घटस्फोट हा बऱ्याचदा गंभीरपणे वैयक्तिक निर्णय म्हणून पाहिला जातो; परंतु याचा परिणाम केवळ जोडप्यावरच नाही, तर दोन कुटुंबे आणि त्यांच्या मुलांवरही होतो. पती-पत्नी जेव्हा एकत्र राहण्यास इच्छुक नसतात, तेव्हा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला जातो. याचा मोठा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. अलीकडील संशोधनाने पालकांचा घटस्फोट आणि नंतरच्या आयुष्यात त्यांच्या मुलांमध्ये स्ट्रोकचा (पक्षाघाताचा झटका) वाढलेला धोका यांच्यातील संबंध उघड केला आहे. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ज्या मुलांना पालकांच्या घटस्फोटाचा अनुभव येतो, त्यांना स्ट्रोकचा धोका वाढतो. संशोधनातून नेमके काय परिणाम समोर आले आहेत? आई-वडिलांचा घटस्फोट मुलांसाठी खरंच जीवघेणा ठरतोय का? त्याविषयी जाणून घेऊ.
घटस्फोटाचा आणि स्ट्रोकचा संबंध
टोरोंटो युनिव्हर्सिटी, टिंडेल युनिव्हर्सिटी आणि अर्लिंग्टन येथील टेक्सास युनिव्हर्सिटी येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, घटस्फोटित पालक असलेल्या नऊपैकी एकाला स्ट्रोक झाल्याचे निदान झाले आहे. याउलट १५ पैकी फक्त एक प्रौढ व्यक्ती ज्यांचे पालक एकत्र राहतात, अशाच जीवघेण्या अवस्थेने ग्रस्त होते. स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येतो किंवा जेव्हा रक्तवाहिनी फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होतो.
हेही वाचा : ‘FIIT-JEE’ची शिकवणी केंद्रे अचानक बंद; हजारो विद्यार्थ्यांवर परिणाम अन् पालकांचे लाखोंचे नुकसान, प्रकरण काय?
‘द न्यूयॉर्क पोस्ट’च्या मते, हे अमेरिकेमधील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक राहिले आहे. अमेरिकेत २०२३ मध्ये १,६२,६०० मृत्यू झाले आहेत. ‘PLOS One’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात १९६० पूर्वी जन्मलेल्या १३,२०५ अमेरिकन लोकांच्या सर्वेक्षण डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. या गटात वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. त्यात ६५ आणि त्याहून अधिक वयाच्या ५७ टक्के महिला, ७९ टक्के कृष्णवर्णीय, नऊ टक्के गौरवर्णीय आणि १२ टक्के हिस्पॅनिक किंवा इतर वांशिक पार्श्वभूमीतील नागरिकांचा समावेश आहे.
या सहभागींपैकी ७.३ टक्के लोकांना पक्षाघाताचा झटका आला होता आणि १४ टक्के लोकांना बालपणात पालकांच्या घटस्फोटाचा अनुभव आला होता. अचूकता सुनिश्चित करण्यासाठी संशोधकांनी बालपणात लैंगिक किंवा शारीरिक शोषण अनुभवलेल्या सहभागींना वगळले. “आम्हाला असे आढळून आले की, जेव्हा लोकांनी बालपणी शारीरिक किंवा लैंगिक शोषणाचा अनुभव घेतला नसेल आणि त्यांच्या बालपणात घरात त्यांना सुरक्षित वाटले असेल; मात्र त्यांच्या पालकांनी घटस्फोट घेतला असेल, तर त्यांना पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता असते,” असे सामाजिक कार्याचे प्राध्यापक व टोरंटो विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर लाइफ कोर्स आणि एजिंगचे संचालक, लेखक एस्मे फुलर-थॉमसन यांनी स्पष्ट केले.
स्ट्रोकचा धोका वाढण्यामागील कारणे काय?
