अन्वय सावंत
भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक अशी सचिन तेंडुलकरची ओळख आहे. सचिनच्या कोणत्याही विक्रमाशी बरोबरी करणे किंवा त्याच्याप्रमाणे कामगिरी करणे, हे अत्यंत आव्हानात्मक असते. मात्र, सचिनचा पुत्र अर्जुननेच त्याच्या एका कामगिरीशी बरोबरी केली आहे. अर्जुनने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना रणजी करंडक स्पर्धेत पदार्पणात शतक साकारले. या कामगिरीसह त्याने स्वतःसाठी वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये यापूर्वीही काही पिता-पुत्रांच्या जोड्यांनी यशस्वी कारकीर्द घडवली होती. त्यांच्यावर एक नजर.
लाला आणि मोहिंदर अमरनाथ…
लाला आणि मोहिंदर अमरनाथ ही भारतीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी पिता-पुत्राची जोडी. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून पहिलेवहिले शतक झळकावण्याचा विक्रम लाला अमरनाथ यांच्या नावे आहे. त्यांनी १९३३मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पणातच ११८ धावांची खेळी केली होती. फलंदाज आणि उपयुक्त मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या लाला यांनी २४ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. या सामन्यांत त्यांनी एक शतक आणि चार अर्धशतकांच्या मदतीने ८७८ धावा केल्या. तसेच त्यांनी ४५ बळीही मिळवले. त्यांनी १५ सामन्यांत भारताचे कर्णधारपद भूषवले होते. लाला यांचे पुत्र मोहिंदर हे १९८३ च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते. मोहिंदर यांनी विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. मोहिंदर यांनी भारताकडून ६९ कसोटी व ८५ एकदिवसीय सामने खेळताना अनुक्रमे ४३७८ व १९२४ धावा केल्या होत्या. तसेच वडिलांप्रमाणेच उपयुक्त मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या मोहिंदर यांनी कसोटीत ३२ व एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४६ बळी मिळवले होते.
विजय आणि संजय मांजरेकर…
विजय आणि संजय मांजरेकर या मुंबईकर पिता-पुत्रांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. फलंदाज असलेल्या विजय यांनी ५५ कसोटी सामन्यांत ३९.१२च्या सरासरीने ३२०८ धावा केल्या होत्या, ज्यात सात शतकांचा समावेश होता. यापैकी दोन शतके त्यांनी परदेशात केली होती. विजय यांनी १९५२मध्ये इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे १३३ धावांची, तर १९५३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्सटन येथे ११८ धावांची खेळी केली होती. विजय यांचे पुत्र संजय यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही चांगल्या खेळी केल्या होत्या. १९८९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ब्रिजटाऊन येथे ११८ धावांची खेळी केल्यानंतर त्याच वर्षी त्यांनी पाकिस्तान दौऱ्यातील चार कसोटी सामन्यांत ५६९ धावा फटकावल्या होत्या. यात २१८ धावांच्या खेळीचाही समावेश होता. संजय यांनी एकंदरीत ३७ कसोटी आणि ७४ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे २०४३ आणि १९९४ धावा केल्या.
विश्लेषण: अर्जेंटिनासाठी ‘मेसी मॅजिक’ अजूनही निर्णायक… मेसीला थोपवणे शक्य आहे का?
इफ्तिकार आणि मन्सूर अली खान पतौडी…
भारत आणि इंग्लंड या दोन देशांसाठी कसोटी क्रिकेट खेळणारे एकमेव क्रिकेटपटू म्हणजे इफ्तिकार अली खान पतौडी. इफ्तिकार यांनी १९३२मध्ये इंग्लंडकडून पदार्पण करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत शतक साकारले होते. इंग्लंडकडून तीन कसोटी सामने खेळल्यानंतर त्यांनी भारताचेही तीन कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले. त्यांनी एकूण सहा सामन्यांत मिळून १९९ धावा केल्या होत्या. त्यांचे पुत्र मन्सूर अली खान पतौडी यांना भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. ‘टायगर’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या मन्सूर यांना एका कार अपघातात आपला उजवा डोळा गमवावा लागला. मात्र, काही महिन्यांची वयाच्या २१व्या वर्षीच मन्सूर यांनी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी कसोटी कारकीर्दीतील ४६ पैकी ४० कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यापैकी नऊ सामने भारताने जिंकले. तसेच फलंदाजीत त्यांनी ३४.९१च्या सरासरीने २७९३ धावा केल्या होत्या.
सुनील आणि रोहन गावस्कर…
मुंबईकर सुनील गावस्कर यांची केवळ भारतीय नाही, तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट सलामीवीरांमध्ये गणना केली जाते. १९७०-७१मध्ये त्या काळचा सर्वोत्तम संघ वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्याच भूमीत गावस्करांनी पदार्पण करताना चार कसोटीत ७७४ धावा करण्याची किमया साधली होती. सुनील गावस्कर यांनी एकूण १२५ कसोटी सामने खेळताना ५१.१२च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३४ शतके झळकावली होती. अनेक वर्षे हा जागतिक विक्रम होता, जो पुढे जाऊन सचिनने मोडला. तसेच त्यांनी १०८ एकदिवसीय सामन्यांत एका शतकाच्या मदतीने ३०९२ धावा केल्या होत्या. त्यांचा पुत्र रोहनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसे यश मिळाले नाही. डावखुरा फलंदाज व उपयुक्त फिरकीपटू रोहनने भारताकडून ११ एकदिवसीय सामने खेळले. त्याला केवळ एका अर्धशतकासह १५१ धावा करता आल्या व एक बळी मिळवता आला. मात्र, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवली होती.
विश्लेषण : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गोलकीपरची कामगिरी कशी ठरतेय निर्णायक?
रॉजर आणि स्टुअर्ट बिन्नी…
अष्टपैलू रॉजर बिन्नी १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग होते. वेगवान गोलंदाज रॉजर यांनी भारताच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावताना आठ सामन्यांत १८ बळी मिळवले होते. या स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ते अग्रस्थानी होते. त्यांनी २७ कसोटी आणि ७२ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेटच्या या दोन्ही प्रकारांत मिळून त्यांनी १२४ गडी बाद करतानाच सहा अर्धशतकेही झळकावली होती. रॉजर यांचा पुत्र स्टुअर्टने भारताकडून सहा कसोटी, १४ एकदिवसीय व तीन ट्वेन्टी-२० सामने खेळले. अष्टपैलू स्टुअर्टने काही सामन्यांत आपली चमक दाखवली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम स्टुअर्टच्या नावे आहे. त्याने २०१४मध्ये बांगलादेशविरुद्ध चार धावांत सहा बळी मिळवले होते. तसेच इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम येथे झालेल्या कसोटीत त्याने ७८ धावांची खेळीही केली होती. मात्र, त्याला सातत्याने भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश आले नाही.
अर्जुनची कामगिरी का ठरली खास?
अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या रणजी संघात संधी मिळत नव्हती. त्यामुळे यंदाच्या देशांतर्गत हंगामापूर्वी त्याने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याला नव्या रणजी हंगामातील पहिल्याच सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना डावखुऱ्या अर्जुनने २०७ चेंडूंत १६ चौकार व दोन षटकारांच्या मदतीने १२० धावांची खेळी केली. तसेच त्याने सुयश प्रभूदेसाईच्या साथीने २२१ धावांची भागीदारीही रचली. ३४ वर्षांपूर्वी सचिननेही प्रथमश्रेणी पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. सचिनने वयाच्या १५ व्या वर्षी मुंबईकडून पदार्पण करताना गुजरातविरुद्ध शतक केले होते.