी होती.
१९६९-७० मधील किनारपट्टीवर (द्वारका येथे) झालेल्या उत्खननात वेगवेगळ्या कालखंडातील मातीच्या भांड्यांचे अवशेष उघडकीस आले. यात हडप्पा संस्कृतीपासून मध्ययुगीन कालखंडापर्यंतच्या मृदभांड्यांच्या तुकड्याचा समावेश होता. गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीने (NIO) केलेल्या किनारपट्टीवरील आणि समुद्राच्या खोल पाण्यातील शोध मोहिमेतही अशाच प्रकारचे अवशेष समोर आले असे NIO च्या २००३ च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. “गेल्या दोन दशकांतील सागरी पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये बेट द्वारकेच्या किनारपट्टीवर अनेक प्राचीन वस्तींचे अवशेष सापडले. या स्थळांवरून मोठ्या प्रमाणावर प्रोटो-ऐतिहासिक आणि ऐतिहासिक काळातील मृद भांड्यांचे अवशेष गोळा करण्यात आले,” असे सागरी पुरातत्त्वतज्ज्ञ ए. एस. गौड यांनी NIO च्या शोधनिबंधात स्पष्ट केले आहे.

१९८० च्या दशकात गोमतीच्या काठावर शोध लागलेल्या तटबंदीच्या भिंतीच्या अवशेषांनी या भागात सुनियोजित शहर अस्तित्त्वात होते या गोष्टीला दुजोरा दिला. अलीकडील खोल समुद्रातील संशोधनात मध्ययुगीन कालखंडातील अनेक दगडी नांगर, शिशाचे नांगर, तसेच प्राचीन ऐतिहासिक कालखंडातील अँफोराचे अवशेष आढळले आहेत. १९९८ मध्ये ‘मॅन अँड एन्व्हायर्नमेंट’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ‘आर्किऑलॉजी ऑफ बेट द्वारका’ या शोधनिबंधानुसार हे निष्कर्ष महत्त्वाचे मानले गेले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञ एस. आर. राव यांच्या मते पाण्याखाली गाडल्या गेलेल्या द्वारका स्थळावरील पुरातत्त्वीय पुरावे दर्शवतात की, इसवी सनपूर्व १५०० वर्षांपूर्वी हे एक महत्त्वाचे शहर होते. बेट द्वारका आणि पाण्याखाली सापडलेले पुरावे हे ताम्रपाषाणयुगापासून ते आधुनिक कालखंडापर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडाची साक्ष देतात, असे सागरी पुरातत्त्वतज्ज्ञ ए. एस. गौड आणि एस. त्रिपाठी यांनी २००० मध्ये प्रकाशित झालेल्या द्वारका ‘Recent underwater explorations at Dwarka and surroundings of Okha Mandal’ या शोध निबंधात नमूद केले आहे.
सागरी पुरातत्त्वतज्ज्ञांनी द्वारका या स्थळाच्या व्यापारी केंद्र म्हणून असलेल्या महत्त्वावरही प्रकाश टाकला. द्वारकाचे उल्लेख पुराणे आणि महाभारतातील द्वारकेशी संबंधित आहेत का, याबाबत विचारले असता, एस. आर. राव यांनी असे मत व्यक्त केले की, या उत्खननांमध्ये सापडलेली प्राचीन अवशेष आणि वास्तू आपल्या महाकाव्यांमध्ये वर्णन केलेल्या गोष्टींशी जोडल्या जाऊ शकतात. “या शोधामुळे पुराणकथेला वास्तविकतेचे रूप मिळाले आहे,” असे एस. आर. राव यांनी नमूद केले.
म्हणूनच, द्वारकेतील पाण्याखालील पुरातत्त्व संशोधनाचा मुख्य उद्देश पुराणकथा आणि इतिहास यांच्यातील अंतर भरून काढणे हा आहे. नवीन पुरातत्त्वीय पुरावे मिळत असताना भारतीय पुरातत्व विभाग (ASI) प्राचीन भारतीय इतिहासाविषयी नवीन दृष्टिकोन समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. जसे-जसे पुरातत्वशास्त्रज्ञ अरबी समुद्राच्या गर्भात अधिक खोलवर जात आहेत, तसतसे प्रत्येक नवीन अवशेष आपल्याला कृष्णाच्या या पौराणिक नगरीच्या वास्तविक वारशाच्या अधिक जवळ आणत आहे.