एल निनो आणि ला निना पॅटर्नबाबत जगभरच्याच वैज्ञानिकांचे, हवामान तज्ज्ञांचे अंदाज चुकत आहेत. भारतातील मान्सूनवर परिणाम करणारी एल निनो, ला निना स्थिती काय आहे, हवामान तज्ज्ञांचे अंदाज चुकले तर परिणाम काय होतात, हे जाणून घेऊ…

एल निनो आणि ला निना काय आहेत?

भारतापासून हजारो कि. मी. दूर प्रशांत महासागरात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे भारतातील मान्सून प्रभावित होतो. प्रशांत महासागर पृथ्वीवरील सर्वात मोठा समुद्र आहे. या महासागराच्या पश्चिमेला ऑस्ट्रेलिया आहे तर पूर्वेला दक्षिण अमेरिका आहे. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे विषुववृत्तीय रेषेवरील हे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. यांना व्यापारी वारे म्हणतात. हे वारे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील उबदार पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे दक्षिण अमेरिकेकडून ऑस्ट्रेलियाकडे वाहून नेतात. ऑस्ट्रेलियावर या गरम पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढगात रूपांतर होऊन कमी दाबाचा पट्टा तयार होतो. परिणामी ऑस्ट्रेलियात (विशेषतः पूर्व ऑस्ट्रेलियात) पाऊस पडतो. ज्या वाऱ्यांचे बाष्पीभवन होत नाही ते थंड वारे पुन्हा दोन ठिकाणी खाली उतरतात. एका बाजूला ते थंड वारे दक्षिण अमेरिकेकडे येतात, तर दुसरीकडे मादागास्करपर्यंत येतात. थंड वारे खाली उतरल्यामुळे तेथे पाऊस होत नाही. प्रशांत महासागरातील व्यापारी वाऱ्यांच्या या संपूर्ण चक्राला वॉकर चक्र असे म्हणतात. ही सामान्य स्थिती आहे. या स्थितीला म्हणजे व्यापारी वाऱ्यांच्या स्थितीला ENSO (एल निनो साऊथ ऑसिलिएशन) म्हणजे एल निनो-दक्षिणी दोलन असे म्हणतात.

हे थंड वारे खूप चांगल्या प्रकारे तयार झाले, मादागास्करपर्यंत ते उतरून खूप चांगले जास्त दाबाचे क्षेत्र तयार झाले तर भारताकडे थंड वारे येतात. मान्सून चांगला होतो. या स्थितीला ला निना स्थिती म्हणतात. याउलट हे व्यापारी वारे खूप तीव्रतेने तयार झाले नाहीत तर ते प्रशांत महासागराच्या पूर्व किंवा मध्यावरच समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान उबदार करतात आणि तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार करतात. परिणामी मध्य अमेरिकेत चांगला पाऊस पडतो आणि बाष्पीभवन न झालेले थंड वारे ऑस्ट्रेलिया आणि आसपासच्या बेटांवर खाली उतरतात आणि एल निनो स्थिती तयार होते. तेथे पाऊस होत नाही. शिवाय मादागास्करपर्यंत कोणतेही थंड वारे येत नाहीत. परिणामी भारतीय मान्सून तयार होण्याची स्थिती कमकुवत होते. या स्थितीला एल निनो स्थिती म्हणतात.

एल निनो-दक्षिणी दोलन जगासाठी का महत्त्वाचे?

जागतिक तापमानवाढीमुळे जगभर हवामानात तीव्र बदल होत आहेत. एल निनो आणि ला निनाच्या उष्ण आणि थंड प्रवाहांमुळे दुष्काळ पडू शकतो किंवा आशिया-प्रशांतपासून अमेरिकेपर्यंत पाऊस पडू शकतो आणि जागतिक अर्थव्यवस्थेला ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत या दक्षिणी दोलनाच्या स्थितीचा अचूक अभ्यास सरकारे, बाजारपेठा आणि शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पीक पद्धतींचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

एल निनोचा भारतावर काय प्रभाव?

ला निना स्थितीत मादागास्करकडे उतरलेले थंड वारे अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून भारतात मान्सून आणतात. त्यामुळे ला निना स्थिती भारतासाठी पोषक आहे. याउलट एल निनोमुळे भारतातील मान्सूनवर परिणाम होतो.