बालपणातील दीर्घकाळ ताण, अनेकदा पालकांच्या विभक्त होण्याचा झालेला भावनिक परिणाम, नंतरच्या आयुष्यात स्ट्रोकचा धोका वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, असे मानले जाते. संशोधकांनी असे सूचित केले आहे की, दीर्घकाळ तणावात राहिल्यामुळे हायपोथालेमिक-पिट्युटरी-एड्रेनल (एचपीए)मध्ये व्यत्यय येऊ शकतो, ही एक गंभीर प्रणाली आहे, जी तणावासाठी शरीराची प्रतिक्रिया नियंत्रित करते. जेव्हा एचपीए अनियमित होतो, तेव्हा स्ट्रोकसारख्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
या वाढीव जोखमीमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी हा अभ्यास तयार केलेला नसला तरी, संशोधकांचा असा सिद्धांत आहे की, जैविक आणि सामाजिक घटकांचे संयोजन यात महत्त्वाची भूमिका बजावते. “बालपणात तुमचे पालक विभक्त झाल्याने तणाव संप्रेरकांची उच्च पातळी होऊ शकते. लहानपणी याचा अनुभव घेतल्याने विकसित होणाऱ्या मेंदूवर आणि तणावाला प्रतिसाद देण्याच्या मुलाच्या क्षमतेवर कायमचा प्रभाव पडतो,” असे डॉ. फुलर-थॉमसन यांनी स्पष्ट केले.
सामाजिक गतिशीलतादेखील वाढलेल्या जोखमीमध्ये योगदान देऊ शकते. जुन्या पिढ्यांसाठी घटस्फोट खूपच कमी सामान्य होता; ज्यामुळे लोकांचे आयुष्य बदलायचे. परिणामी घटस्फोटापूर्वी पालकांमधील संघर्षाची पातळी अधिक तीव्र असायची; ज्यामुळे मुलांसाठी हा अनुभव विशेषतः क्लेशकारक होता, असे संशोधकांनी लिहिले. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, हा अभ्यास केवळ पालकांचा घटस्फोट आणि स्ट्रोक जोखीम यांच्यातील परस्परसंबंध स्थापित करतो; परंतु थेट कारण स्पष्ट करत नाही. “हे सिद्ध होत नाही की, घटस्फोटामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. फक्त दोन गोष्टी याच्याशी संबंधित आहेत,” असे फुलर-थॉमसन यांनी स्पष्ट केले.
भारतात वाढलेय घटस्फोटांचे प्रमाण
पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोटांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असले तरी सामाजिक दृष्टिकोन विकसित होत असताना यात हळूहळू वाढ होत आहे. पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS)मधील डेटावर आधारित मनीकंट्रोलच्या विश्लेषणात गेल्या सात वर्षांमध्ये देशभरात घटस्फोटाच्या दरात सातत्याने वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ग्रामीण भागातील घटस्फोटित किंवा विभक्त स्त्रियांचे प्रमाण वाढत चालले आहे. यातून पारंपरिकपणे पुराणमतवादी विचारधारणा बदलत असल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचा : ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे भारतीय महिला वेळेपूर्वीच करताहेत सिझेरियन प्रसूती; नेमकं प्रकरण काय?
देशाच्या शहरी भागात पुरुषांमधील घटस्फोटाचे प्रमाण तीव्र वाढले आहे. २०१७-१८ मध्ये ०.३ टक्क्यांवरून हे प्रमाण २०२३-२४ मध्ये ०.५ टक्क्यापर्यंत वाढले आहे. ‘PLFS’द्वारे सर्वेक्षण केलेल्या शहरी महिलांमध्ये ०.७ टक्का इतके घटस्फोटाचे प्रमाण दिसून आले आहे, जे सात वर्षांपूर्वी ०.६ टक्का इतके होते. हा वरचा कल असूनही, भारतातील घटस्फोटांचे प्रमाण जागतिक स्तरावर सर्वांत कमी आहे. त्या तुलनेत बॉलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटीनुसार, अमेरिकेमध्ये २०२२ मध्ये १,००० विवाहित महिलांमागे १४.५६ टक्के घटस्फोटाचे प्रमाण नोंदवले गेले.