२०२३ मध्ये एल निनो प्रभावामुळे भारतात पावसाचे प्रमाण कमी राहिले तर २०२३ आणि २०२४ चा उन्हाळा सर्वाधिक उष्ण राहिला. आफ्रिकेतही भीषण दुष्काळ पडला. त्याआधीचे वर्ष २०२२ हेही उष्ण होते.

हवामान तज्ज्ञांचे अंदाज का चुकत आहेत?

ज्या दोन घटनांमुळे हवामानावर विशेषत्वाने परिणाम होतो, त्या एल निनो आणि ला निनाचा प्रभाव जागतिक बाजारपेठांसाठीही महत्त्वाचा असतो. त्यामुळे हवामान तज्ज्ञांकडून या पॅटर्नची योग्य माहिती मिळण्याची गरज असते. मागील वर्षी ऑस्ट्रेलियातील हवामान तज्ज्ञांना अंदाज चुकल्यामुळे टिकेला सामोरे जावे लागले. एल निनो आणि ला निना पॅटर्नबाबत जगभरच्याच वैज्ञानिकांचे, हवामान तज्ज्ञांचे अंदाज चुकत आहेत. काही महिन्यांपूर्वी ला निना पॅटर्न येईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. ला निनाच्या प्रभावाने आपल्या देशात कडाक्याची थंडी पडण्याचे संकेत होते. पण तसे झाले नाही. आफ्रिकेत भीषण दुष्काळ पडला आहे. त्या दुष्काळातून आफ्रिका ला निनामुळे बाहेर पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण एल निनोनंतर ला निना स्थिती सक्रिय झाली नाही. सुरुवातीला काही दिवस थंडी पडली. पण नंतर ती ओसरली. हवामान तज्ज्ञांचे अंदाज सपशेल चुकले.

सन २०२४मध्ये गल्लत

२०२४ च्या सुरुवातीला केलेल्या अंदाजानुसार २०२४ च्या उत्तरार्धात ला निना मजबूत स्थितत असेल असे वाटत होते. हवामान अभ्यासकांनी पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरात पाण्याच्या पृष्ठभागावरील तापमान थंड असल्याचे निरीक्षण नोंदवत ला निनाचा अंदाज वर्तवला. हे ला निनाचे अपेक्षित प्रारंभिक लक्षण आहे. पण अचानक हे वारे पश्चिमेकडे सरकू लागले आणि स्थिती बदलली.

एल निनो आणि ला निना स्थिती एका वर्षाच्या डिसेंबर ते जानेवारी आणि पुढील वर्षी फेब्रुवारी या काळात शिखरावर असते, त्यामुळे या हिवाळी अवस्थेचे संक्रमण पुढील उन्हाळ्यात दक्षिण गोलार्धातील हवामान परिवर्तनशीलतेद्वारे निश्चित केले जाते, ज्यामध्ये एल निनोची उबदार अवस्था आणि ला निनाची थंड अवस्था समाविष्ट आहे. एल निनो स्थितीत प्रशांत महासागराच्या पूर्व किंवा मध्यावर समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान उबदार झाले तर त्याला एल निनो फ्लेवर्स म्हणतात. कदाचित हा २०२३ च्या विक्रमी उष्ण तापमानाच्या प्रभावाचा एक भाग असेल ज्याचा परिणाम २०२४ आणि नंतर २०२५ पर्यंत सुरू आहे, असेही म्हटले जात आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे काय?

एल निनो आणि ला निना स्थितीमुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात ओले किंवा कोरडे दुष्काळ किंवा उष्ण किंवा थंड परिस्थिती असण्याची शक्यता वर्तवली जाते, परंतु ही स्थिती उलट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मेलबर्न विद्यापीठातील हवामान विज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक अँड्र्यू किंग म्हणाले. पश्चिम ऑस्ट्रेलियातील उद्योग समूह ग्रेनग्रोअर्स लिमिटेडचे अध्यक्ष राइस टर्टन म्हणतात की जेव्हा अंदाज इतके चुकीचे ठरतात, तेव्हा त्याचा आपल्यावर मोठा परिणाम होतो. शेतीत कोणते पीक घ्यायचे किंवा कोणते घ्यायचे नाही याचे हंगामाच्या सुरुवातीला घेतलेले निर्णय शेतकरी उलट करू शकत नाही.  

Story img Loader